Literature

श्रीगुरुसेवा

रात्रीच्या वेळी शेताची राखण करावयास गेलेले दोघेजण एकमेकांना जागे करून धीर देतात. त्याचप्रमाणे साधकांनी परस्परांना वेळीच जागे करून धीर देणें योग्य होय. अविद्या किंवा अज्ञानरूपी अंधारात आपल्या जीवनरूपी शेतीची, गुरुकृपेच्या माचीवर बसून आपण राखण करीत आहोत. येथे आपल्या सत्कर्माचे उगवलेले पीक खाऊन नष्ट करण्यासाठी काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, मोह इत्यादि शत्रू टेपून बसले असून आपली नजर चुकवून आपल्या जीवनरूपी शेतीमध्ये घुसण्याची ते बाट बघतात, ही गोष्ट आपण मोठ्याने ओरडून सांगून त्या सहा जणांना पळवून लावण्याचे कार्य सतत करीत राहणे आवश्यक आहे.

खिरीच्या भांड्यात एक थेंब रॉकेल पडल्याप्रमाणे ह्या कामामध्ये थोडे जरी ‘अहं’ आले तर केलेले सर्व कार्य व्यर्थ जाण्यास मुळीच वेळ लागणार नाही. आपली स्तुती केली तरीहि आपण निरहंकारित्व कमी होऊ न देता वाढविले पाहिजे. आपण कितीही सत्कार्ये केली तरी ती ‘कमीच’ असे वाटले पाहिजे व ती अधिक करण्यासाठी मनाचा उत्साह वाढविला पाहिजे. कर्तृत्व आणि भोक्तृत्वाचा थोडाहि स्पर्श होऊ न देता, अभिमान सोडून कर्तव्य बुद्धीने निष्काम कर्मे करणाराच साधक होय. त्याचे आचरण सत्यास व शास्त्रास सोडून असू नये. तो सर्वाचा विश्वासपात्र असावा. त्याचे जीवन इतरांना अनुकरणीय व आदरणीय असले पाहिजे. निंदेने त्याने निराश होऊ नये तसेच स्तुतीने उल्हसित होऊ नये. सर्व प्राणिमात्रांवर शुद्ध आत्मीय प्रेम असावे. सर्वांशी विनयाने वागावे. कोणावरहि निष्ठुर न होता आपण सर्वांचे प्रीतिपात्र बनणें महद्भाग्याचे लक्षण होय. निष्कपट प्रेम व मृदुमधुर वचन, आचरण हा जगत्वशीकरणाचा महानू मंत्र होय. आपली चूक ओळखून ती पुन्हा होऊ न देतां पश्चात्तापान वाईट वाटून घेणाराच आपला उद्धार करून घेऊ शकतो, असे महात्म्यांचे सांगणे आहे. आपली चूक ओळखणाराच मुमुक्षू तर दुसऱ्याचे दोष पाहून आपले दोष छपविण्याचे निरनिराळे प्रयत्न करणाराच बद्ध.

माया ही फसविणारीच. ती केव्हां, कसा मोह पसरवून फसवील हे सांगता येत नाही व कळूनहि येत नाही म्हणून आपण सदासर्वदा अत्यंत सावध असावे.

श्रीगुरु आश्रमाचे किंवा संस्थेचे सर्व नियम न चुकतां पाळले पाहिजेत. तसे न करतां एकाने नियमाविरुद्ध वर्तन केलें म्हणून दुसराहि तसाच वागला तर त्याने सर्वांचेच अनहित होईल. शिवाय संस्थेनी शिस्त व सुव्यवस्था कोलमडून श्रीगुरुहि बदनाम होतील, आपली सुधारणा होणार नाही आणि आपल्याच उद्धारासाठी स्थापलेली संस्था बंद पडेल. ऐकून करणाऱ्यांपेक्षां समजून उमजून करणाराच शहाणा, अविवेक स्वतःस व इतरांस कष्टकर ठरतो. स्वतः कष्टी होऊन इतरांनाहि कष्ट देणाऱ्यास कोणीहि संस्थेत ठेवून घेणार नाही. अशा एकाच्यामुळे सर्वांनाच त्रास होतो आणि असा त्रास झाल्यास गुरु तरी काय करणार ? अशाला दया दाखविली तर इतरांना त्रास दिल्यासारखे होणार नाही का ? अशावेळी त्याला संस्थेतून कोणी बाहेर घालविले तर दयेने त्याला फक्त शुभाशीर्वाद देण्याखेरीज आणखी काय करणे शक्य आहे ? आपले न ऐकणारासाठी गुरु ह्याखेरीज आणखी काय करणार ? आपल्या वागण्याचे काय परिणाम होतील ह्याचा विचार करून, होणाऱ्या परिणामावर दूरदृष्टी ठेवून आपण प्रत्येक कार्य केले पाहिजे. एखादी गोष्ट स्वतःस न समजल्यास अनुभवी असणान्यास विचारून समजून घ्यावी. त्याने आपले समाधान न झाल्यास सवडीनुसार श्रीगुरूंना ती विचारून त्यांनी सांगितलेल्या गोष्टीवर उगीच अर्थहीन तर्कवितर्क न करतां त्यांचे म्हणणे प्रमाणभूत समजून तसे आचरण करावे. शास्त्रांत म्हटल्याप्रमाणें श्रीगुरूंची आज्ञा पाळल्यास आपले कल्याणच होते, कांहीच नुकसान होत नाही. श्रीगुरूंच्या मुखाद्वारे वेदशास्त्रांचे सिध्दांतच बाहेर पडतात. शुद्ध अंतःकरणानें बोलणें हेच शास्त्र. त्यांना सगळे सारखेच. आपणा सर्वांचा उद्धार करण्याची जबाबदारी त्यांच्यावर नाही का ? ते एकाचा पक्ष धरून इतरांवर अन्याय करतात असे कधीहि समजू नये. आपण सर्व त्याचेच रूप, असे समजल्यानंतर श्रीगुरु कोणाचें हित आणि कोणाचे अनहित करतील असे समजूच नये. आपल्या उद्धाराचे एकमेव ध्येय समोर ठेवून आपण श्रीगुरूंच्या सान्निध्यात राहात आहोत. श्रीगुरु आपल्या सानिध्यात आहेत हे कोणाच्या फायद्यासाठी ? मुलाच्या हातातील विषाची बाटली काढून घेऊन त्याची आई त्याला खाऊ देते ही गोष्ट तिच्या कोणत्याहि प्रकारच्या फायद्यासाठी नसून मुलाच्या फायद्यासाठीच नाही काय ? सर्वांना होईल तितका आनंदघन ब्रह्मस्वरूपाचा साक्षात्कार घडवून देणे हा त्यांचा एकमेव प्रयत्न आपल्यासाठीच नाही का ? त्याच्यात त्यांचा कोणता स्वार्थ आहे ? कोणतेहि अनुदान किंवा पगार न घेणारा प्राध्यापक विद्यार्थ्यांना विनामूल्य शिकवतो, त्यात कोणते द्रव्यार्जन करावयाचे असते ? आपल्या उद्धारासाठी प्रयत्नशील असणाऱ्या, परिशुद्ध आनंदरूप असणाऱ्या श्रीगुरूंत दोष शोधणे म्हणजे मरणोन्मुख असणाऱ्याने अमृतास विष समजण्यासारखेच. औषध देणान्या वैद्यासाठी रोग्याने विशेष असे काय करावयाचे असते ? वैद्याने सांगितलेले पथ्य न पाळतां स्वतःची प्रकृति विघडवून घेतली तर त्याला वैद्य किंवा त्याने दिलेले औषध काय करणार ?

I गुरुसमागमे असणाऱ्या प्रत्येकास ‘श्रीगुरूंची सेवा आपणच करावी’ असे वाटणे साहजिक असते. आपल्यासारखे इतरहि आहेत असे समजून त्यांनाहि मोठ्या मनाने सेवा करू द्यावी. आपण एकट्यानें किंवा एकटीनेच सेवा करावी असा हट्ट धरू नये. इतरांना सेवा दिली तरी त्याचा आपणास आनंदच व्हावा. सेवा करणान्याशी वैर करू नये. ‘आपला कोणताहि अपराध नसता आपले मन दुखवून आपण करीत असलेली सेवा श्रीगुरूंनी दुसन्याला देऊन आपला मुद्दाम अपमान केला, त्याच्यावर गुरूंचे प्रेम जास्त, आपण सर्वच घर सोडून आलो असतां अशा प्रकारें एकाला एक व इतरांस एक असें कां करतात ? हे कसले गुरु ! आणि हा कसला परमार्थ !!’ असें कांही जण रागाने मोठ्यानें तर कांही जण मनातल्या मनांत म्हणत असतात. ‘राग आल्यामुळे मी कांहीतरी बोलून गेलो’ असे म्हटले तरी ह्याचा अर्थ त्याच्याजवळ भक्ति नाही असा करता येत नाही. कांही तरी विपरित ग्रह करून न घेतां, कोणत्याहि प्रसंगी सत्यासत्य गोष्टीचा, कार्याकार्याचा विचार करून वागतो तोच स्वतःस विवेकी व संयमी म्हणवून घेतो, असे ध्यानांत धरून अशा वेळी श्रीगुरु स्तब्ध राहिले तरी आपण रागावू नये. विवेकाने राग दूर ठेवणाराच • शहाणा. राग अत्यंत वाईट. राग न येणें हेच उत्तम. त्यात राग आलाच तर श्रीगुरूंकडून कधीहि चूक होत नसल्याने त्यांच्यावर रागावण्याचे कारणच उरत नाही. काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, मोह ह्या सहा शत्रूंवर विजय मिळवून आपण पारमार्थिक बनू शकतो, नाही का ? हे सहा विकार म्हणजे आपल्यासाठी केवळ विषय होत. उत्तमप्रकारे सेवा करणाऱ्याकडील सेवा दुसऱ्यास देण्यांत श्रीगुरूंची निराभिलाषा, स्वतःच्या देहसुखाकडे असणारे त्यांचे दुर्लक्षच होय. सेवेकऱ्यांच्या उद्धाराकरतांच ते सेवा करवून घेतात. . आपल्या स्वतःच्या सुखाकरता नव्हेच. त्यांच्या ह्या वर्तनाद्वारें सर्वावर सारखेच प्रेम, वात्सल्य ठेवून ते स्वतःचे ‘सर्वसमत्वच’ दर्शवितात हे स्पष्ट दिसून येते, ही वस्तुस्थिती समजून घेऊन आपण मनांत विचार करावा. माशानें पाण्यावर रागावल्याप्रमाणें श्रीगुरूवर रागावून आपलें अनहित करून घेऊ नये. एखादा आजारी झाला किंवा अशक्त बनला तर त्याची दुधाची गरज गुरूंनी पुरविली तर गुरूंचे त्याच्यावर जास्त प्रेम आहे असे म्हणता येत नाही. कोणीहि विचारी मनुष्य अशी चुकीची समजूत करून घेणार नाही. खाण्यापिण्याच्या बाबतीत भांडण करू नये. असे केल्यास आपली पारमार्थिक किंवा निःस्पृहाची भूमिका ठरेल काय ? प्रत्येकाची पात्रता पाहून त्याप्रमाणे काम दिल्यास त्यायोगे श्रीगुरूंकडून भेदभाव केला जात आहे असे समजू नये. प्रत्येक गोष्ट सर्व प्रकारे विचार करूनच ठरवावी. आपले बोलणें मौलिक व मित असावे. आपला आचार व बोलणें ह्यावरूनच हा कायावाचामन करून विवेकी, गुरुभक्त, विरक्त असून उत्तम साधक आहे असे दिसून आले पाहिजे. चांगले हे स्वतःस व इतरांसहि जसें चांगले असतें तसें वाईट दोघांनाहि वाईटच ! ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. आपल्याशी इतरांनी नीतिन्यायानें वागावे, आपल्या सुखदुःखाची विचारपूस करावी, आपल्या सुखदुःखांत इतरांनी सहभागी होऊन मदत करावी असे आपणांस वाटते तसेंच दुसऱ्यांनाहि वाटत असणार, असे समजून जो दुसन्याशी त्यानुसार वागतो तेव्हांच इतरहि त्याच्याशी त्याप्रमाणे वागतात. आपले बोलणेंच आपल्याला परत येत असते. आपण केल्यासारखेच दुसरेह करीत असतात ही जाणीव असावी. ‘आपण चांगले तर जगहि चांगले’ ही म्हण विसरूं नये. करून करवून घ्यावे, बोलून बोलवून घ्यावे तसे द्यावे हा जगाचा न्याय आहे. उडी टाकण्यापूर्वी विचार करावा. उडी टाकल्याने हात पाय मोडल्यानंतर विचार केला तर त्याचा काय उपयोग ? वृद्धावस्थेत साधना करण्याची बुद्धी होण्यासारखेच ते निष्फळ. ‘पेरल्यासारखे पीक येणार’, ‘करावे तसे भरावे’ ह्या म्हणी विसरून चालणार नाही. चांगले कार्य केल्याने अपेक्षा न करतांच कीर्ति व फळ प्राप्त होत असते. कुकर्माने तसें प्राप्त होत नाही, ही मनामध्ये पक्की ठसवून घेण्याची गोष्ट आहे. आपल्याला मोठयाकडून कार्य करवून घ्यावयाचे असल्यास ते अत्यंत लीनतेने, विनयाने, अनन्य भक्तीने करून घ्यावे. त्यांना दुखवून, राग किंवा हट्ट करून आपले कार्य करवून घेतले तर ते योग्य व चांगले ठरणार नाही. देव, गुरू, वडीलधारी माणसे ह्यांच्यावर रागावून, हट्ट करून कोणतेही काम करून घेऊ नये. त्यामुळे त्यांचे मन दुखविले जाते. ‘आपलेहि तसेच आहे नाही का ? आपला हट्ट चालविणे हे खरे प्रेम किंवा भक्ती नव्हे. धोरांच्या मनाचा कल पाहून त्यांना प्रेम किंवा आनंद वाटेल असे वागणे हाच लहानांचा धर्म. थोरांचे विचार उच्च असल्यामुळे त्यांच्या भूमिकेप्रमाणे आपली भूमिका ठेवून त्यांनी सांगितल्याप्रमाणें केल्यास आपला उद्धार होतो. अमृत देणान्यापुढे हट्ट केल्यास आपलेच नुकसान होईल. देव, गुरु, वडील ह्यांचे देणेंसुद्धा भरपूर व महान् असते. आपण करीत असलेली सेवा पाळीप्रमाणे करण्यासाठी आलेल्या आपल्या गुरुबंधूस पाहताच, तो आपला प्राण घेण्यासाठी आलेल्या यमदूतासारखा वाटणें, त्याच्याकडे सूडबुद्धीने किंवा दुष्टबुद्धीने पहाणें योग्य नव्हे. हे भक्तिप्रेमाचे एक लक्षण असले तरी आत्मदृष्टीयुक्त सर्वात्मभावना व स्वयंपूर्ण आत्मज्ञानयुक्त भक्ति आपण शिकावी.

श्रीगुरूच आपले निर्गुण निराकार रूप होत अशी मनाची खात्री करणेंच योग्य, सेवा करीत असतानाच व सोडताना एकाच प्रकारची भावना ठेवण्यास शिकलो तर जागतिक हानी व लाभ, सुखदुःख ह्यामध्ये आपण आनंदघन स्वरूपामध्ये कायम राहातो. ही गोष्ट अभ्यासण्यास यथायोग्य आहे. सेवा करीत असताना व सोडताना ‘मी देहादि सर्व क्रियांना अनंतसाक्षी आहे, मी निष्क्रिय आनंदघन ब्रह्मस्वरूप आहे’ असे वाटणे स्वरूपस्थितीच्या अभ्यासासाठी अनुकूलच ठरते. सेवेत सगुणामध्ये निर्गुणाची दृष्टी असते. सेवेची पाळी संपल्यानंतर ‘गुरू हे निर्गुण निराकार समजून आपल्या आनंदघन ब्रह्मस्वरूपाचा अभ्यास करण्यास तो समय अनुकूल असतो. आपापल्या पाळीनुसार करावयाच्या सेवेमुळे दृढ झालेला अविकारी स्वरूपाचा अभ्यास आपण उत्तम प्रकारे समजू शकतो, क , शकतो.

जागतिक जीवनात एकच परिस्थिती कायम असत नाही. कोणत्याहि परिस्थितीत आनंदित राहण्यास ‘वेदान्त’ शिकवितो. आनंदघन असलेल्या आपल्या नित्य अशा ब्रह्मस्वरूपाच्या साक्षात्कारासाठी गुरुसेवाच योग्य नव्हे का ? आपली पाळी असताना गुरुसेवेत प्राप्त केलेला आत्मनिष्ठेचा अनुभव पुन्हा आपली पाळी येईपर्यंत मनात ठेवून आपली पाळी येताच आणखी मेहनत करून अत्यंत उत्साहानें सेवा करावी.

सेवाकालात पहाटे तीन वाजता उठण्याची सवय सोडू नये. त्यावेळी जसे अनुकूल असेल तसे ध्यानासाठी बसावे. सेवा विसरणार नाही म्हणून सावध रहावे. आश्रमातील किंवा संस्थेतील सेवा सुद्धा त्याच भावनेनें व प्रेमाने ‘ही श्रीगुरूंची खरी सेवाच आहे’ असा निश्चय करून अनालस्य व निरालस्य करावी. पहाटे तीन वाजता ऋषी, मुनी, देवता उठून स्नानास जातात व तेहि ध्यान धारणा, समाधि ह्यांची संवय मोडू नये म्हणून रोज ते करीत असतात. आपणहि तीन वाजता उडून ध्यानधारणेची सवय ठेवून ध्यानयुक्त जपाबरोबर साधनेसहि बसावे. गुरु, ऋषी मुनी, उठून ध्यान करण्यास बसतात त्यावेळी आपण अंथरुणावर घोरत पडून राहणे चांगले काय ? आपल्याबरोबरच्या लोकांना बदलत असावे. एकालाच कायम ठेवले तर त्याच्यावर इतर सर्व गुरुबंधूंपेक्षा जास्त प्रेम आहे असे वाटण्याचा संभव असतो. तसे न करता जोडीदार बदलत गेल्यास परस्परांमध्ये एकाप्रकारचे सर्वात जास्त प्रेम टिकते.

गुरूंपेक्षा कोणीहि व कांहीहि मोठे नाही. त्याच्यापुढे हट्ट करून आपले म्हणणे त्यांच्या गळी उतरवू लागलो तर त्यांचा उपदेश ऐकून आपला उद्धार करून घेणे कसे शक्य आहे ? ‘वाटले तर अन्नपाणी सोडतो’ अशी धमकी देऊन आपले काम करून घेणें हे अविवेकीपणाचेच. ते आपल्याला परका समजतात असे समजून आपण आपल्या अल्पबुद्धीने केल्यासारखे होऊन त्यायोगे आपली अज्ञानता, बद्धता आणि जीवभावना जास्त वाढविल्यासारखेच होत नाही काय ? स्वतःचेसुद्धा हित न करता गुरूंचे मन दुखवून हट्टाने कोणतीहि गोष्ट करवून घेणे योग्य आहे काय ? ह्यासाठीच ‘गुरूआज्ञेचे उल्लंघन करणें ही महानू चूक होय.’ असे शास्त्र सांगते. श्रीगुरु संतुष्ट झाल्यास मोक्षाचीच प्राप्ती होते असे म्हटल्यावर त्याच्याहून मोठे असे दुसरे काय आहे ?

‘ध्यानमूलं गुरोर्मूर्तिः पूजामूलं गुरोः पदम् । मन्त्रमूलं गुरोर्वाक्यं मोक्षमूलं गुरोः कृपा ।।

ह्या श्लोकाचा अर्थ उत्तम प्रकारे समजून घेऊन वागले पाहिजे, नाही का ? श्रीगुरू आपणांस भवपार करवितात. ते महानू समर्थ आहेत; ते महान् क्षमाशील आहेत. त्यांना इतर कोणत्याही उपमेची आवश्यकता नाही; त्यांना इतर कोणतीहि उपमा देणे शक्य नाही; हा सगळा विचार करणें आपल्या साधनेच्या सिद्धतेसाठीच आहे. उत्तम प्रकारे वाळलेले लाकूड झटकन पेट घेते, नाही का ? तसेच आपण आपल्याला अधिकारी बनवून घेण्यासाठी योग्य विचार करून त्यानुसार वागलो तरच श्रीगुरू आपले आनंदघन असे शुद्ध ब्रह्म स्वरूपच आहेत ह्याबाबत कोणत्याहि प्रकारच्या शंकेला स्थान राहू शकणार नाही.

‘आनन्दघनरूपासि नित्यशुद्धासि स्वप्रभा । नित्यमङगलरूपासि ब्रह्ममात्रं स्वभावतः ।’

इति शम्!

home-last-sec-img