सद्गुरूपदापेक्षा कांहीही श्रेष्ठ असु शकत नाही. तसेच तेथे दुसरे काहीही असु शकत नाही. तो श्रेष्ठ, कनिष्ठ असा कोणताही पदार्थ नसून तो सर्वत्र व्यापून अद्वितीय आहे, असे ब्रह्मस्वरूपाचे लक्षण श्रुतींनी सांगितले आहे. अशाप्रकारे एकमेव असलेली ही वस्तु दिसणार कशी ? हे जग दृग्गोचर होण्यास काय कारण असेल बरे ? असे प्रश्न उद्भवतात. अभिन्नतेने अखंड आनंदघन असलेले हे स्वरूप स्वानुभवानेच घेण्याची वस्तु म्हणजेच भोगणारा, भोगण्याची वस्तु व भोगण्याचा क्रम. अनुभव त्रिपुटी नसलेले आनंदस्वरूपच गुरूतत्व स्वरूप होय. असा हे परमानंदस्वरूप ब्रह्मच गुरू शब्दाने ओळखणे शक्य आहे.
जेथे जगाची निर्मिती नाही, दुःखकोशाचा स्पर्श नाही, फक्त आनंदाचाच अनुभव परिपूर्ण व नित्य आहे अशा स्वरूपाला गुरू असे म्हणतात.
अतिशुध्द, दुःखशोकरहित, परिपूर्ण, सत्यस्वरूप म्हणजेच अद्वितीयस्थिती असे हे परममंगल गुरूपद होय. अशा परममंगल गुरूनाथांची आराधना किंवा नित्य स्मरण करणाऱ्यास कशाचीही उणीव भासणार नाही. इतकेच नव्हे तर त्याचे भजन करणारा भक्त त्या मंगलस्वरूपात एकरूप होतो.
*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*