Literature

वैशाख वद्य अष्टमी

परमात्मा हा स्वयंप्रेरित राजा आहे. राजा महाराजांनाही शासन करण्यायोग्य असे दिव्य अधिकार त्या महाप्रभूस आहेत. तो केवळ नरलोक, भूलोक यांचेच राज्य करतो असे नसून तो अखिल विश्वावर राज्य करतो.

सूर्य, चंद्र, इंद्र, अग्नि, वायु, यम हे सर्व महाशक्तिमान आहेत. परंतु ते सर्व परमात्म्याच्या आधीन आहेत. परमात्मा जसे सांगेल त्याची भीती बाळगून, त्याच्या अंकित राहून आपले कार्य ते करीत असतात. परमात्म्याच्या आधीन राहूनच वारा वाहतो, सूर्य उगवतो, अग्नि प्रकाशमान होतो. इंद्र पाऊस पाडतो व यम ज्यांचे आयुष्य संपले आहे, अशांना आपल्या लोकांत घेऊन जातो असे नसते तर वारा वाहिला नसता. सूर्य, चंद्र केव्हाही उदय पावून केव्हाही अस्तंगत झाले असते. अग्नि पेटला नसता तर स्वयंपाक तयार झाला असता का ? यमराज जगातील सर्व मानवास एका क्षणात त्यांच्या लोकी घेऊन गेले असते अथवा या सर्वांची उठाठेव मी कशाला करू ? असे यमराजाने ठरविले असते तर या जगांत कोणीही मेले नसते व असे झाले असते तर दिन-प्रतिदीन जगातील प्रजा वाढून असंख्य झाली असती. मग त्या सर्वांना अन्न, वस्त्र मिळणे अशक्यच. आजकालच्या प्रजेची चिंता वाहणाऱ्या राजकारणी मंडळींनी मग काय केले असते ? ही एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. परमात्म्याच्या शासनांतर्गतच ही सृष्टी आहे. तसे नसते तर जगातील सर्व नियमांचे उल्लंघन होऊन सर्वच अव्यवस्था माजली असती.

श्री प.प. सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी

home-last-sec-img