Literature

श्रीरामाचे ऋषिजीवन व स्थितप्रज्ञत्व

तदप्रियममित्रघ्नो वचनं मरणोपमम् ।

श्रुत्वा न विव्यथे रामः कैकेयीं चेदमब्रवीत् ॥ १९ ॥

नाहमर्थपरो देवि लोकमावस्तुमुत्सहे । 

विद्धि मां ऋषिभिस्तुल्यं विमलं धर्ममास्थितम् ॥ २० ॥

यदत्रभवतः किंचिच्छक्यं कर्तुं प्रियं मया । 

प्राणानपि परित्यज्य सर्वथा कृतमेव तत् ॥ २१ ॥

( वा. रा. अ. स. १९)

इतरांना मृत्युप्रायच असणारें कैकेयीचें तें कठोर वचन ऐकून श्रीरामाची प्रसन्न मुखकांति थोडीसुद्धां कमी झाली नाहीं की मनाला थोडें म्हणून वाईट वाटले नाही. राज्याभिषिक्त होण्याकरितां म्हणून येतांना जो एक उत्साह व आनंद मुखावर दिसत होता तोच शेवटपर्यंत कायम होता. आत्मस्थितीच्या माणसाचें त्या अनंत आनंदांत विरघळून असणारें चित्त बाह्य सुखदुःखाच्या कसल्याहि आघातांनी थोडेंसुद्धां कधी विचलित होत नसतें. तें केव्हांहि विकार पावत नाहीं. तें निवांत स्थळी असलेल्या दिव्याच्या ज्योतिप्रमाणे अचल असतें. या तत्त्वाचा येथें साक्षात्कार होतो. मुखकांतिर्न नश्यति  या उपनिष द्वाक्याचें सत्यत्व येथें अनुभवास येतें. या ठिकाणीं आत्मनिष्ठाच्या व्यवहाराची ओळख श्रीरामांनी सर्व जगांतील माणसांना चांगलीच पटवून दिली आहे.

श्रीराम माते कैकेयी ! पित्राज्ञा उल्लंवून राज्याभिषिक्त होण्यास वैभवाला हपापलेला हा राम आहे असे समजूं नकोस. ऋषिजनाप्रमाणेच मला तूं धर्मनिष्ठ समज. मला कसल्याहि ऐहिक सुखाची यत्किंचितहि अपेक्षा नाही. कधीहि न ढळणारी व तशीच निरवधि अखंड आनंदाची आत्मस्थिति माझी आहे. याच्या या देहपातानें जरी तुझा उद्देश पूर्ण होत असेल तर तेहि करण्यास हा राम सिद्ध आहे. तुझे प्रिय आचरण्यांत मला देहपाताचीहि खंती नाहीं हें पक्के समज. तुझें इष्ट मी करीनच करीन. अयं तु परमो धर्मो यद्योगेनात्मदर्शनम् । या तत्त्वाचा येथे आविष्कार झाला आहे. सत्याचा जो साभिमान । तो जाणावा निरभिमान  या श्रीसमर्थांनी केलेल्या विधानाचीहि ही पार्श्वभूमी आहे. इंद्रोऽपि लघुतां याति स्वयं प्रख्या पितैर्गुणैः । आपली आपण स्तुति केली असतां इंद्रहि हलका ठरतो असे जरी असले तरी कित्येक प्रसंगी आपली यथार्थ जाणीव येण्याकरितां आपल्या मुखानेंच आपला परिचय करून देण्याची वेळ येते. अशा प्रसंगी केलेलें आत्मनिंदर्शन आत्मस्तुतीच्या सदरांत येत नाही. यावेळी आपला यथार्थ परिचय नाहीं करून दिला तर विपरीत भावनेनें स्वपर अनहित होण्याचा प्रसंगच येऊन ठेपतो. हेंहि या ठिकाणी श्रीरामानें आपले हृदय उकलून आम्हां सर्वांना कळविले आहे. यानि सिद्धस्य लक्षणानि । तानि साधकस्य साधनानि । सिद्धांच्या लक्षणांचा अभ्यासच साधकांची साधनें होत. ब्राह्मणांच्या ज्ञानयुक्त त्यागमय जीवनाचा आदर्श मनापुढे ठेऊन तत्कालीन राजे लोकहि कसे वागत होते हैं यावरून व्यक्त होते. एरवीं राज्योपभोगाच्या त्या सर्व वासना एकदम सोडून असाहाय्य होऊन त्या वृद्धावस्येंत वानप्रस्थ धर्माच्या आचरणाकरितां निविडारण्य प्रवेश करणे त्या राजे लोकांना कधी शक्य तरी झालें असतें का यांत आर्यांच्या जीवनाची दिशा उमगते.

home-last-sec-img