Literature

वैशाख शुद्ध प्रतिपदा

ह्या जगातील सर्व प्रकारची उपभोगाची साधनें एखाद्यास प्राप्त झाली तरी तो तृप्त होणार नाही. ह्यातील एखाद्या किंवा समुच्चययुक्त सुखसाधनांनीं खरें समाधान प्राप्त होत नाही. ‘ प्रापणात्सर्वभोगानां परित्यागो महासुखम् | ‘ असें म्हटले असल्यानें वैराग्य हेंच या मानवजन्माचें इतिकर्तव्य होय. जीवनाचे मुख्य लक्ष्य मुक्ति किंवा मोक्षच.

वर्णाश्रमधर्मोक्त कर्मांनी वैराग्यप्राप्ती होते. वैराग्यादि चतुष्ट्यांनी मोक्षप्राप्ती होते. साधन चतुष्ट्यांनी युक्त असा मानवच मोक्षाचा अधिकारी असतो. इहपर सुखांत आस्था नसणें म्हणजेच वैराग्य होय. हीच मोक्षप्राप्तीची पहिली पायरी.

नित्यानित्यविवेक ही दुसरी पायरी. नित्य म्हणजे नाश न पावणारें, अनित्य म्हणजे नाशिवंत व हे समजून घेणें हाच नित्यानित्यविवेक होय. अनित्य वस्तूंशी नित्याचा संबंध आहे. त्यातील नित्य ओळखणारा योग्य दृष्टीचा म्हणजेच डोळस मानव होय. ‘ विनश्यस्य विनश्यत्वं यः पश्यति स पश्यति | ‘ अविनाशित्व म्हणजेच अक्षरत्व. ह्या तत्वाचा साक्षात्कार म्हणजेच शाश्वत सुख होय. असें हें शाश्वतसुख मिळविण्याचा प्रयत्न न करतां विषयसुखाच्या मागें वहात जाणारा मानव अज्ञानी, मूर्ख व अंध होय.

श्री प.प. सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी

home-last-sec-img