Literature

मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी

परममंगल अशा आत्मीय सुखावर बाह्यसुखाचा आरोप केला जातो. चित्रातील सरोवरांत दिसणारे पाणी दिसत असून नसते. त्यातून पिण्यासाठी पाणी मिळू शकत नाही. तद्वत प्रपंचातील सुखांत सुख नसल्याने त्याच्यापासून शांति, समाधान व खरे सुख मिळु शकत नाही.

वास्तविक सुखस्वरूपास जाणून आम्ही आत्मदृष्टी ठेवणारा पुरूष मृत्यू पावत नाही. त्यास रोग उत्पन्न होत नाहीत; त्याला दुःखाचा अनुभव घ्यावा लागत नाही; तो सर्वत्र भरलेल्या एकमेव अशा आपल्या आनंदघनस्वरूपासच पहातो व तदरूप होऊन जातो असे श्रुती सांगते. हा मानवजन्म मोक्षप्राप्तीसाठीच योग्य मानला जातो व तसा प्रयत्न करणे हीच त्याची योग्यता. अर्थात आपल्या सच्चिदानंदस्वरूपास जाणून घेऊन त्या निरवधि आनंदस्थितीत रहाणे हेच खरे सुख होय व हेच मानवीजीवनाचे मुख्य ध्येय होय.

श्रीदत्तात्रेय अखिल विश्वातील लोकांचे दुःख निवारण करून त्यांना देहसुखाच्या घाणीतून उध्दरून तत्त्वज्ञानाच्या पावन तीर्थाचे स्नान घालोत; त्यांच्यातील हिंसावृत्ती व रागद्वेष नष्ट करून त्यांना समत्वाचा उपदेश करीत; वेदविहित निष्कामकर्म, एकान्तिक भक्ति, निर्विषयस्थिती, विश्वात्मभाव, स्वार्थत्याग, जनहितदक्षता, जगदुद्धारता आदि गुणांनी मंडित करीत व अशाप्रकारे सर्व लोक आत्मतृप्तीचे जगत्मंकलकर दिव्यजीवनाचा उपभोग घेवोत !!

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img