Literature

माघ शुद्ध द्वादशी

गरीब मनुष्य एखाद्या सावकाराकडून कर्ज मागुन आणतो. कष्ट, संकटे इत्यादि सहन करून आप्टेष्टांचा दुवा घेतो व त्यांचे रक्षणही करतो. परंतु परमात्म्याकडे याचना करीत नाही. कारण त्याच्यामध्ये ती योग्यताच नसते ; त्याला परमात्म्याच्या शक्तीची कल्पनाही नसते. कारण त्यांचे मन तितके सुसंस्कृत झालेले नसते.

*’ आदरेण यथा स्तौति धनवन्तं धनेच्छया |*
*तथा चेत्परमात्मानं को न मुच्येत बन्धनात् || ‘*

‘ कर्ज मागणारा सावकाराकडे जाऊन, कर्ज मिळावे म्हणून विनय व आदराने त्या सावकाराची स्तुती करीत असतो. जर तेवढ्याच प्रमाणात मनुष्याने परमात्म्याची स्तुती केली तर तो मुक्त होणार नाही काय ? असेच वरील उपनिषदवाक्यात म्हटले आहे.

*’ ये यथा मां प्रपद्यते तांस्तथैव भज्याम्यहम् | ‘*

जे ज्या प्रमाणात व ज्या दृष्टीने माझी प्रार्थना करतात त्याच प्रमाणात मीही त्यांना प्राप्त होतो ‘ असे श्रीकृष्ण भगवानांनी म्हटले आहे. ‘ तुझ्याशिवाय मला अन्य गती नाही ‘ असे जो भक्तियुक्त अंतःकरणाने म्हणून मला शरण येतो त्याचे मी रक्षण करतो ‘ असे अभयवचन परमेश्वराने दिले आहे.
अनन्यभक्तीशिवाय परमेश्वराला इतर कशाचीही, कोणतीही अपेक्षा नसते.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img