Literature

श्रावण वद्य अष्टमी

विषयसुखाने असमाधान होत असले तरी त्या सुखाची चटक नाहीशी होत नाही. निरनिराळ्या
साधनामुळेही सुख प्राप्त होत नाही असा विचित्र अनुभव संसारात पदोपदी येत असतो. म्हणून या
संसारापेक्षा मानवास दुसरा कोणीही शत्रू नाही. या नरदेहांत खरे सुख कोणते ? त्या सुखाने कोणती प्राप्ती
होते ? त्यांचे सत्य-स्वरूप काय ? हे सर्व समजवून घेण्यासाठीच हा नरदेह आहे. विषयापासून मिळणारे सुख हे
खरे सुख आहे काय ? हा मानवजन्म कसा मिळतो ? जन्ममृत्यूच्या तडाख्यातून सुटण्यासाठी काय केले
पाहिजे ? या सर्व गोष्टींचा विचार करणे हे मानवी जन्माचे आद्यकर्तव्य होय.

जगनिर्मिती करून परमात्मा त्यांतच लपून बसला आहे. जग हा एक खेळ आहे, त्यात नाना प्रकारचे जिन्नस
उत्पन्न करून पशु, पक्षी, गंधर्व, देव, मानव अशा अनेक योनी निर्माण करून यापैकी आपल्याला कोण शोधतो
? हे समजून घेण्यासाठीच परमात्म्याने निर्मिलेला हा एक खेळ आहे. अनेक प्राण्यांची निर्मिती करून मग
मनुष्य देह निर्माण केला. आपले स्वतःचे स्वरूप मनुष्यदेहांतच प्रगट होऊ शकते असे पाहून परमात्म्यास
फारच आनंद झाला. हे जग आपल्यातच कल्पून संकल्परूपी पडद्यावर परमात्म्याने हे जगच्चित्र रंगविले आहे.
म्हणजे सर्व काही तोच आहे. पण व्यवहारदृष्टया या सर्व गोष्टी निरनिराळ्या दिसतात.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img