Literature

श्रावण वद्य द्वितीया

जीवाला परमात्म्याचा अंश म्हटले जाते, यामध्ये परमात्म्याची शक्ति स्पष्टपणे दिसून येते याच दृष्टीने जीव
व ईश्वर यांना एकच समजले जाते. जर त्यांचा औपाधिक श्रेष्ठ-कनिष्ठ भाव नाहिसा केला तर दोघांचे
निरूपाधिक निर्विशेष स्वयंप्रकाशस्वरूप एकच म्हटले जाईल.

जग पाहण्यासाठी मनप्रभुती इंद्रियांची आवश्यकता असते, परंतु जगत् साक्षीरूप आत्मस्वरूपाचे दर्शन
घेण्यास त्यांची मुळीच गरज नाही. परमात्म्याच्या ठिकाणी मन लीन केल्यावर मनोजन्य सर्व व्यवहारही लीन
होतात. परमात्म्याचे अद्वितीय स्वरूपच एकमेव प्रकाशमान होत राहते व तीच अमरप्रभा होय. यावर प्रश्न
उपस्थित होतील की, जगाचे दृश्य व मनाचा आभास हे दोन्ही स्पष्ट झाल्यावर त्याची कोणास अनुभुती होईल
? ज्ञानाचा अनुव्यवसाय कोणाला होतो ? यावर ' तो अहंस्फुर्तीलाच होतो ' असे उत्तर देता येईल. ' जग व मन
याहून मी निराळा आहे ' हे समजणे यालाच ' ज्ञान ' म्हटले जाते. आत्मस्वरूप पुर्णपणे परिशुध्द आहे. ' अहं '
ला योग्य स्वरूपात जाणणे हेच आत्मशक्तीचे कारण होय.

परमात्म्याच्या ठायी सर्वप्रथम कार्यमात्रास कारणीभूत अशी ' अहं ' ची स्फुर्ती उत्पन्न झाली. तीच स्फुर्ती
पिंडब्रह्मांडात ' अहं ' रूपाने विद्यमान आहे या दृष्टीने विचार करू लागल्यास आत्मस्वरूप हे याच्याहून पुर्णपणे
निराळेच आहे असे आढळेल. दोरीतील सर्प-भ्रमाप्रमाणे हा ' अहं ' भ्रमाने जगद्रुपात दिसतो. या भ्रमात्मक
जगासच नष्ट करून आपल्या स्वरूपी स्थित होणे यालाच अमरस्वयंप्रकाशप्राप्ती म्हटले जाते व हीच
अमरप्रभा होय.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img