Literature

फाल्गुन शुद्ध सप्तमी

परमात्मा निर्गुण, निराकार असूनही भक्तांच्या भक्तीपाशांत मोहून तो भक्तांनी कल्पिलेले आकार, रूप धारण करून भक्ताच्या कार्यसिद्धीस तत्पर असतो. परमात्मा आपल्या भक्ताच्या हितसाधनेसाठी त्यांच्या भक्तीला अनुरूप, साकार साक्षात्कारस्वरूप धारण करून त्यांना दर्शन देतो. त्याची कार्यसिद्धी करतो. प्रेमाने वश होणारा परमात्मा मानवरूप धारण करून शिशुप्रमाणेच बाललिलाही आचरतो, तरूणाप्रमाणे प्रणयव्यवहारारही करतो, कोप संतापही प्रगट करतो व सुखदुःखाच्या अनुभवाचेही नाटक करतो.

प्रेमांध व्यक्तीला दुःखाची जाणीव होत नाही व प्रेमपात्र असणाऱ्या माणसांचे दोषही त्यास दिसून येत नाहीत, त्याचप्रमाणे भक्तिपरवशतेमुळे शरणागत अशा आपल्या भक्तांचे सर्व दोष विसरून परमात्मा त्याच्यावर कृपा करतो.म्हणूनच नारदभक्तिसूत्रांत *’ त्रिसत्यस्य भक्तिरेव गरियसी | भक्तिरेव गरियसी | भक्तिरेव गरियसी |* असे म्हटले आहे. भक्तीच सर्वात श्रेष्ठ आहे, श्रेष्ठ आहे, श्रेष्ठ आहे. परमात्म्यामध्ये अचल श्रद्धा ठेवून मानवानी त्याच्या रूपाचे चिंतन केल्यास ‘अमृतत्त्वमेति’ ते जन्ममरणरहित होऊन चिरंजीवी होतात, असे म्हटले आहे आणि म्हणूनच ‘तुम्ही सर्व माझ्या ठिकाणीच मन रमविणारे व्हा’ असे भगवंतानी म्हटले आहे.

*श्री प प स भ श्रीधर स्वामी महाराज*

home-last-sec-img