Literature

फाल्गुन शुद्ध द्वादशी

भगवंताच्या शक्तीमध्ये भक्तांची अचल श्रद्धा पाहिजे आणि तो आपला उद्धार करील हा दृढविश्वासही हवा. विश्वास ठेवल्याने तोटा होत नाही. पण विश्वास न ठेवल्याने हानी होतेच होते. भगवंताबद्दल अचल श्रद्धा असल्याशिवाय केलेले कोणतेही कार्य फलद्रुप होत नाही. अचल निष्ठेने भगवद् आराधना केल्यास मात्र निश्चितपणे फलप्राप्ती होतेच होते. परमात्म्यामध्ये मन गुंतवून ठेवणे फारच कठीण. त्याच्या समोर बसून प्रपंचामधल्या तापत्रयांचे ध्यान करणाऱ्या लोकांवर त्याची कृपा कशी होणार?

मुक्तीला भक्तीच कारण आहे असे म्हटले जाते. पण ती भक्ती अचल पाहिजे. तींत युक्ती वगैरे उपयोगाची नाही. भगवंताचे नामस्मरण करणारे दांभिक आचारप्रवर्तक असे जे लोक असतात ते दिखाऊ भगवद् भक्त होत, ते खरे भगवद् भक्त नसल्याने त्यांना मुक्ती मिळत नाही आणि त्यांच्या या दिखाऊ युक्तीचा काहीही उपयोग होत नाही.

श्रद्धा नसेल तर भगवान किंवा भगवद् भक्त यापैकी कोणीही तुमचे कल्याण करू शकणार नाहीत. अचल श्रद्धेने भगवदाराधाना करणाऱ्या भक्तांना नित्य, निर्विकार, स्वप्रकाशी सच्चिदानंदस्वरूप प्राप्त होते. कनवाळू परमात्म्याच्या कृपेने तुम्हा सर्वांना मी सांगितलेला भक्तिमार्ग लाभो व त्या सच्चिदानंदस्वरूपाचे तुम्हास दर्शन होवो व ते स्वरूप तुम्हाला प्राप्त होवो !!

*श्री.प.प.सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img