Literature

भाद्रपद शुद्ध चतुर्दशी

दयाळू परमेश्वराने जीवांना वैराग्य प्राप्त व्हावे आणि अवीट सुखाचा शोध लागावा म्हणून वीट
आणणाऱ्या पदार्थाचा, देहाचा, अवस्थांचा, त्यांच्या अनुभवाच्या अभिमानांचा परिचय जीवनात सर्वांना
करून दिला आहे. थोडासा विचार केल्यास सुषुप्तीत जे सुख उरते ते, जागृतावस्थेच्या, स्वप्नावस्थेच्या आणि
सुषुप्तीतल्या अज्ञानाच्या त्यागाने त्याच्याशी एकरूप होऊनच लाभते व तेच सुख अवीट असल्यामुळे त्याच्या
प्राप्तीकरता या सर्वांचा त्याग प्रत्यही घडत असतो हे स्पष्ट होते ही गोष्ट समजून घेऊन त्या निष्ठेत रहाण्यास
जागृत, स्वप्न, सुषुप्ती या तीन अवस्थांचा अनुभव एक पुरे, यावरच स्वतंत्रपणे विचार केला तरी प्रत्यही
येणाऱ्या अनुभवावरून त्यागाचे महत्त्व, जगाचे मिथ्यत्व, एकात्मत्य आणि सर्वांचे आनंदरूपत्व स्पष्टपणे
कळुन येण्यासारखे आहे. जागृत स्वप्नातील देहात्मबुध्दीला, विषयवासनेला, भेदाला आणि विविधतेला
कारण, एक आनंदस्वरूपाचे अज्ञानच हे सुषुप्तीतील ' आनंद झाला ' व ' काही समजले नाही ' या
अनुभवावरून समजून येते. आनंदाचा अनुभव आला तो तेथे आनंद असल्यामुळेच, काही समजले नाही
अशा स्वरूपाच्या अज्ञानाचा भाव प्रगट करतो व त्यामुळेच स्वप्नजागृतीतील सृष्टीची व त्यामधून घडणाऱ्या
मानसिक तसेच दैहिक व्यवहाराची उत्पत्ती होते हे समजून येते. अज्ञानाच्या नाशाने अद्वितीय आनंदस्वरूपाशी
ऐक्य होऊन दृश्य वासना नाहीशी होते, दृश्याभास ओसरतो व जन्ममरणाचा हिशोब आटोपतो हे स्पष्ट होते.
यालाच ब्रह्मैक्य, स्वरूपानुभव, मोक्ष अथवा जीवनमुक्ति असे म्हणतात.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img