Literature

श्राद्ध व त्याचा उद्देश

श्रद्धया दत्तं श्राद्धम् । श्राद्ध या शब्दांत ‘श्रद्धा’ हा शब्द मुख्य आहे. आपला जन्म ज्या कुलांत झालेला असतो, त्या कुलांतील मृत पूर्वजांच्या तृप्तिकरितां व तसेच त्यांच्या तृप्तीनें लाभणारी सत्संतति आणि चिरसंपत्ति यांकरितां, तिलदर्भादिकांनी दिलेल्या अन्नोदकरूप पितृयज्ञाला ‘श्राद्ध’ असें नांव आहे.

हेच पितृकार्य होय. धर्म, अर्थ, काम, मोक्ष अशा चार पुरुषार्थांची प्राप्ति गृहस्थांना व्हावयाची असते. श्रुतिस्मृत्युक्त धर्माचरणानें दैवी सामर्थ्य, सत्पात्रता, सत्कीर्ति, आरोग्य, मनःसमाधान, सूक्ष्म बुद्धि, कार्याकार्यविवेक इत्यादिकांची प्राप्ति करून, समाजांत गौरव प्राप्त करून घेणें, सर्वप्रिय होणें, हा प्रथम पुरुषार्थ. धर्माचरणानें अर्थप्राप्ति व अर्थप्राप्तीनें धर्मानुष्ठान करीत, या दोन्हींचा उपयोग करून घेऊन सुखानें नांदणे हा द्वितीय पुरुषार्थ होय. धर्मार्थाच्या साहाय्याने वंशपरंपरेच्या अविच्छिन्नतेकरितां व पितृऋणांतून मुक्त होण्याकरितां, विध्युक्त कामाचा आश्रय करून सत्प्रजी निर्माण करणे, हा गृहस्थांचा तृतीय पुरुषार्थ आहे. चौथा पुरुषार्थ मोक्ष हा होय. पुरुषार्थत्रयाच्या प्राप्तीनें सांसारिक विषयांकडची धांव शांत करून, गुरु-देवतांच्या अनुग्रहाने प्राप्त झालेल्या आत्मविचारावर सारखे प्रयत्न चालू ठेऊन, आत्मसाक्षात्कार करून घेणे, हा मोक्षरूप चतुर्थ पुरुषार्थ आहे. श्राद्धपक्षादिकांच्या अनुष्ठानानें गृहस्थांना पित्राशीर्वा देकरून या चारी पुरुषार्थीची प्राप्ति होते.

आयुः प्रजां धनं विद्यां स्वर्ग मोक्षं सुखानि च । 

प्रयच्छन्ति तथा राज्यं प्रीतानृणां पितामहाः ॥

—श्राद्ध करणाऱ्यावर संतुष्ट होऊन त्याचे पितामह त्याला आयुरारोग्य, प्रजा, धनविद्या, इतर सुर्खे, वाटल्यास राज्य, स्वर्ग तसा मोक्ष पण आनंदानें देतात.

पुत्रो वा भ्रातरो वाऽपि दौहित्रः पौत्रकस्तथा । 

पितृकार्यप्रसक्ता ये ते यान्ति परमां गतिम् ॥ ( अत्रिसंहिता)

— पुत्र, भाऊ, कन्यासंतति अथवा पुत्रसंतति जर पितृकार्यात अर्थात् श्राद्ध पक्ष तर्पणादिकांत यथाकाल आसक्त राहिली तर ती निश्चयानें परमगतीला प्राप्त होतात.

अरोगः प्रकृतिस्थश्च चिरायुः पितृपुत्रवान् । 

अर्थवानर्थयोगी च श्राद्धकामो भवेदिह ॥ 

परत्र च परां तुष्टिं लोकांश्च विविधान शुभान् । 

श्राद्धकृत समवाप्नोति श्रियं च विपुलां नरः ॥ (देवलस्मृति)

– श्राद्धादि पितृकार्ये श्रद्धेनें करणारा या लोकीं निरोगी, स्वस्थ, दीर्घायु, सुपुत्रवान्, श्रीमान्, धनोपार्जक असा होतो व परत्र अति तृप्त होतो. अनेक शुभ लोकांची त्याला प्राप्ति होते, अनंत वैभवाचा तो भागीदार होतो. कोणत्या गृहस्थाला हे नको आहे? या सर्वाची प्राप्ति जर पितृकार्यानें होते तर तें को बरें करूं नये साधन सोडून साध्याची प्राप्ति कशी बरें होईल !

ये यजन्ति पितन देवान् ब्राह्मणांच हुताशनान । 

सर्वभूतान्तरात्मानं विष्णुमेव यजन्ति ते ।। (यमस्मृति)

– जे देव, पितृ, अग्नि, ब्राह्मण यांची पूजा करतात ते सर्वांतर्यामी सर्वात्मरूप विष्णूचीच पूजा करतात. हे सर्व विष्णूच्या विभूती आहेत. गृहस्थाश्रम म्हणजे पितरांचीच आराधना आहे. गृहस्थाश्रमाच्या पूर्तीस या पितरांचा अनुग्रह अत्यवश्य असतो. स्वतःच्या आईवडिलांना मुक्ति मिळाली असली अथवा पुनर्जन्म झाला असला तरी गृहस्था श्रमाच्या पूर्णतेकरितां व कृतज्ञतार्थ केली जाणारी पितरोपासना अर्यमादि नित्य पितृदेव स्वीकारतात व आराधकाच्या अडीअडचणी दूर करून त्याला संतति, संपत्ति देऊन त्याचा गृहस्थाश्रम पूर्ण करतात आणि मोक्षाला सद्गुरुद्वारां मार्ग दाखवितात. यांच्या कृपेनेंच श्रेष्ठ सद्गुरूची प्राप्ति होते, साक्षात् जगत्पालक विष्णुहि तृप्त होतो. कांहीं पितर पितृलोकांत अथवा स्वर्गलोकांत राहातात. नेमक्या वर्षश्राद्धाच्या दिवशी ते आपल्या त्या वंशजाकडे येतात. भाद्रपद मासाच्या कृष्णपक्षांत मृतपितराच्या तिथीस श्राद्ध करावेंच. या श्राद्धास पक्ष म्हणतात. ( यालाच महालय म्हणतात. या पितृपंधरवड्यांत सर्व पितरांना पिंडदान असतें. भाद्रपद अमावास्येस सर्वपित्री अमावास्या म्हणतात. पितरांची मृत तिथि ठाऊक नसल्यास निदान या दिवशीं तरी श्राद्ध करावें, नाहीतर पितृशापास बळी पडावें लागतें.

वृश्चिके समनुप्राप्ते पितरो दैवतैः सह । 

निःश्वस्य प्रतिगच्छन्ति शापं दत्वा सुदारुणम्

— वृश्चिक राशीच्या आगमनानंतर अर्थात पितृपक्षांत श्राद्ध तर्पण झालें नाहीं तर गृहाप्रत आलेले देव देवतांसह पितृगण क्रुद्ध होऊन सुदारुण शाप देतात व विन्मुख निघून जातात. पितृशापानें संततिविच्छेद होतो, दारिद्य येते व कुटुंबांतले लोक धर्मभ्रष्ट तसेंच नीतिभ्रष्ट होतात. घरची कळाच नष्ट होते याच्या उलट


पुत्रानायुस्तथाऽऽरोग्यमैश्वर्यमतुलं तथा ।

प्राप्नोति पञ्चमे कृत्वा श्राद्धं कामांश्च पुष्कलान्

– पितृपक्षांत श्राद्ध केल्यानें पुत्र, आयुष्य, आरोग्य, अतुल ऐश्वर्य व तशीच अभिलाषित अनेक कामनांची प्राप्तिहि होते. श्राद्धं श्रद्धान्वितः कुर्वन प्रीणयत्यखिलं जगत् । श्रद्धाभक्तीनें श्राध्द केल्यानें अखिल जगालाच तृप्त केल्यासारखें होतें असेंहि एक वचन आहे. श्राध्दानें पितृतृप्ति, कर्त्याची अनिष्ट निवृत्ति, इष्टप्राप्ति व आखल जगाची तृप्ति होते, हें यावरून कळून येईल. या दृष्टीनें श्राध्दपक्ष प्रत्येकानें करावेंच जिवन्त असेपर्यंत पितरांना अन्नपाना दिकांच्या दानानें जसें संतुष्ट करावें तद्वतच मरणानंतरच्या स्थितीत अन्ना दिकांच्या दानानें पितरांना संतुष्ट करण्याचा एक विधि ‘ श्राध्द’ या नांवानें प्रसिध्द आहे.

देशे काले च पात्रे च श्रद्धया विधिना च यत् । 

पितॄनुद्दिश्य विप्रेभ्यो दानं श्राद्धमुदाहृतम् ॥

—पितरांच्या उद्देशानें पवित्र स्थलीं, योग्य काली, सत्पात्र पाडून विध्युक्त प्रकारें जें अन्नाहार-द्रव्यादि अति श्रद्धेनें दिलें जातें, त्याला ‘श्राद्ध असे नांव आहे. पित्रार्जित संपत्तीच्या प्राप्तीकरितां त्यांची सेवा केल्याप्रमा मरणोत्तरहि त्यांच्या अर्यमादि पितृदेवांकरितां आणि जगत्पालनकर्त्या विष्णु प्रीत्यर्थ, तसेंच सत्संतति व चिरसंपत्ति यांच्या लाभानें पूर्ण होणाऱ्या गृहस्थ धर्माकरितांहि श्राद्धविधीचें अनुष्ठान प्रथम वेदानेंच निर्णित केले आहे. श्राद्वान्ती पितरांची प्रार्थना केली जाते ती

भवत्प्रसादतो भूयाद्धनधान्यादिकं मम ||६६|| 

दातारो नोऽभिवर्धन्तां वेदाः संततिरेव नः । 

श्रद्धा च नो मा व्यगमद्वहुधेयं च नोऽस्त्विति ||६७|| 

अन्नं च नो बहु भवेदतिथींश्च लभेमहि । 

याचितारश्च नः सन्तु मा च याचिष्म कंचन ||६८||( लघ्वाश्वलायन स्पृ.) 

– आपल्या प्रसादानें या कुळांत सदा धनधान्यादि समृद्धि असावी, दाते निर्माण व्हावेत, वेदाध्ययन व वेदोक्त कर्म अधिक प्रमाणांत चालावें, वंशतंतु अखंड चालावा. गुरु, देवता, माता, पिता, वेदशास्त्र यावर आमची अचल श्रद्धा असावी. पुष्कळ दान द्यावयाला धनधान्याची भरपूर सामुग्री आमच्यापाशी असावी, याचनावृत्ति नसावी. यावरून आर्य संस्कृतीचा परिचय होतो.

home-last-sec-img