Literature

वैशाख वद्य सप्तमी

ज्ञानाशिवाय संकल्प असूच शकत नाही. ज्ञानरहित असणारे अचेतन असे दगड,लाकूड हे संकल्प करू शकतात काय? तसे जर यदा कदाचित झाले असते तर प्रेतसुद्धा संकल्प करून कार्यप्रवृत्त झाले असते. कार्यक्षमता ही केवळ चैतन्य असलेल्यांतच असते अचेतनांत नसते. संकल्प शक्तीयुक्त परमात्मा चैतन्यस्वरूप म्हणजेच ज्ञानस्वरूप आहे हे उमजले पाहिजे. तो आनंदस्वरूपी आहे,सच्चिदानंदरूप आहे. असा सर्वशक्तिमान असलेला परमात्मा नाहीच असे म्हणणे अयोग्यच. जर तसे कोणी म्हटले तर त्यावर कोणाचाही विश्वास बसणे अशक्यच.

सर्वांचा सांभाळ करतो तो ईश,आणि दैदिप्यमान व प्रकाशमान असणारा तो देव. या ईश व देव या दोन
शब्दामुळेही परमात्म्याचे अस्तित्व व स्वरूप समजून येते तो दिव्य प्रकाशस्वरूप आहे.

एखादे राज्य सुव्यवस्थितपणे चालवावयाचे असेल तर त्या राज्यातील सर्व प्रजानन आपापली कार्ये पार पाडीत, शत्रुचा नि: पात करीत, आपले जे असतील त्यांना कोणताही संसर्ग न पोहचू देता आपापल्या प्रजाधर्माने वागणारे असले पाहिजेत. योग्यप्रकारे आपापल्या कामात आपल्या प्रजेस गुंतविणारासच आपण राजा म्हणतो. आपल्या लहरीने राजा वागत असल्यास त्याला राजसत्तात्मक राज्य म्हणावे लागेल तर प्रजातंत्राने चालणाऱ्या राज्यकारभारास प्रजासत्तात्मक राज्य किंवा लोकराज्य म्हटले जाते. राज्यासाठी शासक हवाच हवा.

श्री प.प. सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी

home-last-sec-img