Literature

श्रावण वद्य नवमी

एखादा कादंबरीकार कादंबरी लिहितो त्यावेळी तो कादंबरीकारच निरनिराळ्या पात्रांच्या भुमिकेत स्वतःस
गुरफटवितो. त्या कादंबरीत वर्णिलेले उद्यान, सृष्टीसौंदर्य, सुखदुःखे आणि तो अनुभवणारा तो लेखकच
असतो. आपल्या कल्पनेप्रमाणे कादंबरीकार प्रत्यक्षांत नसलेले सत्यस्वरूपात चित्रित करतो. त्याप्रमाणे
परमात्मा आपल्या संकल्पाने सर्व निर्माण करून शेवटी मनुष्यदेह निर्मुन त्यांत आपले स्वरूप पहातो. आपले
रूप म्हणजेच मानवरूप असे समजतो. परमात्मा हेच मानवदेहाचे वैशिष्ट्य.

मानवदेह व परमात्मा यांचे संबंध कोणते ? या देहांत सत्यसुखप्राप्ती कधी होऊ शकते ? असा विचार
करणे हेच मानवबुध्दीचे योग्य काम होय. मानवी जन्मांत रूढ ही जी विषयसुखे आहेत त्यांत सत्यसुखाची
प्राप्ती होत नसल्याकारणाने सत्यसुखप्राप्तीसाठी जीवनधारा वाहवणे हेच जन्माचे सार्थक होय.

परमात्म्याच्या प्राप्तीसाठीच आपले जीवन व्यतीत करणे यालाच ' परमार्थ ' असे म्हणतात. द्रव्यामुळे
सुखप्राप्ती होत नसते यासाठीच श्रीमद् भगवत् पादानी.
*' अर्थमनर्थं भावय नित्यं नास्ति ततः सुखलेशः सत्यम् '*

असे स्पष्ट म्हटले आहे. या सुप्तधनामध्ये आपले मन गुंतवून त्यात आसक्त बनून आपला मेंदु बिघडवूं नये,
म्हणजेच त्या क्षणिक सुखासाठी हा नरदेह वाया घालवू नये.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img