Literature

मार्गशीर्ष शुद्ध नवमी

*’ तद्विज्ञानार्थ स गुरूमेवाभिगच्छेत | समित्पाणि: श्रोत्रियं ब्रह्मनिष्ठम् | ‘* त्याचे म्हणजेच सत् स्वरूपाचे परिज्ञान होण्यासाठी श्रोत्री, ब्रह्मनिष्ठ अशा गुरूला शरण गेले पाहिजे ‘ असे श्रुति म्हणते. प्रतिक्षणी बदलणाऱ्या या जगाचे यथार्थ स्वरूप कोणते ? रात्रंदिवस सुखासाठी धडपडणाऱ्या मानवाच्या पदरी दुःखच पडते. याला कारण काय ? गुरूकृपेने काय प्राप्त होते ? अद्वितीय असा गुरू आपणास कशाची प्राप्ती करून देईल ? त्याच्याजवळ देण्याजोगी अशी जी आत्मवस्तु म्हणजेच स्वतःचे सुखस्वरूप हेच नाही काय ? या सर्व प्रश्नांचे उत्तर म्हणूनच गुरू स्वतः शिष्याच्या रूपांतच एकरूप होतो. त्याने शिष्यास अद्वितीयत्व येते. गुरू स्वतःच्या सत्यस्वरूपाची जाणीव शिष्यांत उत्पन्न करतो आणि हे तत्त्वस्वरूप अद्वितीय असल्याने ते जाणणाराही ब्रह्मस्वरूप होतो.

श्रुतिमातेने शिष्यांची लक्षणे सांगितली आहेत. प्रथम त्याने सद्गुरूस शरण गेले पाहिजे. नम्रता व श्रध्दायुक्त अंतःकरणाने गुरूची अद्वितीय सेवा करून गुरूंचा अनुग्रह मिळवला पाहिजे. श्रध्दाभक्तियुक्त सेवेने तृप्त झाल्यावर गुरूमुखामधुन आशिर्वाद बाहेर पडतो त्यालाच *’ अनुग्रह ‘* म्हणतात. तो अनुग्रह क्रमाक्रमाने सेवा करणाऱ्या शिष्यासच प्राप्त होतो. ‘ पराकाष्ठा ‘ हे लक्ष्य ठेवून त्यागमय सेवा करण्याची बुध्दी बाळगणाऱ्यासच ‘ परिज्ञान ‘ प्राप्त होते. सेवेने संतुष्ट झालेल्या मनास प्रश्न केल्यास ‘ कल्याण होवो ‘ हेच उत्तर मिळते.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img