Literature

श्रावण वद्य एकादशी

संसार हे एक घड्याळ किंवा रहाटगाडगे आहे. निसर्गाचे वैचित्र्यही पहाण्यासारखे आहे. तारूण्यामध्ये
विशेष आशा नसते पण तीच वृध्दपणी वृध्दिंगत होते. नातवंडाने शिव्या दिल्या तरी आपला प्रपंच कसा
चालेल याच चिंतेत तो मग्न असतो आणि हीच वासना पुनर्जन्मास कारणीभूत असते. वासना नाहिशी

झाल्यास जन्मप्राप्तीही नाहीच. पण निसर्ग म्हातारपणी जास्त आशा उत्पन्न करीत असतो. वैषयिक जीवनांत
सुख-समाधान नाही. कारण विषयसुखेच समाधानकारी नाहीत. खरे सुख किंवा समाधान परमात्मकृपेनेच
मिळते, अन्यथा मिळत नाही. विषयनिवृत्तीत खरे सुख आहे. आपल्या जीवनांत निरनिराळ्याप्रकारे
अनुभवास येणाऱ्या वासना नष्ट करण्यासाठी बुध्दीचा वापर करण्याचे भाग्य आपणांस आपोआप प्राप्त
होईल.

इंद्रिये हा एक घोडा आहे अशी कल्पना केल्यास बुद्धी हा घोडेस्वार व मन हा लगाम आहे. घोडेस्वाराकडून
लगाम नीटपणे वापरला गेल्यास घोडा इकडे तिकडे जाऊ शकणार नाही. देहरूपी रथास विवेक हा सारथी
आहे. बरेवाईट कोणते ? प्रसंगोपात काय करावयाचे ? हे ठरविणे त्या विवेकाचे काम आहे. योग्य अयोग्य
ठरविणारी बुध्दी म्हणजेच विवेक. हा नरदेह परमात्मप्राप्तीसाठीच आहे असे निश्चितपणे समजून, गुरूमुखाने
सांगितली गेलेली सत्कर्मे, सद्उद्देश यांचे विचार दृढ करीत करीत आत्मसुख मिळवणे हा नरदेहाचा आदर्श
असून हेच नरदेहसाफल्य होय.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img