Literature

वैशाख वद्य द्वितीया

तुम्ही ऐकणें व मी सांगणे ह्या क्रिया शक्तीरूपच होत. परमात्मा आपल्या अंतरंगामध्ये असून त्याच्याच प्रेरणेने वाचाशक्ति प्रेरित होते व म्हणूनच मी बोलू शकतो. तुमच्यात ऐकण्याची शक्ती त्यानेच प्रेरित केली असल्याने तुम्ही ऐकू शकता. संपूर्ण जगतातील सर्व व्यवहारांची मूळाधार परमात्मशक्तीच होय.

‘ ज्या वनांतील वृक्षांनी पृथ्वीची ‘ निर्मिती केली ते वन म्हणजेच ब्रह्म होय. ते सर्वशक्तिमान आहे. जगदोत्पत्तीसाठी आवश्यक असलेली सर्व सामुग्री त्या ब्रह्मात सामावलेली आहे. इतकेच नव्हे तर समस्त भूतमात्रही त्याने धारण केले आहे. त्या विषयाचे परिशीलन केलेला मी तुम्हास उपदेश करीत आहे असे सृष्टीच्या उत्पत्तीसंबंधी यजुर्वेदात सांगितले आहे.
ज्या परमात्म्याच्या संकल्पशक्तीनें अखिल जगत निर्मिले गेले तो सर्वशक्तिमान आहे. हें जग त्याच्या शक्तिचेच कार्य होय. शक्ती शक्तिवानास सोडून राहूं शकत नाही. म्हणजे शक्ती व शक्तीवान यांत भेद असूं शकत नाही. शक्ती म्हणजे आई व शक्तिवान म्हणजे वडील असे असल्याने ‘ त्वं नो माता त्वं नः पिता ‘ असे म्हटले आहे.

आपणास दिसणारे वा भासमान होणारे हे जग पूर्वी अदृष्य होते व परमात्म्याच्या संकल्पशक्तीने त्यास संकल्पस्वरूप मिळाले. व्यक्तता म्हणजेच जन्म. व्यक्तरूपात दिसणा-या या कार्यास अव्यक्त असे कारण असलेच पाहिजे.

श्री प.प. सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी

home-last-sec-img