Literature

माघ शुद्ध तृतीया

जगांत दिसणारे सुख हे भ्रमरूप माया आहे आणि व्यक्त असणारे सर्व नाशिवंत आहे. म्हणूनच ते अस्थिर आहे असे समजून उमजून घेतले पाहिजे. शुध्द शाश्वत सुख कधीही इंद्रियगम्य नसते. ते अदृश्य आहे. सत्य, शाश्वत वस्तु नेहमी अदृश्यच असते याचा विसर पडता कामा नये. अस्थिराचा त्याग करून स्थिर सुख शोधीत शोधीत पुढे गेल्यास कधीतरी एखाद्या दिवशी मनुष्य स्थिरमार्गास जाईल यात काही संदेह नाही. बुद्धिमंत मनुष्य या निर्विषयी असणाऱ्या मार्गाचाच अवलंब करतो. अविवेकी मात्र पुन्हा पुन्हा विषयरूपी काटेरी मार्गात भटकत भटकत, कंटाळून जाऊन शेवटी एकाएकी मरण पावतो, पुन्हा जन्मतो, पुन्हा मरतो व अशाप्रकारे त्या अंत नसणाऱ्या संसार चक्रात फेऱ्या मारीत असतो.
अशुध्द मनावर संस्कार करून ते शुध्द करण्यासाठी नाना प्रकारचे प्रयत्न करावे लागतात. मानवीजन्माची सार्थकता ओळखून मनाचे समाधान करणे आवश्यक आहे. मन एकदा समाधानी झाले व त्याने विषयाची आशा सोडली की त्यास आत्मानुभूतीची गोडी वाटू लागते. आत्मतृप्तीच सुख होय. विषयसुखोभोगात तृप्ती नाही म्हणजेच सुख नाही अशी खात्री झाल्यावरच मन विषयसुखाकडे फिरकणारही नाही. त्यावेळी जीवनधारणावश्यक अशी प्रापंचिक साधने प्राप्त झाली तरी तेवढ्याने मन समाधानस्थितीस येऊ शकेल.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img