Literature

मोक्ष

मीपणाची जाणीव म्हणजे देहस्थिती नसून स्वस्वरूप आनंदच होय. त्या अपार आनंदाचा अनुभव घेत घेत मीपणाची जाणीव शिल्लक राहिली म्हणजेच त्याला आत्मसाक्षात्कार किंवा स्वरूप साक्षात्कार झाला असे म्हटले जाते. अशा रीतीने दुःखाची जाणीव न होता देहभावाचा अभाव होऊन कोणतीहि चिंता न राहातां केवळ एक आनंदाचा अनुभव शिल्लक राहाणे म्हणजेच जीवनमुक्ति होय. ह्यालाच कैवल्य किंवा ‘मोक्ष’ असेहि म्हणतात. ही आत्मचिंतनाची शेवटची सिद्धी होय. हेच आत्मज्ञानाने प्राप्त होणारे शेवटचे फळ होय. सिंधूमध्ये पडलेला बिंदू सिंधूरूपच होतो, त्याचप्रमाणे सर्व विषयसुख जाणीवरूपी जीव अनंतसुखरूपी परमात्म्यांत एकरूप होऊन म्हणजेच सायुज्यता प्राप्त करून आपले मूळस्वरूप प्राप्त करून घेतो, त्यालाच ‘मोक्ष’ म्हणतात. सुखासाठी संसारात आलेला जीव सर्व विषयांची दुकाने हिंडून, तेथे सुखप्राप्ती न झाल्याने शेवटी परमात्म्यावर निष्ठा ठेवून त्याच्याच कृपेने, श्रीसद्गुरुमुखाने आत्मज्ञान मिळवून, संसारसुखांतून बाहेर पडून आपल्या मूळ स्वरूपात म्हणजेच परमात्म्यात, केवळ सुखानंदरूपांत विलीन होतो; म्हणजेच तो स्वतः केवळ आनंदचहोतो आणि ह्यालाच ‘मोक्ष’ म्हणतात.

ज्याच्यामध्ये कोणतेही दुःख नसून केवळ आनंदच असतो त्यासच ‘मोक्ष’ म्हणतात. ह्याच देही व ह्याच डोळा आपले मरण पाहून व जन्महि पाहून तेथे दुसरे काहीही न राहता स्वतःच शिल्लक राहणे ह्यालाच जीवन्मुक्ती म्हणतात. स्वतःची जाणीव आपल्या अनंतानंत आनंदयुक्त आद्य परमात्मरूपात विरघळून गेल्याचे म्हणजे विलीन झाल्याचे पहाणे हेच आपले मरण. आत्मज्ञानाच्या दृष्टीने मरण म्हणजे स्वतःची चंचलरूपी जाणीव नाहीशी होणे. निश्चल, यथार्थ अशा आनंदरूपात नित्य निर्विकल्प असणे म्हणजेच देहद्वैत बालवून अद्वैत असे निजरूप जेथे इतर कांहीहि नाही असे स्वतःच शिल्लक राहणे. मोक्षासाठीच एखादे नाव धारण केलेला देह असतानाच अशा प्रकारे मरण पत्करून जो जन्मास येतो तो स्वतःच स्वतः असतो. अशाला त्यानंतर गर्भवास नाही व मृत्यूही नाही. जन्ममरणावर विजय मिळून ‘गुरुप्रसादेन मुक्तो भवति पार्वति ।” ह्या श्रीशंकरांनी पार्वतीस उद्देशून सांगितलेल्या वचनाप्रमाणे गुरुप्रसादाने मोक्षानंद सौभाग्य प्राप्त होऊ शकते हेच स्पष्ट होते. अनन्य भक्तीने केलेली गुरुसेवा परमानंदरूप दिव्य फल देते. जीवनमुक्ताचा देह महासागरात पडलेल्या बर्फाप्रमाणे वितळून आनंदरूपी महासागरात विरून जातो. त्यानंतर देहभास नष्ट होऊन तो आनंदब्रह्मरूप परब्रह्मच होतो. तेथे आनंदाशिवाय दुसरे काहीहि असत नाही.

‘क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे च पार्वति ।’ ज्ञानी मनुष्याचे संचित, प्रारब्ध व कर्म ही सर्व नष्ट होऊन तो पुन्हा जन्मास येत नाही. ब्रह्मसाक्षात्कारानंतर ‘न पुनरावर्तते । न स पुनरावर्तते । पुनर्नाभिजायते । पुनर्नाभिजायते ।” आत्मज्ञानी पून्हा मृत्युलोकात येत नाही. तो कोणत्याही लोकात पुन्हा जन्म घेत नाही हे स्पष्ट करण्यासाठीच वेदानी त्याचा पुनरुच्चार केला आहे. ‘परेऽव्यये सर्व एकी भवन्ति ।’ ज्ञानी मनुष्याचे प्राणादि सर्व कांही त्या अविनाशी आनंदातच एकरूप होऊन नाहीसे होते असे श्रुतिवचन आहे.

संचित, प्रारब्ध व आगामी असे कर्माचे तीन प्रकार आहेत. अनेक जन्मांना कारणीभूत असणाऱ्या कर्मास ‘संचित’ असे म्हणतात. एका जन्मातच शेकडो जन्मांना कारणीभूत असे कर्म व संकल्प जीव करीत असतो. त्यातील ह्या जन्मास कारणीभूत असणाऱ्या कर्मास ‘प्रारब्ध’ असे म्हणतात आणि पुढील अनेक जन्मास कारणीभूत ठरणाऱ्या ह्या जन्मातील कर्मास ‘आगामी’ असे म्हणतात. देहसुखाची वासनाच जन्मास कारणीभूत होत असते. ती वासना आत्मसुखाच्या अनुभवाने घालविता येते व स्वतः आनंद ब्रह्मस्वरूपात विलीन झाल्यामुळे पुढील अनेक जन्मांना कारणीभूत असणारी संचित, प्रारब्ध, आगामी इत्यादि कर्मे ज्ञानी लोकांच्या ‘मी निश्चितपणे आनंदरूप ब्रह्म आहे’ ह्या जाणिवेमुळे संपूर्ण नष्ट होऊन व त्यांच्या जन्मास कारणीभूत असणारे प्रारब्ध प्यमान संपेपर्यंत आपली फळे देऊन आपोआपच नष्ट होते. ज्ञानी मनुष्यांची पापपुण्ये, त्यांचे हितचिंतक व त्यांचा द्वेष करणारे ह्यांच्यामुळे नष्ट होतात. अशा प्रकारे जनन-मरणास कारणीभूत असलेल्या तिन्ही कर्मापासून मुक्त ह्या जनन-मरणाच्या चक्रात ते पुन्हा सापडत नाहीत असे श्रुतिमाता सांगते

सूर्यकिरणाप्रमाणे आनंदरूप स्वयंप्रकाशी असा असलेला ‘मी’ एक प्रकाशकिरणच आहे, अशी ज्याची दृढ कल्पना आहे त्यास कोणत्याहि कल्पनांची बाधा न होता, ज्याप्रमाणे महासागरातील लाटा महासागरांतच विलीन होतात त्याप्रमाणे त्याच्या सर्व कल्पना आनंदरूपातच विलीन होतात. पाण्यावर लिहिलेल्या अक्षराप्रमाणे ह्या सर्व कल्पना आनंदरूपातच एकरूप पावतात.

‘मी अद्वितीय आहे’ ही जाणीव आनंदरूपाशिवाय इतर कोठेहि असू शकत नाही. माझ्या ठिकाणी इतर दुसरे काहीही नाही असे निश्चित ज्ञान सातत्याने असणे किंवा त्या स्वरूपाचे ज्ञान म्हणजेच प्रकाश. त्या प्रकाशामुळे देहात असलेल्या कामक्रोधादि विकारांच्या बाधेने मनाच्या ज्या कल्पना आहेत त्यांना बाह्यप्रपंच दृश्यानेसुद्धा बहिर्मुखता राहू शकत नाही. त्याचे मन दिसेनासे होते. त्या प्रकाशामुळे जन्ममरणाची कल्पना नष्ट होते आणि त्यालाच ‘मोक्ष’ म्हणतात.

इति शम्!

home-last-sec-img