Literature

माघ वद्य प्रतिपदा

*समर्थ* ‘ हा शब्द श्रीसमर्थांना अन्वर्थक असाच आहे. समर्थ म्हणजे सामर्थ्यवान. सर्वप्रकारे संपूर्ण सामर्थ्य ज्याला प्राप्त झाले आहे तोच या समर्थ नांवास योग्य होय. ज्याप्रमाणे सर्व नद्या एकाच समुद्रास मिळतात. त्याप्रमाणे सर्व सामर्थ्य समर्थांमध्ये एकत्रित झालेले आढळते. अशक्त किंवा सामर्थ्यहीनास कोणीच समर्थ म्हणणार नाही. *’ यो वै ज्येष्ठश्च श्रेष्ठश्च | ‘* अत्यंत श्रेष्ठ अशा शक्तींनी उत्तम सामर्थ्य मिळविणारा, ज्याच्यापेक्षा अधिक सामर्थ्य असणारा कोणीही नाही असा जो महापुरूष तोच समर्थ होय. त्यास इतर कोणतीही उपमा देता येत नाही. अशा उपमारहित श्रेष्ठ अशा विभूतीलाच समर्थ म्हणणे योग्य होईल.

*’ गौरवात् गुरूः | ‘* सर्वांपेक्षा श्रेष्ठ असा जो कोणी असतो त्यालाच गुरू म्हणतात. गुरू, देव आदींच्या दर्शनास जातांना मन शुध्द असावे. राग वगैरे असल्यास गुरूचा अनुग्रह होणार नाही. मी विद्वान, मी श्रीमंत, मी अधिकारी अशा भावनेने जाण्यात मुळीच अर्थ नाही.

*’ निरहंकारी भूत्वा ब्रह्मेष्टं शरणमुपगम्य | ‘* या वचनाप्रमाणे निरहंकारी, निराभिमानी असावे. असाच मनुष्य गुरूच्या अनुग्रहास योग्य होय. श्रीसमर्थांच्या उत्सवात त्यांची सेवा केल्याने सामर्थ्य प्राप्त होईल. कोणतीच कमतरता असणार नाही. दृढनिश्चयाने सेवा केल्यास त्या सेवा करणाऱ्यांचे कल्याण होईल असे निश्चितपणे मी सांगतो

*श्रीसद्गुरूसमर्थ रामदासस्वामी महाराज की जय !*

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img