Literature

भाद्रपद वद्य त्रयोदशी

स्तुती केल्याने उल्हसित होणे व निंदा केली असतां खिन्न होणे हे दोन्हीही देहाभिमान होत. स्वरूपस्थितीच्या
अखंड धारणेने हा देहाभिमान नष्ट केला पाहिजे. स्वरूपस्थिती ही सहजपूर्ण निर्विकल्प आत्मस्वरूप होय.

तिच्या धारणेचा निरंतर अभ्यास केला पाहिजे. तिच्यामध्ये इतर कोणत्याही द्वैत कल्पनेला स्थानच असत
नाही. इतक्या खोलवर जाऊन आपल्या अहंस्मृतिरहित निर्विकल्प, निर्विकार, निरंतर असे रूप, स्वप्रकाश
अहंभावाचे मूलतत्व असणारा एकमेव आत्माच सर्वत्र व्यापक आहे व तेंच माझे स्वरूप आहे असा
दृढनिश्चयपूर्वक नित्य निर्विकल्प स्थितीतच सदासर्वदा राहिले पाहिजे.

अहंस्फूर्तीनंतर माया-अविद्येचे क्षेत्र आहे. महान नटी असलेल्या मायेकडे जीवाकडून दृष्टिपात होताच
पूर्वस्थितीची विस्मृती होऊन बहिर्मुखतेस प्रारंभ होतो व हळुहळु घसरत घसरत तो जीव संसार समुद्रातील
खोल असणाऱ्या भागात जाऊन पडतो. मग स्वरूपाची विस्मृती होते व ह्रदयात मनाच्या निरनिराळ्या
विक्षेपशक्ती घसरून त्या चांचल्य, आशा, तृष्णा आदींच्या रूपाने परिणामित होतात. याच मनाच्या वृत्तीने
विषरूपी विषयांचे सेवन करून जीवभानाशी बध्दमान होऊन जन्ममृत्यूरूपी भवचक्रामध्ये फिरावयास
लावतात. गुरूची पूर्णकृपा होताच जीवाला तत्त्वांचा साक्षात्कार होऊन मोक्षाची प्राप्ती होते. आपल्या
ह्रदयातील विक्षेपप्रवृत्तीच्या अधिकतेकरता आत्मस्वरूप हा एक प्रसाद समजला पाहिजे. बंधन व मुक्ती ही
दोन्ही अनुक्रमे अज्ञान व ज्ञान यांचाच विलास होत.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्रीधर स्वामी*

home-last-sec-img