Literature

भारतवर्षाचे प्राचीनत्व

वेदांतील वर्णनाशी व पुराणाच्या कथांशी त्या त्या क्षेत्रांतील खाणाखुणा पटतात. ही सर्व क्षेत्रे हिमालयापासून तो कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या हिन्दुस्थानाच्या हद्दीतच दिसून येतात. चार धाम आणि द्वादश ज्योतिर्लिंगांची यात्रा म्हणजे संबंध हिन्दुस्थानाचीच प्रदक्षिणा होते. चार धार्मेच पाहाना का ! उत्तरेला बद्रीनारायण, दक्षिणेला रामेश्वर, पूर्वेला जगन्नायपुरी व पश्चिमेला द्वारका हिन्दुस्थानाच्या पूर्व–पश्चिम, दक्षिण-उत्तर अशा या चतुःसीमाच आहेत. द्वादशज्योतिलिंग स्तोत्रांत या बारा ज्योतिर्लिंगांची यादी आढळून येते.

सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनम् । उज्जयिन्यां महाकालमोंकारममलेश्वरम् ॥ १ ॥ परल्यां वैजनाथं च डाकिन्यां भीमशंकरम् । सेतुबंधे तु रामेशं नागेशं दारुकावने ॥ २ ॥ वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यंबकं गौतमीतटे । हिमालये तु केदारं घुसृणेशं शिवालये ॥ ३ ॥ एतानि ज्योतिर्लिंगानि सायंप्रातः पठेन्नरः । सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति ॥ ४ ॥

या सर्व ज्योतिर्लिंगांची यात्रा पायी करावयाची झाल्यास आपोआपच भारतवर्षाची प्रदक्षिणा होते. सार्धत्रिकोटितीर्थानि-साडेतीन कोटि तीर्थ आहेत. ही सर्व तीर्थे करावयाची म्हणजे हिंदुस्थानाच्या कानाकोपऱ्यांतून हि हिंडावे लागते. तीर्थक्षेत्रांनी अतिपवित्र, अनेक सुंदर सुंदर देवालयांनी दिव्य स्फूर्तिदायक व पुराणकथा-निदर्शक यांतील तपोभूमि म्हणवून घेणाऱ्या वनोपवनांनी अति शोभायमान असा अतिशय रमणीय देश म्हणजे हा भारत वर्ष होय. परमार्थप्राप्तीची ही एक दिव्य भूमी होय. सृष्टीच्या आरंभापासून या भूमीत देवदेवता ऋषिमुनींनी बहू अनुष्ठाने केली. तप केलें, यज्ञयाग केले. या सर्व स्थळी त्यांची स्मारके अजूनहि त्या दिव्य घटनेची स्मृति आणून देतात, तसे कांही अवशेषहि तेथे सांपडतात. हिमालयांत तर असली स्थळे खूपच आहेत. याचा प्रारंभ हरिद्वारापासूनच होतो. हरिद्वाराच्या जवळ असणाऱ्या कनखल क्षेत्रांतच दक्षयज्ञ झाला. येथून पुढे निघालें म्हणजे त्रिमूर्तीचीहि तपस्थानें आढळतात. दक्षिणेत उत्तरेत चोहीकडे यज्ञयागांची कितीतरी स्थळे भेटतील. हिला देवभूमि असे म्हणतात. मानवकुलाचा मूळपुरुष मनु हा प्रथम या भूमीचा राजा झाला. ब्रह्मदेवाच्या उजव्या आणि डाव्या भागापासून मनु व शतरूप यांची उत्पत्ति झाली. हें मानवकुलांतील सर्वादि दांपत्य. या भारतवर्षांत असणारी सर्व प्रजा ऋषींची संतति होय है गोत्र, सूत्र व शाखा यावरून स्पष्ट होते.

ब्रह्मदेवाकडून निवृत्ति, प्रवृत्ति असे दोन मार्ग निर्माण केले गेले. या दोन संस्कारांची सृष्टि निर्माण केली गेली. सनक सनंदनादिकांची प्रथम सृष्टि आणि नव प्रजापतींची ही दुसरी या नव प्रजापतीपासून प्रजोत्पत्ति झाली, प्रवृत्तिमार्ग वाढला. यांच्याच प्रजेला आर्य असें नांव आहे. यांच्या कुलांतील सर्वहि आर्य होत. या आर्यांची कर्मभूमी म्हणजे हें भारतवर्ष होय. हे आर्यांच्या वेदोक्त कर्माकरितांच परमात्म्याने निर्माण केले आहे. या विधानाची सार्थकता येथील तीर्थक्षेत्र द्वारा पटते हे कितीदा सांगितले तरी कमीच आहे. दक्षिणेच्या यात्रेत जागजागी वेदकालीन ऋषीचे आश्रम आढळून येतात. गोकर्ण महाबळेश्वर, सेतुबंध, रामेश्वर इत्यादि स्थळे आपल्या नामनिर्देशांनी स्मारकांनी त्या त्या घटनेची साक्ष पटवितात. ही सर्व स्थळे म्हणजे ऐतिहासिक स्थळेच होत. कांहीं कांही स्थळे त्या त्या देवांच्या व ऋषींच्या नांवांनाच प्रसिद्ध आहेत. आसेतुहिमाचल ही सर्वहि आर्यभूमीच आहे याची ही स्थळे साक्ष देतात. कर्नाटकाकडील सिर्सी भागांतल्या याण येथील लोक तेथील देवस्थानापासून थोड्या अंतरावर असलेले एक स्थळ दाखवून ‘ श्रीशंकराने मोहिनीरूप धारण केलेल्या विष्णू कडून भस्मासुरास भस्म करून टाकलेले स्थळ हेच’ म्हणून सांगतात व त्याची खूण म्हणून ते तेथील सर्व माती जळून गेल्याप्रमाणे आहे ती दाखवितात. पौराणिक घटनांचा त्या त्या स्थळाच्या पुराच्याशी कसा ताळमेळ जमतो हे तेथल्या लोकांनी सोदाहरण पटवून सांगितले आहे. ब्रह्मादिकांनी यज्ञ केलेल्या स्थळी उकरले असतां आजहि भस्म मिळते. गाणगापुराहून भाविक लोक अद्यापि भस्म घेऊन येतात. त्या टेकडीच्या भागांत कोठेहि भस्म मिळते. यज्ञ करून कित्येक बर्षे होऊन गेली असली तरी त्या पौराणिक दिव्य कथांचे सत्यत्व आजहि अशा रीतीनें प्रकट होत आहे. इतिहासपुराणाभ्यां वेद समुपवृंहयेत् । इतिहासपुराणांवरून वेदांचा अर्थ स्पष्टपणे जाणला जातो. इतिहासपुराणांत दिसून येणाऱ्या कथानकांच्या खुणा पटविणारी जी वैशिष्ट्ये ठिकठिकाणी दृष्टोत्पत्तीस येतात त्यावरून वेदशास्त्रपुराणइतिहासांचे प्रामाण्य मनाला पटते. हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत व आणखी सर्वत्र आढळून येणाऱ्या विस्मय जनक प्रत्यंतरांनी ही देवभूमि आहे हे निश्चितपणे मनावर बिंबते. उत्तरेस हिमालय, दक्षिणेस हिंदुमहासागर, पूर्वेस गंगासागर ( बंगालचा उपसागर) आणि पश्चिमेस सिंधुसागर (अथवा अरबी समुद्र) अशी ही चतुःसीमान्त देवभूमी म्हणजे खरोखर मोक्षभूमी आहे. यांत जन्म घेऊन आर्य संस्कृतीचा आश्रय केलेली मंडळी धन्य धन्य ! देवनिर्मित अशी ही पूण्यभूमी आहे. परमात्म्यानें यथ अवतार धारण केले. येथे अवतार घेऊन येथला धर्म स्वतः पाळला आणि तो पुन्हां स्थापला. पहिल्यापासूनच परमात्म्याने येथे श्रेष्ठ पुरुषांना जन्माला घातलें. आर्या अत्रावर्तन्त इति आर्यावर्तः । भारतभूमीचे दैवी वैशिष्टय न विसरतां त्याचे रक्षण करणे हे प्रत्येक भारतीयाचे प्राणपणानें पाळले जाण्यासारखे आद्य कर्तव्य आहे. विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य आद्य ब्राह्मणो द्वितीये परार्धे श्रीहरेः श्वेतवाराहकल्पे वैवस्वतमन्वन्तरे कलियुगे प्रथमपादे जंबूद्वीपे भरतखंडे भारतवर्षे महामेरोदक्षिणपार्श्व, , , इत्यादि. या नित्य म्हटल्या जाणाऱ्या संकल्पावरून हिंदु संस्कृति ही परमात्मप्रणीत आहे, अखंड भारत ही आर्यभूमी आहे व येथे अनादि कालापासून राहणारे आर्यच होत हें स्पष्ट होते. याची विस्मृति होऊं नये म्हणूनच हा संकल्प नित्याच्या संकल्पांत गोवला गेला आहे. केवढे ते ऋषि विशाल ज्ञानाचे आणि सूक्ष्म दूर दृष्टीचे होते !

आर्यांचे वंशज आपण हें न विसरतां तदुचित, तत्काथित रीती-नीति, धर्म-कर्म सांभाळून, वितंडवाद न करतां उच्च नागरिकतेचा आदर्श पाळून मोक्षसाधनांनी विभूषित व्हावें, धन्य होऊन दिव्य जीवनाचे उदाहरण स्वयं होऊन राहावें, हेंच भारतांत जन्मल्याचे सार्थक होय. पूर्वीच्या अनेक परकीय राज्यकर्त्यांनी अनेक विरोधी कल्पना निर्माण करून परस्परांत द्वेष वाढविला व ‘ विभजन आणि शासन’ (Divide and rule) हे तत्व अमलांत आणले, वाटेल त्या मार्गांनी राज्य केलें; परंतु आतां स्वराज्य प्राप्त झाले असल्याने ह्या सर्वहि भेदभावना आणि कुटिल राज्यपद्धति टाकून, देशबंधुत्वाच्या आणि धर्म बंधुत्वाच्या हार्दिक प्रेमानें परस्परांशी वागत, पवित्र आर्य संस्कृतीचा उच्च ध्वज जगांत मिरवीत, मोक्षमार्गानुवर्ती होणें हें किती सुखावह व केवढे भूषणावह आहे! असें हें सौभाग्य आजच्या भारताला परमेश्वरकृपेने लवकरच लाभो व त्यामुळे आखिल विश्वाचेंच कल्याण होवो. 

home-last-sec-img