Literature

माघ शुद्ध नवमी

आम्हाला जागविण्याची क्रिया निरंतर चालावी म्हणून श्रीसमर्थांनी श्रीमत् दासबोधाची उत्कृष्ट रचना करून ठेवून आम्हाला कितीतरी उपकृत केले आहे. श्रीमत् दासबोधात काय आहे हे *’ मुख्य हरिकथा निरूपण | दुसरे ते राजकारण | तिसरे ते सावधपण | सर्व विषयी || हरिकथा निरूपण | बरेपण राजकारण | प्रसंग पाहिल्याविण सकळ खोटें || हरिकथा निरूपण | नेमस्तपणे राजकारण | वर्तायाचे लक्षण | तेहि असावे || प्रपंची जाणे राजकारण | परमार्थी साफल्य विवरण | सर्वांमध्ये उत्तम गुण | त्याचा भोक्ता || ‘* ह्या ओव्यावरून स्पष्ट होईल. यातुन सांगावयाचे काही राहिले आहे कां ? येथे जे सापडेल तेच दुसरीकडे सापडेल व जे येथे नाही ते अन्यत्र कोठेच सापडणार नाही. *’ हरिकथा निरूपण ‘ चा ‘ सगुण कथा या नांव किर्तन | अद्वैत म्हणजे निरूपण | सगुण रक्षून निर्गुण | बोलत जावे || ‘ असा खुलासा केला असून ‘ करूणा कीर्तनाच्या लोटे | कथा करावी घडघडाटें | श्रोत्यांची श्रवणपुटे | आनंद भरावी || भक्ति ज्ञान वैराग्य लक्षण | नीति न्याय स्वधर्म रक्षण | साधनमार्ग अध्यात्म निरूपण | प्रांजल बोलावे ||* असे सांगितले आहे. *’ आधी केले मग सांगितले | ‘* असा श्रीसमर्थांच्या आचरणाचा दंडक आहे. ज्याचा उपदेश श्रीसमर्थांनी शिष्यांना केला तो समग्र श्रीमत् दासबोधात आहे. राष्ट्राच्या अभ्युदय निःश्रेयसाकरता जे पाहिजे ते सर्व या ग्रंथराजातुन भरलेले आहे. तसेच जे नको ते मात्र काहीच नाही हेही खरे आहे.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img