Literature

फाल्गुन शुद्ध पौर्णिमा

जगदोद्धार करणारे अवतारी पुरूष हे परमात्मस्वरूपाचा साक्षात्कार झालेले ज्ञानीच होत. त्यांच्यामध्ये परमात्मा आपले जगदोध्दाराचे कार्य प्रगट करतो. ज्ञानी लोक स्वतःच्या योग्यतेप्रमाणे स्वतःस शक्य होईल त्याप्रमाणे सद्धर्म व ज्ञानविज्ञानाचा प्रचार प्रकर्षत्वाने करीत राहून बहिर्मुखता कमी करीत करीत व अंतर्मुखता वाढवीत वाढवीत अधिकाधिक काळ निर्विकल्प समाधीतच घालवतात. सामान्यास गाढ झोपेत काहीही कळत नाही तद्वत ज्ञानास समाधीत काहीही समजून येत नाही.

सुप्ति व समाधी यांचे स्पष्टीकरण करावयाचे असल्यास सुप्तीची अमावस्येच्या अंधाऱ्या रात्रीशी तुलना करता येईल तर समाधीची पूर्ण चंद्रप्रकाशी पौर्णिमेच्या रात्रीशी तुलना करता येईल. सुप्ती व समाधीच्या वेळी मीपणाचे ज्ञान रहात नसल्याने सृष्टिप्रपंचाबद्दल जाणीव कशी असणार ? समाधीनिष्ठास बाह्यजगाशी न त्याच्या कार्याशी कोणतेच कर्तव्य नसते.

अग्नि, सूर्य, चंद्र, वीज या सर्वांच्या प्रकाशाला प्रकाशित करणाऱ्या ब्रम्हप्रकाशास योग्य अशा आत्मज्ञाननिष्ठेने ओळखले पाहिजे. या सुखापुढे इतर सर्व सुखे तुच्छ होत.

*श्री.प.प.सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img