Literature

श्रावण शुद्ध द्वितीया

याच देही याचि डोळा आपले मरण पाहून व जन्मही पाहून तेथे दुसरे काहीही न रहाता स्वतःच शिल्लक रहाणे
यालाच जीवनमुक्त म्हणतात. स्वतःची जाणीव आपल्या अनंतानंत आनंदयुक्त आद्य परमात्मस्वरूपांत
विरघळून गेल्याचे म्हणजेच विलीन झाल्याचे पहाणे हेच आपले मरण. आत्मज्ञानाच्या दृष्टीने मरण म्हणजे
स्वतःची चंचलरूपी जाणीव नाहीशी होणे. निश्चल यथार्थ अशा आनंदरूपांत नित्य निर्विकल्प असणे
म्हणजेच देह-द्वैत घालवून अद्वैत असे जेथे इतर काहीही नाही असे निजरूप स्वतःच शिल्लक रहाणे.
मोक्षासाठी एखादे नांव धारण केलेला देह असतांनाच अशारितीने मरण पत्करून गर्भवास नाही व मृत्युही
नाही. जन्ममरणावर विजय मिळवून मोक्षानंदसौभाग्य श्रीगुरूप्रसादाने प्राप्त होऊ शकते. अनन्यभक्तीने
केलेली गुरूसेवा परमानंदरूपी दिव्य फल देते.

जीवनमुक्ताचा देह महासागरांत पडलेल्या बर्फाप्रमाणे वितळून आनंदरूपी महासागरांत विरून जातो.
त्यानंतर देहभास नष्ट होऊन तो आनंदब्रह्मरूप परब्रह्मच होतो. तेथे आनंदाशिवाय दुसरे काहीही नसते.
ज्ञानी मनुष्याचे संचित, प्रारब्ध व क्रियमाण ही सर्वच नष्ट होऊन तो पुन्हा जन्मास येत नाही.

ब्रह्मसाक्षात्कारानंतर आत्मज्ञानी पुन्हा मृत्युलोकी येत नाहीत व कोणत्याही लोकांत पुन्हा जन्म घेत नाहीत.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img