Literature

श्रावण वद्य अमावस्या

महात्मे हे सामान्यजनांना परमानंदवैभवसाम्राज्य मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन करीत असतात.

सामान्यजन संसारसुखामध्ये गर्क झालेले पाहून महात्म्यांना अत्यंत दुःख होते व त्यांना त्यातून मुक्त
करण्याचा प्रयत्न करीत असतात. इतरांच्या हितासाठीच संतमहंताचा जन्म होय. या जगांत खरे सुख गुप्त
स्वरूपांत आहे.परमात्म्याच्या दिव्यानंदास चुकविण्यासाठी मिथ्या सुखाचा लखलखाट दिसत असतो.
परमात्मा सत्यसुखरूपी व आनंदरूपी आहे. सामान्यांच्या ठिकाणी असलेला अज्ञानांधःकार घालवून
ज्ञानरूपी प्रकाश प्राप्त करून घेण्यासाठीच अवतारीजनांचा जन्म आहे. अन्यथा अवतारी या शब्दास काहीच
अर्थ रहाणार नाही. त्यांच्यात काहीतरी वैशिष्ठ्य आहे. म्हणूनच त्यांना अवतारी म्हटले जाते.

अवतारी महात्म्यांना निरनिराळी साधने करून, ज्ञान मिळवून मुक्त होण्याचा प्रश्नच नसतो. कारण ते
नित्यमुक्तच होत. आत्मानंदघनतेने युक्त, अत्यंत शांतियुक्त अशी त्यांची स्थिती असते. सामान्यजनांना व
संसारात घोटाळलेल्या लोकांना सत्यानंदस्वरूप दाखविण्यासाठी, भवसांगर तरून जाण्यासाठी आणि
त्यांना मुक्ती मिळवून देण्यासाठी हे अवतारी महात्मे आपल्या महावैभवाचा त्याग करून सामान्य जनामध्ये
वावरत असतात. हा त्यांचा स्वार्थत्याग नव्हे काय ? उन्नत स्थितीतील आपला आनंद सोडून अशारितीने कष्ट
सहन करणे हे निःस्वार्थीपणाचे लक्षण नव्हे काय ?

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधरस्वामी*

home-last-sec-img