Literature

श्रावण वद्य दशमी

चित्रामधील जलाभासाने तहान शमणार नाही. चित्रांत पाणी दिसते ते पिऊन कोणीही केव्हातरी तृप्त
झाला काय ? दुसरे उदाहरण मृगजलाचे देता येईल. मृगजलाकडे पाहून पाण्याच्या आशेने हरीण धावत
सुटते पण ते जसजसे दूर जाते तसतसे मृगजळही दूर दूर भासत असते. मृग सारखा पळत असतो व खूप
धावपळ करूनही त्याला पाणी मिळत नाही व तहानेने व्याकुळ होऊन मरण ओढवण्याची शक्यता असते,
अशाच तऱ्हेची विषयी मनुष्याची गत ठरलेली आहे.

प्रथम मुलाचे उपनयन, मग लग्न, मग मुलीची लग्ने, नंतर नातवंडांची उपनयने, त्यांची लग्ने व हे संपल्यानंतर
आपण सर्वसंगपरित्याग करू असे मानव मनांत ठरवितो. मुलामुलींची लग्ने होतात, मग नातवंडे होतात
आणि हे सर्व होऊन कांही वर्षे लोटून गेली तरी त्यांचे पुढील संस्कार पहावेत ही आशा कायमच असते. अशा
प्रकारे विषयीजनांची आशा दिवसेंदिवस वाढतच असते. आशारूपी अग्नी सर्वभक्षक आहे. संसारात सर्व
काही ठाकठीक करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तो पुर्ण होत नाही. शेवटी मनुष्याचे आयुष्य संपते व
अपेक्षा नसतांही त्यास यमराजाचे पाहुणे व्हावे लागते. पण वासना शिल्लक रहातेच व तिच्यामुळे त्याचे *'
पुनरपि जननं पुनरपि मरणम् | '* हे चालूच राहते.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img