Literature

भाद्रपद वद्य दशमी

आनंद हेच सर्व विश्वाचे सत्यरूप होय. अज्ञानावस्थेतच असतांना मनुष्य देहाचा आकार पाहून त्यालाच
ज्याप्रमाणे ' मी हाच आहे ' असा मानतो. त्याचप्रमाणे आनंदरूपाला ओळखून त्यास ' मी हाच आहे,
आनंदरूपच मी आहे ' असे मानू लागतो.

विश्वाचे आनंदाशिवाय इतर कोणतेही तात्विक स्वरूप उत्पन्न होऊच शकत नाही. ' आनंन्दो ब्रह्मेति
व्यजानात् ' आनंद हाच एकमेव परमात्मा होय. ' ' आनन्दोद्येव खल्विमानि भूतानि जायन्ते | आनन्देनैव
जातानि जीवन्ति | आनन्द प्रयन्त्यभि संविषन्ति | ' सर्व प्राणिमात्र आनंदामुळेच जीवित आहेत. समजून
उमजून किंवा न समजता सर्व प्राणिमात्र या आनंदाकडे आकर्षिले जातात आणि त्याच्या प्राप्तीची इच्छा
धरून साधन, अनुष्ठानाने त्याची प्राप्ती झाल्यावर हे सर्व प्राणीमात्र त्यातच एकरूप होऊन विलिन होतात,
असा श्रुतिमातेचा आपल्या कडेवरील मुलांना उपदेश आहे. आनंदस्वरूपाची अभिलाषा हेच भक्ति, ज्ञान,
वैराग्य होय. यालाच ' ध्यानयोग ' म्हणतात.

आनंदरूपाचीच एकमेव अनुभूती असावी. आनंदानुभावशिवाय इतर कोणत्याही वृत्तीचा उद्ग़म होऊ न
देणे हेच आत्मानात्माविवेकांचे कार्य आहे. आनंदमात्रस्थिती हीच खरोखर आत्मस्थिती होय. या भावरूप
आनंदामध्ये एकमेव आनंदाशिवाय इतर कोणाचेही वास्तव्य असू शकत नाही. हेच प्राचीन असे विश्वाचे
मंगलमय सत्यरूप होय. अशा निश्चल, निर्विकल्प आनंदरूपाद्वारे तुम्ही सर्व तृप्त व कृतकृत्य होऊन आपले
जीवन सफल करा !

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img