Literature

श्रीदत्तावतार

अवतरण म्हणजे खाली उतरणें. अवतार म्हणजे कोणी तरी वर असलेला खाली आला असा त्याचा अर्थ. ह्या दृष्टीनें वरच्या लोकांत असणाऱ्या वैकुंठ, कैलास, ब्रह्मलोक, स्वर्गादिमध्ये असणारे उच्च अशा देवत्वात असणारे परमात्मा किंवा परमात्म्याचे भक्त जगाला मार्गदर्शन करण्यासाठी ह्या भूलोकांत जन्म घेतात तेव्हां त्याला अवतार असे नाव दिले जाते.

ह्या अवतारांचा मुख्य उद्देश कोणता ? अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ।

‘परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् । धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ||

धर्मसंस्थापना हा अवताराचा मुख्य उद्देश ! श्रीमद् दासबोधामध्ये श्री समर्थांनी एक वाक्य सांगितले आहे. ‘धर्मसंस्थापनेचे नर । ते ईश्वराचे अवतार ।’ धर्मसंस्थापनेचा हव्यास असणाऱ्यांना अवतार म्हणावे असाच त्याचा अर्थ. म्हणजेच धर्मसंस्थापनेचा संकल्प त्यांच्या ठायी उदय पावतो हेंच अवताराचे लक्षण होय हेच स्पष्ट होते. ह्या अवतारात अंशावतार व पूर्णावतार असे दोन क्रम आहेत. पूर्णावतार म्हणजे ब्रह्मा, विष्णू व शंकर ही त्रिमूर्ती धर्मसंस्थापनेच्या संकल्पाने ह्या भरतीतलावा जन्म घेतात. तेव्हा त्याला पूर्णावतार असे म्हणतात. इतर वेळी तेवढया शक्तीच्या देवतेचें काम नसल्यास त्रिमूर्तीच्या आज्ञेनें, संकल्पाने त्यांच्या भक्तांचे अवतार होतात. पतीतपावन म्हणवून घेणारे ते भक्तगण सुद्धा पुन्हा पुन्हा धर्मसंस्थापना करतात तेव्हा त्यांनाही ‘अवतार’ असेच म्हणतात.

‘पालन कार्य विष्णूचे ।’ जगाचे पालन करण्यासाठी धर्मस्थापनेची आवश्यकता असते. म्हणून त्यासाठी जगतूपालनकर्ता विष्णूच धर्मरक्षणासाठी अवतार घेतो असे म्हटले आहे. धर्मस्थापनेच्या उद्देशाने झालेले श्रीशंकराचे अवतारहि विष्णूचेच कार्य करणारे असल्यामुळे तेहि विष्णूचेच अवतार होत असे म्हणता येईल.

ब्रह्मा, विष्णू, महेश्वर हे तिघेहि विष्णूचे म्हणजे कृष्णाचे अवतार. पालन करणे हे विष्णूचे कार्य नव्हे काय ? आणि ‘निमिपार्थेन संहरति ।’ एका क्षणांत जगाचा नाश करतो व दुसऱ्या क्षणांत उत्पन्न करतो.

‘कालोऽस्मि लोकक्षयकृत्प्रवृद्धो । लोकान्समाहर्तुमिह प्रवृत्तः ।’ सर्व लोकांचा नाश करणारा काळ मीच असल्याने वाढणाचा स्वर्ग, मृत्यु, पाताळादि सर्व लोकांचा संहार करण्यासाठी मी निघालो आहे, असें श्रीकृष्णानीच सांगितले आहे. म्हणून तोच ब्रह्मा, तोच विष्णु, रुद्रहि तोच. कार्य परंपरेने परमेश्वरास ही नावे मिळाली आहेत. ह्या तिन्ही अवतारांत एकमेव परमात्माच व्यापला आहे.

परमात्म्याचा प्रकाशच मुक्तांच्याद्वारे अबतारामधून प्रकट होत असतो. परशुरामाचा अवतार म्हणजे परमात्म्याच्या अनुग्रहाने सामर्थ्य मिळवून झालेला अवतार. अशा प्रकारे धर्मस्थापनेस आवश्यक असणार सामर्थ्य परमात्म्याकडून अनुग्रहित झाल्यावरोवर झालेला अवतार तो विष्णूचाच अवतार असें म्हणता येईल. ह्या दृष्टिकोनांतून आपल्या भारतवर्षामध्ये जे जे धर्मस्थापनेसाठी झटले, कोणत्या तरी एका धर्मस्थापनेस ध्येय मानून ज्यांनी आपले आयुष्य घालवले ते सर्वजण अवतारीच. निरालसता, निःस्वार्थता, सत्शील, लोकहिताच्या दृष्टीने पूर्वाचार दृढमूल करण्यासाठी जीवन समर्पण केलेले सर्वहि अवतारच. त्यांच्या त्यांच्या कार्यकक्षा कमीजास्त असू शकतील परंतु त्यांची योग्यता समानच असते. विस्तव छोटा मोठा असला तरी तो अग्नीच नाही कां ? धर्मपालन हे कार्य विष्णूचेच. म्हणून धर्मकार्याची प्रवृत्ति असणारे सर्वजण विष्णूचेच अवतार होत.

‘यद्यद्विभूतिमत्सत्त्वम् ।’ उन्नत, अलौकिक, असामान्य असणारे सर्व माझ्यापासून, माझ्या अंशाने निर्माण झाले आहेत असे समज; ह्या भगवदुक्तीच्या दृष्टीने आतापावेतो अवताराविषयी सांगितलेले सर्व योग्यच झाले.

दत्ताचा अवतार ? दत्त हे नाव कसे पडले हे शांडिल्योपनिषदामध्ये गितले आहे. ‘सदुश्चरं तपः तप्यमानाय अत्रये पुत्र कामातितरां तुष्ठेन भगवता ज्योतिर्मयेन आत्मैव दत्तः । ब्रह्मा, विष्णु, महेश ही त्रिमूर्ती आपली मुले व्हावीत अशी प्रबळ इच्छा धरून अतिशय घोर तपश्चर्या करीत असलेल्या अत्रिमहर्षीना पाहून त्यांनी प्रसन्न होऊन आपण आपणा स्वतःस दिले. दिव्य स्वयंप्रकाशित ज्योतिर्मय परमात्मा अत्रिमहर्षीच्या अशा घोर तपास, दिव्यतेस व भक्तीस पाहून तुष्ट झाले. व त्यांची कामना पूर्ण करण्यासाठी स्वतःलाच स्वतः दिले, तोच दत्त । दत्त म्हणजे जो दिला गेला तोच नाही का ? त्या दृष्टीनेच परमात्म्याने स्वतःला अत्रिमहर्षीच्या स्वाधीन केले; तो त्यांचा पुत्र बनला म्हणजेच तो अत्रिमहर्षीत आविर्भूत झाला, शुद्ध हृदय असणाऱ्या दंपतीच्या पोटी परमात्म्याने अवतार घेतला. तुम्ही परमात्म्याच्या चरित्राचे परिशीलन करा. त्याच्या आईवडिलांनी अनेक कष्ट भोगून महाकठीण अशा अनेक साधना करून आपल्या सुशीलतेला पणाला लावून कोणत्याहि बिकट परिस्थितीत सत्याची कास धरून सच्चरित्र असे म्हणवून घेऊन मगच परमात्म्याच्या कृपेला ते प्राप्त झाले असे आढळून येईल.

त्रि म्हणजे तीन गुण. हेच जग चालवितात. ह्या तिन्ही गुणांनी हे जग वेढलेले आहे. सत्त्व, रज, तम, हेच तीन गुण. सत्त्व म्हणजे शुद्ध विरक्ति, पारलौकिक आसक्ति, स्वार्थत्यागाची प्रवृत्ति, गुरु व वडीलधान्या माणसांच्या विषयी आदर बाळगणे हे सत्त्व म्हणजे सत्त्वगुणज्ञानप्राप्तीसाठी कारणीभूत होत.

‘यदा सत्त्वे प्रवृद्धे तु प्रलयं याति देहभृत् तदोत्तमाविदां लोकान् अमलान् प्रतिपद्यते ।।”

सत्त्वगुण जास्त असणाऱ्यांचे प्राणोत्क्रमण झाल्यास त्याला पुण्यलोक प्राप्ती होते.

‘ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसाः ।
जघन्यगुणवृत्तिस्था अथो गच्छन्ति तामसाः ||

‘पापपुण्यं समं कृत्वा नरयोनिषु जायते ।’ मानवी जन्म हा सर्वसाधारणपणे पापपुण्य समसमान असेल अशा वेळीच प्राप्त होतो. विशेषतः ही कर्मभूमी रजगुणप्रधान आहे.

तीन गुणांमुळेच मनुष्यास कोणत्यातरी एका लोकात जन्म घ्यावा लागतो. ह्या तिन्ही गुणांना जिंकणारे एक सुख आहे ते म्हणजे आत्मसुख. ते प्राप्त करून घेतले पाहिजे त्या सुखात स्वतः विरघळून त्याच्याशी एकरूप झाले पाहिजे, अशी भावना निर्माण झाली तर तो अत्रिमहर्षी होऊ शकेल. ह्या तीन गुणांपासून सुटलेले, मुक्त झालेले तेच अत्रिमहर्षी. तो गृहस्थ असो वा नसो अनसूया ही त्याची पत्नी म्हणजेच असूया नसलेली, तिने शरीर रूप धरलेले असो किंवा बुद्धिरूप धरलेले असो, त्रिगुणात्मक सुखरूपाला प्राप्त करून घेण्याकरता कठीण साधना करीत राहिल्याने त्या साधकाच्या ठायी परमात्म्याने अवतार घेतला, परमात्मा अवतरला आणि ‘दत्त’ म्हणून त्याने लोकानुग्रह केला.

श्री गुरुदेवदत्त !!

home-last-sec-img