Literature

मनोनाशाचें साधन

धकाधकीचा मामला | कैसा घड़े अशक्ताला ।’(दा. १९-१०-२२). म्हणून दिवसेंदिवस आपल्याला सर्वतोपरी शक्त करीत असावें. नायमात्मा बलहीनेन लभ्यः । (कठ उ.) दुर्बळाला आत्मप्राप्ति होत नाही, असे कठोपनिषदांत आले आहे. प्रपंच दुस्तर घोर हा संसार मन अनिवार विषयलोभी । नावडे भजन पूजन परमार्थ रात्रंदिवस स्वार्थ विषयाचा ।‘ मनाचा हा साहजिकच असणारा सांचा आहे. मन जरी असे असले तरी आपल्याला आपले हित साधायला धैर्याने प्रयत्न हा केला पाहिजेच. या अभंगांत श्री समर्थांनी आपल्याला कसा धीर दिला पहा- ‘काय करितें हे मन । साक्ष आपुला आपण |||| हित आपुलें करावें । ना तरी यमलोका जावें |||| काय वासना म्हणते । आपणांस साक्ष येते |||| मनाला जाणणारे आपण त्याचे ज्ञानरूप साक्षी आहों. त्याच्या आदिमध्यान्तीहि आपले जें ज्ञानरूपाचे अस्तित्व आहे, त्याला या मनाचा आणि मनाच्या नानाविध वैषयिक कल्पनांचा अजिबात संग नाही हे जाणून असावें. असा विवेक बाळगला नाही आणि मनाप्रमाणे वागलो तर मन निषिद्धाकडे ओढीत असल्यामुळे नरक चुकणारच नाही, याची जाणीव बाळगून असावे असे आतापर्यंत सांगितले. मन आहे बारगळ । केल्या होतसे निवळ ॥४॥ सोडीना हे सांसारिक ।कांहीं पहावा विवेक ||||’ या विवेकाचे लक्षण वर सांगितले. विवेक न बाळगतां मनाच्या पाठीमागे लागले तर हे काही विषय सोडावयाला कधीच तयार होणार नाहीं. विवेकानें मात्र मन निवळते. मनाच्या मगरमिठीतून लौकर सुटावयास पाहिजे. मनाचेच चोचले पुरवीत बसलो तर याच्या पायी निश्चित मरण आहे असे समजावें. मन हे ओढाळ गुरुं परधन परकामिनीकडे धावे । यास्तव विवेकपाशे कंठीं वैराग्य काष्ठ बांधावें ॥१॥ही मोरोपंतांची आर्या सुप्रसिद्ध आहे. आपण वस्तु सिद्ध चि आहे मन मी ऐसे कल्पू नये । साधु सांगती उपाये । तूंचि आत्मा ॥ (दा. ८-१०-७५) मन मी ऐसें नाथिलें। संती नाहीं निरोपिलें। मानावें कोणाच्या बोले । मन मी ऐसें ||७६|| संतवचनी ठेवितां भाव । तोचि शुद्ध स्वानुभव | मनाचा तैसाच स्वभाव | आपण वस्तु ||७७|| जयाचा घ्यावा अनुभव । तोचि आपण निरावेव । आपुला घेती अनुभव । विश्वजन ||७८|| लोभी धन साधू गेलें । तंव ते लोभी धनचि जाले । मग तें भाग्यपुरुषीं भोगिलें । सावकास ॥७९॥ प्रमादो मृत्युरित्याहुः ।‘ आत्मध्यान व विरक्ति चुकणे आणि मनाप्रमाणे विषय अनुभवणे हा प्रमाद आहे. विषयानुभवांत अत्यंत आत्म-विस्मृति होणे हाच मृत्यु आहे. मृत्युरत्यन्त विस्मृतिः। आत्मरूपाची अत्यंत विस्मृति होणे हाच मृत्यु आहे. देहाभिमानाने जगण्यात, विषयसुख भोगण्यांत अकायो निर्गुणो ह्यात्मा । आत्मा देहशून्य (निराकार) निर्गुण आहे. ही आत्म-स्मृति रहात नाही. आपली ही स्मृति न झाली की झालें. आपल्या अस्तित्वाचे भान न होणे म्हणजेच मरण, दुसरे काय ? तेव्हां देहाभिमान धरु नका. विषयाकडे ढुंकूनहि पाहू नका.

मनाची कांस धरल्याने नरक आहे. मनाला तुमच्या कच्छपी लागू द्या. एरवीं   ‘दास म्हणे सावधान । पदरी बांधिले मरण |’ हा इशारा दिला आहे हे एक आणि दुसरें –येच क्षणी मरोनि जासी । तरी रघुनाथीं अंतरलासी । (दा. ३-१०-५०) देहाला केव्हा मरण येईल हे काय सांगता येते. म्हणून लौकरात लौकर आत्मनिष्ठा बळकट करायला ‘काही धावाधाव करी । जंव तो काळ आहे दुरी।असा कळकळीचा उपदेश आहे. देहबुद्धीचा संशयो। करी समाधानाचा क्षयो। चुके समाधान समयो। देहबुद्धियोगें || (दा. ७-२-३३).

देह पावे जंवरी मरण। तंवरी धरी देहाभिमान।पुन्हां दाखवी पुनरागमन । देहबुद्धी मागुती। (दा. ७-२-३५) हित आहे देहातीत । म्हणौनि निरोपिती संत । देहबुद्धीने अन्हित (जनहित) | होंचि लागे ॥३७॥ म्हणोनि देहबुद्धि हे झडे। तरीच परमार्थं घडे । देहबुद्धीनें विघडे ।ऐक्यता ब्रह्मींची ॥३९॥ विवेक वस्तुकडे ओढी । देहबुद्धि तेथूनि पाडी ।अहंता लावून निवडी । वेगळेपणें ॥४०॥ विचक्षणें या कारणे। देहबुद्धि त्यजावी श्रवणें ।सत्यब्रह्मीं साचारपणें। मिळोन जावें। ॥४१॥ मन मोठे चिवट श्रीसमर्थ म्हणतात. नाना उपाय मरता मरेना । मग काही उपाय म्हणून विचारले असता, तें ‘निर्गुणी पांगुळतां मरावें।‘ एक निर्गुण स्वरूपाच्या धारणेने हे पांगळे होऊन मरावे नाहीं तर कठीण. म्हणून ‘निरूपणें मानस आवरावें ।’ असें श्रीसमर्थानी साधन सांगितले आहे. ज्ञेयवस्तुपरित्यागाद्विलयं याति मानसम् ।‘ ज्ञेयवस्तूच्या परित्यागाने मनोलय होतो, असे श्रीरामाचे सांगणे मुक्तिकोपनिषदांत आढळून येते.

मनसोऽभ्युदयो नाशो मनोनाश इति स्मृतः । (मुक्तिकोपनि. अ. २-३९) मन म्हणजे ठोकळ मानानें स्पंद, वृत्ति अथवा स्फुरण. तें न होऊ देणें मनोनाशाचे साधन आहे. वृत्ति, स्फूर्ति, स्पंद निर्माण होऊ दिला नाही तर कल्पनाच कसली न उमटता आपली स्थिति ज्ञेयशून्य ज्ञानाकारच सदोदित असते. अध्यात्मविद्याधिगमः साधुसंगतिरेव च । वासना संपरित्याग प्राणस्पन्दनिरोधनम् । एतास्ता युक्तयः पुष्टाः ‘ (मु. उ. अ. २-४४-४५) १. अध्यात्मज्ञानाची संप्राप्ति, २. श्रीगुरु अथवा साधु-समागम. मात्र तो गुरु अथवा साधु निवृत्तिमार्गाने जाऊन पूर्ण ब्रह्मनिष्ठ झालेला असला पाहिजे; ३. विषयांच्या ठिकाणचा दोष आणि अपाय ध्यानांत आणून देहाचें मिथ्यात्व व निःसारत्व, अशुचित्व दौर्गन्ध्य, मूलरूपत्व ओळखून वीट आणणाऱ्या घाणेरड्या विषयवासनांचा त्याग, ४. आणि प्राणायाम. अशी ही मनोजयाची साधनें मुक्तिकोपनिषदांत सांगितली आहेत. प्राणस्पंद निरोधात् सत्संगाद्वासनात्यागात् । हरिचरणभक्तियोगात् मनः स्ववेगं जहाति इति । हा श्लोक श्रीशंकराचार्यांचा आहे. (प्रबोधसुधाकर ७७ ) – हरिचरणाच्या ठिकाणी निःसीम भक्ति अथवा प्रेम बाळगण्याचे एक पूर्वीच्या श्लोकाहून अधिक साधन यांत सांगितले आहे. सा त्वस्मिन् परमप्रेमरूपा च । अमृतस्वरूपा च । (नारदभक्तिसूत्र) १) सा परानुरक्तिरीश्वरे।(शांडिल्य भ. सू. १) निरवधि प्रेमानें मन भृंगासारखे भगवच्चरणकमली देहभान विसरून रंगणे ही भक्ति होय. ईश्वरप्रणिधानाद्वा (पातं. यो. सू. स. पा. (२३) समाधिसिद्धिरीश्वरप्रणिधानात् । (सा.पा. ४५) (१) भक्तीनेंहि मनाचा लय होतो. विषाप्रमाणे विषयसुख बघून देहघाणीची कल्पना राखून निर्वासन होणे. (२) सर्वापूर्वील चिन्मात्र आनंदघन अशा आपल्या स्वतः सिद्ध, नित्य निर्विकल्प रूपाच्या दृष्टीने उठलेल्या वृत्ती, स्फुरण यांपासून कांहींच मला लाभ नाही. चंचल म्हणून माझ्यांत काहीच नाही, मी निश्चल आनंदरूप आहे, असे आत्मतत्त्व जाणणे. (३) असा निश्चय बाळगून वृत्तीच न उठू देण्याचा अभ्यास करणे. इत्यादि मनोजयावर अचूक उपाय लागू पडतात. मुख्य शक्तिपात ऐसा । नाहीं चंचळाचा वळसा ।असे श्रीसमर्थाचे सांगणे आहे.

home-last-sec-img