Literature

फाल्गुन शुद्ध दशमी

स्वयंपाक करण्याच्या विचाराने किंवा स्वयंपाक कसा करावा याचा फक्त अभ्यास केल्याने भूक शमत नाही. पोट भरण्यासाठी स्वयंपाक करूनच जेवले पाहिजे. त्याचप्रमाणे केवळ ज्ञानाने मुक्ती मिळणार नाही तर त्यासाठी ज्ञानास भक्तीची जोड अत्यावश्यक आहे.

*नैष्कर्ममप्यच्युत भाववर्जितं, न शोभते ज्ञानमलं हि पुंसाम् |*

असे श्रीमद् भागवतात म्हटले आहे. म्हणजेच ‘सर्वकर्मपरित्याग करून संन्यास ग्रहण करताच मुक्ति प्राप्त होत नाही, परमात्म्यासंबंधी भक्तिभाव नसल्यास आपण समजावून घेतलेले वेदार्थज्ञानसुद्धा केवळ बडबड किंवा वितंडवादच होय. अशाप्रकारच्या ज्ञानवैराग्याला मुळीच किंमत नाही. त्यामध्ये कोणतेच सामर्थ्य नसते.’ असे सर्वज्ञ अशा श्रीव्यासमहर्षींनी म्हटले. केवळ शब्दज्ञान किंवा निष्ठूर कर्माचरण ही साधने नव्हेत. त्या सर्वांना भक्तीच्या तेजाची नितांत आवश्यकता आहे.

पाश्चात्यांची वर्णने ऐकून किंवा त्यांचे फोटो पाहून कितीही मनन केले तरी त्यांची बोलीभाषा आपणांस येऊ शकेल काय ? आपणास त्यांची बोलीभाषा यावी असे वाटत असल्यास त्या भाषेचा क्रमवार अभ्यास करणेच आवश्यक आहे. ज्ञान हे कोरडे आहे. त्यास अनुभवरूपी आर्द्रतेची आवश्यकता आहे. अननुभवाच्या केवळ वाक्यांनी किंवा भाषेने शांति मिळणार नाही.

*श्री.प.प. सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img