Literature

भाद्रपद शुद्ध त्रयोदशी

मी या जाणिवेच्या सिंहासनावर आनंदघन ब्रह्मस्वरूप सद्गुरूनाथांची स्थापना ' सोहं ' भावनेने करून
सद्गुरूउपासना करावयाची असते. गुरूच्या ठिकाणी ब्रह्मस्वरूपाचीच धारणा ठेवावयाची असते.

जगातील उत्पत्तिनाशयुक्त सुखाभासाला हे उत्पत्तिनाशशून्य म्हणजे सदाचेच असणारे सुख किंवा आनंद
कारणीभूत आहे. त्यालाच ब्रह्म किंवा गुरू म्हणतात. उत्पत्तिनाशयुक्त असणारे गतिमान म्हणजेच चंचळ
असते. अशा चंचळपदार्थजनित चंचळसुखाभासाला हे एक निश्चळ सुख आधारभूत किंवा कारणीभूत आहे

त्या निश्चळ निर्विकार सुखाला अथवा आनंदालाच ब्रह्म हे दुसरे नामाभिधान आहे. भिंतीवर रेखाटलेले
धावते चित्र जसे निश्चल असते तसे हे चंचळ जग तत्त्वतः एक निश्चळ आनंदरूप ब्रह्मच आहे व त्यालाच गुरू
असे म्हणतात.

' तेच तू आहेस ' असा श्रुतीचा *' तत्त्वमसि '* पर अंतिम उपदेश आहे. आनंदस्वरूपाचा असा हा साक्षात्कार
होणे आणि तो गुरूसेवेद्वारे करून घेणे हेच जन्माचे सार्थक आहे. प्रत्येक तरंग समुद्र असल्याप्रमाणे सर्वत्र
दिसून येणारे ' मी ' हे भान अनंत आनंदरूप एक ब्रह्मस्वरूपच आहे असे वैदिक तत्त्वज्ञानाचे मूलग्राही
मार्गदर्शन आहे.

तापलेल्या वाळवंटातील विशाल उद्यानाप्रमाणे तापत्रयसंतप्त असणाऱ्या जगातील नित्यमंगल नित्य
आनंदरूप असणाऱ्या श्रीसद्गुरूंचा आश्रय करून तुम्ही सर्वजण कृतकृत्य आणि धन्य व्हा !!

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img