Literature

भाद्रपद शुद्ध अष्टमी

आपणांस ज्याचा कंटाळा येणार नाही असा एकही पदार्थ या जगांत नाही. उपभोग्य वस्तुंची प्राप्ती होत
असता व उपभोग घेतल्यानंतरही कोणते ना कोणते दुःख निर्माण केले नाही असा कोणताही उपभोग नाही.

मानव देह अत्यंत किळस आणणारा आहे. आपलाच काय किंवा इतरांचा काय सर्व मनुष्य मात्रांचा देह
किळसवाण्या पदार्थाचे आगरच आहे. अशा देहामुळे तिरस्कार उत्पन्न न करणाऱ्या कोणत्या सुखाचा
उपभोग घेता येईल ? अर्थात कोणत्याही सुखाचा उपभोग घेता येणार नाही. या देहाने उपभोगल्यानंतर
कंटाळा न आणणारा असा कोणता पदार्थ असेल तर ते फक्त हरिचरणारविंदच होत. आणि ते सुख म्हणजे
हरिचरणारविंदच ! ते सुख अनुभवीत असतां देहभान रहात नाही. त्यांच्या उत्कट भक्तीमुळे उत्पन्न होणारे
सर्वाकर्ष सुख होय. परमात्मा निरवधि आनंदस्वरूप असतो. सातिशय पदार्थाचे सुख सोडून निरतिशय

सुखासाठीच प्रयत्न करण्याने या मानवजन्माचे सार्थक होते. जगामधील सर्व सुखे, दुःख, भय, शोक, चिंता,
कंटाळा, अपूर्णता, अनुकूल मनप्रवृत्ती, देशकाल, वस्तुंचे सापेक्षत्व इत्यादींनी परिपूर्ण आहे. याच्या उलट जे
सुख तेच परमात्मसुख. ते सर्वनिरपेक्ष, स्वयंसिध्द, अखिल दुःखरहित, शोकशून्य, निर्भय, कधीही चिंता उत्पन्न
न करता चिंता दूर करणारे आहे.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img