Literature

श्रीगुरुदत्तात्रेयाय नमः

नव प्रजापतींपैकी अत्री महर्षीनी आपल्या अनसूया नावाच्या अर्धांगीसह केलेल्या तपाचे फळच श्रीदत्तांचा अवतार. त्यांच्या इच्छेप्रमाणे ब्रह्मा, विष्णु, महेश्वरांनी करण्याचे ठरविले आणि तिघेही त्यांचे पुत्र झाले. तिघांचेहि एकवटलेले रूप म्हणजेच हा श्रीदत्तावतार.

‘गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः । गुरुः साक्षात्परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः ||”

ह्या तत्त्वाचा प्रत्यक्ष साक्षात्कारच ह्या अवताररूपाने झाला. वरील श्लोक गुरुगीतेतील आहे. ही गुरुगीता श्रीशंकरांनी श्रीपार्वतीस सांगितली आणि गूढ अशा गुरुतत्त्वाचे महाद्वार तींतून उघडून ते सर्वांना मोकळे केले आहे. तींतील हा बत्तिसावा श्लोक आहे. श्रीसद्गुरूच ब्रह्मा, सद्गुरूच चतुर्भुज विष्णु, सद्गुरुच त्रिनेत्र शंकर, सद्गुरूच एक साक्षात परब्रह्मः त्या सद्गुरूला माझा नमस्कार असो. असा ह्या श्लोकाचा अर्थ आहे. श्रीगुरु हा त्रिमूर्तिस्वरूप आहे हे तत्त्व त्रिमूर्तीनी अवतार घेऊन जगाच्या प्रत्यक्ष निदर्शनास आणून दिले तोच हा श्रीदत्तगुरूंचा अवतार. ह्या देवत्रयाला ज्या ब्रह्मस्वरूपाचे प्रतीक म्हणून मानले जाते ते ब्रह्मच आपल्या सत् चित् आनंद ह्या पदत्रयाच्या त्रिमुखानें जेव्हां प्रकट झाले तेव्हां सन्धिवानंद ब्रह्मालाच ‘श्रीदत्त’ हे नांव आले. स्मरणानुगामी असे ह्यांचे विशेषण आहे. श्रीदत्ताची अवधूत स्थिती आहे. संपूर्ण ज्ञानवैराग्याच्या पराकाष्ठेचे हे स्वरूप असल्यामुळे श्रीदत्तांना श्रीगुरु म्हणतात, ‘अवधूतचिंतन श्रीगुरुदेव दत्त’ असा ह्यांचा जयजयकार असतो, निरिच्छतेमुळे हे फारच लवकर प्रसन्न होतात व त्यामुळेच ‘अशुतोषः’ असेही नांव पडलें आहे.

ईशादि अष्टोत्तरशतोपनिषदांच्या तसेंच ईशादि विशोत्तर शतोपनिषदांच्या ग्रंथातून श्रीदत्तगुरूंच्या विशेष उल्लेखांची शाण्डिल्योपनिषत्, श्रीजाबालदर्शनोपनिषत्, श्रीदत्तात्रेयोपनिषत् व श्री अवधूतोपनिषत् अशी चार उपनिषदे होत. I

शांडिल्योपनिषदांत –

‘अथ कस्मादुच्यते दत्तात्रेय इति । यस्मात् सदुश्चरं तपस्तप्यमानायात्रेय पुत्रकामायतितरां तुष्टेन भगवता ज्योतिर्मयेनात्मैव दत्तो यस्माच्यानसूयायामत्रेस्तनयो ऽ भत्तस्मादुच्यते दत्तात्रेय इति ।’ ह्यांना कोणत्या कारणामुळे दत्तात्रेय म्हणतात ? असा एक प्रश्न उपस्थित करून पुत्रकामनेनें अतिशय कठीण तप करणाऱ्या अत्रिऋषीवर भगवान् पूर्णपणे प्रसन्न होऊन त्यांना आपले स्वप्रकाशरूप दिले व अशा रीतीने अत्रिमहर्षीना कृतार्थ केले. ह्यामुळे आणि अनसूयेच्या ठिकाणी साकाररूपाने प्रगटलें म्हणून त्या परमात्मरूपालाच दत्तात्रेय म्हणतात.

श्रीजाबालदर्शन उपनिषदांत पुढीलप्रमाणें उल्लेख आहे-

‘दत्तात्रेयो महायोगी भगवान्भूतभावनः । चतुर्भुजो महाविष्णुर्योगसाम्राज्यदीक्षितः ||१||

‘तस्य शिष्यो मुनिवरः साङ्कृतिनाम भक्तिमान् । पप्रच्छ गुरुमेकान्ते प्रांजलिर्विनयान्वितः ||२|| भगवन् ब्रूहि मे योग साष्टाङ्गं सप्रपंचकम् । येन विज्ञातमात्रेण जीवन्मुक्तो भवाम्यहम् ||३||’ महान् योगी भगवान सर्व ध्येयरूप योगसाम्राज्य दीक्षित चतुर्भुज महाविष्णूच श्रीदत्तात्रेय होत. त्या श्रीदत्तात्रेयांचे अतिशय भक्तिमान शिष्य सांकृति नांवाचे मुनिश्रेष्ठ होते. त्यांनी हात जोडून अत्यंत विनयानें एकांतात आपल्या गुरूला अर्थात श्रीदत्तात्रेयांना विनंती केली की, ‘महाराज! ज्याची ओळख करून घेतली असतां मी जीवन्मुक्त होऊन राहीन त्या अष्टांग योगाचा मला उपदेश करावा.’ पुढे श्रीदत्तात्रेयांनी ह्या उपनिषदात अत्यंत सुलभतेने अष्टांगयोगाचा विस्तारानें मार्मिक उपदेश केला आहे. अवधूतोपनिषदांत पुढीलप्रमाणे उल्लेख आढळून येतो –

‘अथ ह साङ्कृतिर्भगवन्तमवधूतं दत्तात्रेयं परिसमेत्य पप्रच्छ ।’ सांकृति नावाच्या एका शिष्याने भगवान दत्तात्रेयाजवळ जाऊन विचारले की, ‘भगवन् कोऽअवधूतस्तस्य का स्थितिः किं लक्ष्य कीं संसरणमिति ।’ ‘भगवन् ! अवधूत कोणास म्हणावयाचे? त्याची मनोभूमिका किंवा स्थिती कशी असते ? अवधूतांची लक्षणे कोणती ? तो कसा वागतो ? ‘तं होवाच भगवो दत्तात्रेयः परमकारुणिकः ।’ त्यावर परमकारुणिक श्री दत्तात्रेय म्हणतात, ‘अक्षरत्वावरे ण्यत्वाद् धूतसं सारबन्धनात् । तत्त्वमस्यादिलक्ष्यत्वात् अवधूत इतीर्यते ।’ आपल्या अविनाशी स्वरूपामुळे, वरिष्ठत्वामुळे धुऊन गेलेल्या संसारबंधनामुळे, तत्त्वमस्यादि महावाक्यांच्या लक्ष्यार्थामुळे अवधूत म्हटले जाते. ह्या अ, व, धू, त ह्या चारहि अक्षरांच्या पृथकू व्याख्या दिल्या आहेत. ह्या ठिकाणी भगवतगीतेच्या ‘स्थितप्रज्ञस्य का भाषा’ ह्या दुसऱ्या अध्यायातील चोपन्नाव्या श्लोकाची आठवण होते. दत्तात्रेयोपनिषदांत पुढीलप्रमाणें उल्लेख आढळतो.

‘ॐ सत्यक्षेत्रे ब्रह्मा नारायणं महासाम्राज्यं किं तारकं तन्नो ब्रूहि भगवन् इत्युक्तः ।’ अखिलांगकोटिब्रह्मांडनायक श्रीमन्नारायण ह्यांना ब्रह्मदेवांनी विनंती केली की, ‘भगवान, गर्भजन्ममरणादि दुःखांनी भरलेल्या ह्या भवसागरातून तारणारे जे प्रभावी साधन आहे त्याचा मला उपदेश करा.’ ह्यावर श्रीमन्नारायण म्हणतात, ‘सत्यानंदचिदात्मकं सात्त्विकं मामकं धामोपास्वेत्याह’ । सत्यानंद चिदात्मक अशा माझ्या शुद्ध सात्त्विक स्वरूपाची तूं उपासना कर. ‘सदादत्तोऽहमस्मीति तत्त्वतःप्रवदन्ति ये न ते संसारिणो भवन्ति ।” मी तो आनंदघन दत्तच आहे हे तत्त्वदृष्टीने जाणून व नंतर आत्मसात् करून दुसऱ्यांना दत्तस्वरूपाचा जे बोध करतात, ते कधीच संसारी न होतां, जीवा भावानें न राहातां ब्रह्मरूप दत्तच होतात.

श्रीसद्गुरूंच्या अनुग्रहानें हे तत्त्व तुम्हां सर्वांच्या हृदयात बिंबो व सर्वहि जीवन्मुक्त होवोत.

home-last-sec-img