Literature

मोक्षाचा किंवा मुक्त स्वरूपाचा अभ्यास

निर्मानमोहा जितसङ्ङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्त कामाः । द्वन्दैविमुक्तः सुखदुःव संज्ञैर्गच्छन्त्यमूढाः पदमव्ययं तत्‘ (भ.गी. १५-५) मानापमानाचा प्रश्न ज्यांचा नाहींसा झाला आहे; विषयव्यामोह ज्यांच्या वाऱ्यालादेखील उभा रहात नाही; संगदोष पूर्ण जिंकल्यामुळे ज्यांच्यावर थोडासुद्धा परिणाम करू शकत नाहीं; जे सदैव आत्मनिष्ठ असतात जे अखंड निर्विकार अथवा निष्काम झाले आहेत, जे सुखदु:खादि द्वंद्वापासून पार मोकळे झाले आहेत; असे ज्ञानी मात्र त्या ब्रह्मपदास पोहोचतात. असे हे पद गांठणे अभ्यासाशिवाय शक्य नाही. अभ्यासावीण एक क्षण राहूच नये ॥ अशी निःस्पृहांना श्रीसमर्थांची शिकवण आहे. भगवद्गीतेंत सहाव्या अध्यायाच्या चौतिसाव्या श्लोकांत योग, योगानंद, योगी यांची लक्षणे सांगून झाल्यानंतर भगवंतांना अर्जुनाने प्रश्न केला: चञ्चलं हि मनः कृष्ण प्रमाथि बलवद् दृढम् । तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम् ॥ ( भ.गी ६-३४) तूं सांगितलेंस ते सर्व एकून घेतले. पण कृष्णा, हे मन प्रमादशील मोठे हट्टी, सहजासहजी वांकविता न येण्यासारā, मोठें बलवान् आहे. याचा निग्रह करावयाचा कसा?” 

त्यावर भगवंतांनी उत्तर दिलें: असंशयं महाबाहो मनो दुनिग्रहं चलम् । अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते ॥ (भ. मी. ६-३५), असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मतिः । वश्यात्मना तु यतता शक्योऽवाप्तुमुपायतः ॥ (भ.गी. ६-३६) । अर्जुना ! तू म्हणतोस ते अगदी खरे असले तरी सतत अभ्यासानें आणि वैराग्याने चंञ्चल आणि दुनिग्रह मनावर जय मिळविणे शक्य आहे. आणि तो मिळवावाच कारण मनाच्या दिल्या माणसाला योगाची प्राप्ति होऊच शकत नाहीं. पिच्छा पुरविणाऱ्या प्रयत्नशील, निग्रही माणसाला मात्र याची प्राप्ति उपायांनी कालान्तराने होते. येथे अभ्यास वैराग्याभ्यां तन्निरोधः। हे समाधिपादांतले बारावें पातञ्जलसूत्र आठवते. अभ्यास आणि वैराग्य यांच्या बळावर मन जिंकता येते. परमार्थाचा अभ्यास म्हणून जो करावयाचा तो म्हणजे एक वृत्ति उठून दुसरी वृत्ति उठण्याच्या मध्यस्थितीत, उठणाऱ्या पुढच्या वृत्तीस प्रकाशविणारे निर्विकल्प ज्ञानानन्द रूप जे आपण असतो, तेच आपले स्वरूप म्हणून ओळखून त्या निष्प्रपञ्चः निर्विकल्प ज्ञानमात्रर्तेत, त्या आनंदघनतेंत अधिकाधिक वेळ वृत्तीचा निरोध करून, पुढची वृत्त न उठू देता राहण्याचा अभ्यास यालाच मोक्षाचा अभ्यास हे नांव आहे. अथवा याला मुक्त स्वरूपाचा अभ्यास म्हणता येईल.

या अभ्यासाला दृश्य पदार्थाचा मोह म्हणजे त्याची भोग बासना आडवी येते. यापूर्वी सांगितल्याप्रमाणे अभ्यास करीत दृश्य शून्य करावें. द्रष्टा दृश्यवशाबद्धः दृश्याभावे विमुञ्चते। द्रष्टा दृश्यामुळे बद्ध झाल्यासारखा वाटतो. आंतल्या कल्पनात्मक् दृश्याचा अभाव झाला कीं, तो सर्व वासनांपासून मुक्त होऊन निर्विकल्प होतो. दृश्यं हयदृश्यतां नीत्वा ब्रह्माकारेण चिंतयेत् ।। वर उसळणाऱ्या सूक्ष्म स्फूर्तीपासूनचे सर्वहि दृश्य अदृश्य करून, विलीन करून निश्चळ निर्विकल्प चिदानंदमात्र असावें म्हणजे आपल्या ब्रह्मरूपाने असावें. मीच अथवा मी हा आनंद अशी अनंत अशी निर्विकल्प आनंदरूपी नुसती वृत्ति उठली तरी पुरे आपली. निर्विकल्प चिदानंदरूप विसरून आपल्या स्वरूपांत आपल्या स्वरूपाचा आभास उत्पन्न झाला, हे आपले मिथ्या ज्ञान झाले, हे लक्षात आणून निर्विकल्प राहण्याचा सतत अभ्यास चालविला पाहिजे. निर्विकल्प स्वरूपांत सर्वप्रथम मी हा असा केवळ आनंदरूप आहे, असे स्फुरतें. सर्व वृत्तीचा आणि स्फुरणाचा हाच एक मूळचा खरा अर्थ आहे. स्फुरणांत या वेगळ्या भासणाऱ्या देहाकाराला, वैषयिक कल्पनांना तात्त्विक असा काही अर्थच नाहीं. इथे मी आणि माझ्या आनंदरूपाची स्मृति याहून दुसरें कांहीं नाहींच, असा निश्चय बाळगावा. मीअसे स्फुरल्याबरोबर स्वरूपावस्थितिर्मोक्षः तद्भ्रंशोऽहंत्ववेदनं । निर्विकल्प आनंदमात्र होऊन राहणे म्हणजे आपली स्वरूपस्थिति आणि मी म्हणून स्फुरले की, ती स्वरूपच्युति तें आभासज्ञान झालें, अशा दृष्टीनें वृत्तिनिरोधाचा अभ्यास सतत करावा. या अभ्यासानें वैराग्यहि लाभतें आणि मोक्षहि लाभतो. अभ्यास आणि वैराग्य हे केवळ अन्योन्याश्रित आहेत; म्हणून दोन्हीला श्रीपंतजलि मुनींनी एकाच सूत्रांत गोविलें. स्वरूपाच्या अनुभवाने उमलणारी अनंत स्वरूपानंदाची वृत्तिहि जर आपल्यांत आभास ज्ञान निर्माण करून ती भ्रमात्मक ठरते, तर देह, विषय, जगत् ,कामादि विकार यांना अर्थच काय उरतो, असे वाटून मन इकडे तिकडे जात नाहीं.

एवं बुद्धे: परं बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना । जहि शत्रुं  महाबाहो कामरूपं दुरासदम् ॥ ( भ.गी. ३-४३) अहं ब्रह्मास्मि म्हणजे मी आनंदरूप आहे. या वृत्तिज्ञानाच्या पूर्वीच निर्विकल्प आनंदमात्र आपले स्वतःसिद्ध स्वरूप निश्चळ आहे. पु वृत्ति उठली की ती स्थिति हरपली म्हणून वृत्तिनिरोध कर. सर्व वासना, कामना, कल्पना, भावनांना जिंक. कामाचा नाश कर. असा श्रीकृष्ण भगवानांचा थोडक्यांत उपदेश आहे. दृश्यांत, या देहांत, देहसुखांत आहे काय ?स्वदेहाशुचिगन्धेन न विरज्येत यः पुमान् । विरागकारणं तस्य किमन्यदुपदिश्यते ॥ (मुक्ति कोपनिषत् २-६६) आपल्यालाच वीट आणणाऱ्या देहाच्या प्रत्यक्ष भास किळसवाण्या दुर्गंधानें ज्याला वैराग्य उत्पन्न होत नाही, त्याला का अजून कोणत्या उपदेशानें वैराग्य उत्पन्न होईल ? देहे चेत्प्रीति मान्मूढो भविता नरकेऽपि सः ।स्वपरदेहावर प्रीति करावयाची असे झाल्यास ती नरकावरहि का करू नये ? हें प्रिय देहाचें खरें स्वरूप म्हणून शौचकूप न सोडतां व पाटी नेणाऱ्यालाहि न नेऊ देता कोणी राहिलेले तसे आढळून येत नसल्यामुळे तत्त्वतः देह कोणाला प्रिय नाहीं, कोणी कोणाच्या देहावर प्रेम करीत नाही या आणि देहालाहि पण कोणी मीम्हणून मानीत नाही. मानणेहि अस्वाभाविक आहे. मोक्षसाधनाच्या दृष्टीनें देहाची मातब्बरी एरवी कोणाला कोण विचारतों ? शवाला पुरलें, जाळले तरीहि कोणी विचारीत नाही. मोक्षाच्या साधनाच्या दृष्टीनें धन्य धन्य हा नरदेहो। येथील अपूर्वता पाहो। जो जो कीजे परमार्थ लाहो (साधन) । तो तो पावें सिद्धीतें ॥ (दा. १-१०-१) या नरदेहाचेनि संबंधे । बहुत पावले उत्तमपदे । अहंता सांडून स्वानंदे । सुखी जाले ॥ (दा. १-१०-१९)

पुरमेकादशद्वारमजस्यावक्रचेतसः । अनुष्ठाय नः शोचति विमुक्तश्च विमुच्यते, एतद्वै तत् ॥ (कठ. २-२-१) अकरा द्वारांनी (रंध्रानीं) युक्त असणारा हा देह जन्मनाशशून्य ज्ञानरूप आत्म्याची नगरी आहे. त्या आत्म्याचे देहांत दर्शन घेतले म्हणजे अज्ञानात्मक काम-कर्म-अविद्येपासून सुटून जीव मुक्त होतो. भोग्य दृष्टीने अथवा त्याला मीम्हणून मानायला देहांत काय आहे? ‘पहातां शरीराचे मूळ | या ऐसें नाहीं अमंगळ । रजस्वलेचा जो विटाळ । त्यामध्ये जन्म यासी ॥ (दा. ३-१-११). त्याचेच बनलेले. अत्यंत दोष ज्या विटाळा । त्या विटाळाचाचि पुतळा । तेथे निर्मळपणाचा सोहळा । केवि घडे ॥ (दाः ३-१-१२). इथे सौंदर्याचा अर्थ काय करावयाचा ? कातडी, रक्त, मांस आणि केश हे साडेतीन धातु स्त्रीदेहगत रजाचे व स्नायु, अस्थि, मेद आणि नख हे साडेतीन धातु पुरुष देहगत रेताचे मिळून सात धातूंचा हा देह आहे. नख आणि केश यांना अर्ध धातु मानले आहे. देह म्हणजे रज-रेत आणि त्यापासून झालेल्या घाणेरड्या धातूचा किळस आणणारा हिडीस संग्रह, देह परमार्थी लाविलें। तरीच याचे सार्थक झालें।” आणि भोगांत वेचले तर ? ? नाहीं तरी हें वेर्थचि गेलें । नाना आघा (दुःखें) मृत्युपंथें ।। (दा. १-१०-६१). येकांती विवेक करावा । आत्माराम वोळखावा । येथून तेथवरी गोवा । कांहींच नाहीं ।। (दा. १९-६-३०). उपासना सकळां ठाई। आत्माराम कोठें नाहीं । याकारणें ठाइं ठाइं। रामें आटोपिलें । (दा. १५-९-२८) देवपद आहे निर्गुण । देवपदीं अनन्यपण । हाचि अर्थ पाहतां पूर्ण । समाधान बाणे ॥ (दा. ६-९-३२)  Everything that glitters is not gold. Things are not what they seem. Appearances are dellusions.- आंग्लविद्याकोविदांना हीं वाक्ये माहीतच आहेत. सृष्टीत कांहीं नाहीं ना ? मग सृष्टि ही मिथ्या हे पटले का ? पटले नसल्यास श्रीसमर्थ कसें पटवितात ते पाहू. श्रीसमर्थ पुढे काय म्हणतात तें ऐकू- येकी कल्पनेची सृष्टी । दुजी शाब्दिक सृष्टी । तिजी प्रत्यक्ष सृष्टी । जाणती सर्व ॥ (दा. ६-६-५१) चौथी चित्रलेपसृष्टी । पांचवी स्वप्नसृष्टी । साहावी गंधर्वसृष्टी । ज्वरसृष्टी सातवी ।। (दा. ६-६-५२) आठवी दृष्टिबंधन । ऐशा अष्ट सृष्टी जाण । यामध्ये श्रेष्ठ कोण । (कोणतीहि नाहीं, कोणती–) सत्य मानावी ॥‘ (दा. ६-६-५३) कोणतीहि नाही. निर्गुणासी नाहीं जन्ममरण । निर्गुणासी नाहीं पापपुण्य । निर्गुणी अनन्य होतां आपण । मुक्त जाला || (दा.६-३-३३). जालियां तत्त्वांचें निर्शन ।निर्गुण आत्मा तो चि आपण । कां दाखवावें मीपण । तत्व निर्शनाउपरी ? ॥ (दा. ६-३-३०) जेथे नाहीं दृश्यभान । जेथे जाणीव हें अज्ञान । विमळ शुद्ध स्वरूपज्ञान | यासि बोलिजे ॥” (दा. ५-६-५).

home-last-sec-img