Literature

माघ शुद्ध एकादशी

जोपर्यंत मनुष्य अज्ञानी आहे तोपर्यंत त्याच्या हातून एखादा अपराध घडल्यास तो क्षमेला पात्र असु शकतो. पण समजून उमजून अपराध केल्यास क्षमा करणे अशक्यच. त्याचप्रमाणे पारमार्थिक विचार ऐकून ते समजून घेऊनही मोहवश होऊन पुन्हा विषयवासनेत गर्क होणे हे महा अपराध होय. ह्यावर आम्ही सर्वांनी संसार सोडावा काय ? असा आपण मला प्रश्न कराल त्याला ‘ नाही ‘ हेच उत्तर आहे. प्रपंच करीत असतांनाही परमार्थदृष्टीनेच वागले पाहिजे.
रोगनिवृत्तीकरता विषाची शुध्दी करून त्याचा उपयोग करतात. विषयांना सत्कर्म, सदुपासना, सद्विवेक यांनी शुध्द करून विषयव्यामोहरूपी भवरोगाच्या निवृत्तीसाठी औषधाप्रमाणे सावधानतेने त्या त्या आश्रमधर्माचा अल्पल्प उपयोग केल्यास आपण क्रमाक्रमाने निर्विषय आत्मसुखप्राप्तीस योग्य व्हाल.
पुढील एका श्लोकाची तुम्हाला आठवण करून देऊन आजचा विषय पुरा करतो.

*’ शृयतां धर्मसर्वस्वं यदुर्क्त ग्रन्थकोटिषु |*
*परोपकारः पुण्याय पापाय परपीडनम् || ‘*

‘ परोपकार म्हणजेच पुण्य व परपीडा म्हणजेच पाप ‘ असे श्री व्यासांनी कोटिग्रंथतात्पर्यरूप धर्मसर्वस्व सांगितले आहे.
आपण प्रवृत्तीमार्गावलंबी असला तरी जितेंद्रिय होऊन मनोनिग्रहाने गुरूदेवांच्या अनुग्रहास पात्र व्हा ! जन्मसार्थक करून घेण्याची इच्छा ठेवा ! परमेश्वर आपणा सर्वांना अनुग्रह करो !!

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img