Literature

मार्गशीर्ष वद्य नवमी

धर्म उन्नतशील व उत्कृष्ट नीती शिकवतो. ज्याच्यामुळे स्वपर जीवन सुखी होत तोच धर्म होय.परस्परांच्या सहाय्यानेच मानवीजीवन चालत असल्याने तन, मन, धन, विद्या आदिंच्याद्वारे एक दुसऱ्यास सहाय्य करा अशी धर्माची शिकवण आहे. सुख-दुःख, लाभ-हानि, निंदा-स्तुती, अनुकूल-प्रतिकुल, संपत्ति- विपत्ति, क्षुधा-तृषा इत्यादीमध्ये आपल्याप्रमाणे दुसऱ्यांनाही अनुभव असतात ही भावना ठेवुन स्व-परहितासाठी अखंड प्रयत्न करीत रहा असा धर्माचा उपदेश आहे. भिन्न भिन्न अवस्थांमध्ये, निरनिराळ्या प्रसंगात, निरनिराळ्या संबंधामध्ये स्व-पर उपकारक आदर्श क्रियांची शिकवण व दीक्षा धर्म देतो. सर्वांच्या सुखशांतीसाठी जीवनपयोगी तसेच मोक्षोपयोगी अशी शुध्द निर्दुष्ट कर्मे धर्म दर्शवीत असतो.

जागृतीपासून, सुषुप्तीपर्यंत, जन्मापासून मरणापर्यंत कामादि विकारांना थोडाही अवसर न देता वेदांताच्या विचारात मग्न रहाणे म्हणजेच एकमेव ब्रह्माचे चिंतन करणे, सर्वत्र अद्वितीय स्वरूपाचेच दर्शन करणे इत्यादि उपनिषदांच्या आज्ञा होत व त्या आज्ञानुसार वागणे हाच धर्म होय. आत्मज्ञान व तितिक्षा हा सर्वसाधारण धर्म आहे असे महाभारतात म्हटले आहे. *’धर्मामाचीं मुख्य धर्म | स्वरूपी राहणे हा स्वधर्म |’* ह्या श्रीसमर्थ रामदास स्वामी महाराजांच्या वाक्याची येथे आठवण होते.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img