Literature

भाद्रपद वद्य द्वादशी

ही सर्व सृष्टी हा चित्ताचाच विलास आहे. चित्त एका वस्तूकडे असल्यास दुसऱ्या कोणत्याही वस्तूची
भावना होत नाही. आपल्यासमोर श्रीगुरूमूर्ती येऊन उभी राहिली तरी आपले चित्त त्याच्याकडे नसेल तर
आपल्याला त्याची भावनाही होणार नाही व श्रीगुरूंचे प्रत्यक्ष दर्शनही होणार नाही. चित्त म्हणजेच आपला
एक प्रकारचा संकल्प होय. विचारकरून पाहिले तर आपण व आपला संकल्प याशिवाय दुसरे काहीही नाही.

आपल्या कल्पनेत जो विजातीय संस्कार आहे तो बाजूस सारून आपण सदोदित अखंड स्वरूपात आपल्या
कल्पनांचा तसेच त्यापासून होणाऱ्या पिंड, ब्रह्मांड, जीव-ईश, माया-अविद्या इत्यादि संपूर्ण भिन्न भिन्न वृत्तींचा
लय करून ' मी शुध्द ब्रह्म आहे ' या स्मृतिरहित होऊन केवळ मूळ अस्तित्वात रहाणे ही खरी स्थिती होय व
अशी स्थिती प्राप्त करणे हाच ' तत्त्वसाक्षात्कार ' किंवा ' आत्मस्वरूपप्राप्ती ' होय.

या स्वरूपस्थितीचे दर्शक दयाळू सद्गुरू आहेत तेही निस्फूर्तिक असे आपले स्वस्वरूपी ब्रह्मच होत.
आपल्या ह्रदयात चांचल्यतेला किंचितही स्थान न देता ' देहोऽहम् ' या भावनेपासून ते ' अहं ब्रह्मास्मि ' पावेतो
जेवढ्या स्फूर्ती आहेत त्या सर्व आपल्या स्वरूपात विलीन करून ज्ञानस्वरूप, केवळ शुध्द ब्रह्मच परिपूर्णपणे
अंतरबाह्य भरलेले आहे असा निश्चय करून त्या अनंतानंदात तद्रुप होणे हीच आत्मनिष्ठा होय. हाच
श्रीगुरूदेवांचा रहस्यमय उपदेश आहे. गुरूउपदेशाच्या या गुढ रहस्याचे मर्म समजून घेऊन एकाग्र मनाने
बहिमुर्खवृत्ती नष्ट करून अंतर्मुखवृत्ती वाढवीत जावी.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img