Literature

श्रीरामावतार

आज श्रीरामनवमीचा दिवस आहे हे आपणांस माहित आहेच. आज श्रीरामरायांचा जगाच्या उद्धारार्थ झालेला दिव्य जन्म, त्यावेळची ती आनंददायी आठवण तो आपणांस प्रतिवर्षी करून देत असतो. त्यांचे ते जगदुद्धाराचे कार्य त्यावेळी सुरू झाले आणि आता ते बंद पडले असे नसून चालूच आहे हे हा उत्सव सिद्ध करतो.श्रीरामाचे स्वरूप वर्णितांना तो परमात्मा आहे असे श्रुति सांगते. आपण जीवात्मे ज्याचे अंश. तो आपले पूर्णस्वरूप आहे हे दाखविण्याकरता त्याला पूर्णस्वरूप म्हटले आहे. ‘यथा सुदीप्तात्पावकाद्विस्फुलिङ्गाः सहस्रशः प्रभवन्ते स रूपा तथाक्षराद्विविधाः सोम्यभावाः प्रजायन्ते तत्र चैवापियन्ति ॥

अग्निपासून जशा ठिणग्या निर्माण होतात तसे परमात्म्यापासून अनेक नामरूपाचे संकल्प निर्माण होतात. त्यावेळीच त्या त्या उपाधिभेदाने अनेक जीवहि निर्माण झाल्यासारखे वाटतात. आनंदरूप परमात्म्याच्या ठिकाणी जे काही होते ते सर्वहि आनंदच असते. प्रकृतीहून त्याचे स्वरूप अनादि आहे. त्याच्या शक्तीहून त्याचे स्वरूप आधीचें आहे, अनादि आहे. तो ह्या शक्तीच्या योगाने, आनंदरूपाने हे जग निर्माण करतो.

श्रुति सांगते-नात्र काचन भिदास्ति नेव तत्र काचन भिदास्ति।’ ह्या ठिकाणी व त्या ठिकाणी कुठेच भेद नाही. पूर्णापासून पूर्णच निर्माण होते. समद्रापासून तरंग निर्माण होतात. आनंदाचा उद्रेक म्हणजेच कार्याची स्फूर्ति. आनंदरूपांतून जे काही निर्माण होते ते सर्वत्र आनंदाविर्भावानें मंगल प्रदर्शन आहे. ह्या आनंदाव्यतिरिक्त जे काही मानील तें दुःखच. श्रुति सांगते- ‘आनंदावांचून ह्या जगांत आहेच काय दुसरें? ‘जे काही निर्माण होते तें आनंदरूपच. तद्व्यतिरिक्त कांही नाहीच. त्याचे अज्ञान म्हणजे दुःख. जी आनंदाची तृप्ति आनंदरूपाची अभिव्यक्ति म्हणजेच जग. अशा त्या आनंदघनाचा आविर्भाव होणे म्हणजे अवतार होणे. असा तो आनंदरूप श्रीराम त्याचा अवतार आज झाला. ज्याच्यामुळे नित्य तृप्ति, अचल समाधान नितांत शांति अंगी बाणते त्या मंगलमय आनंदाचा आविर्भाव म्हणजेच श्रीरामाचा अवतार म्हणजेच श्रीरामाचा जन्म अशा आनंदाचा साक्षात्कार व हे उद्दिष्ट साधण्याकरतांच आपण येथे श्रीरामरायाच्या दरबारात आलो आहोत. त्याच्या जन्मदिवशी तरी तो आपलें ब्रीद पाळील व आपणांस आनंदाचा साक्षात्कार करून देईल.

आनंदाची आवश्यकता केव्हां भासते? तर असह्य दु:ख झाले म्हणजे. व परमात्म्याशिवाय आनंदाची प्राप्ती नाही. पापरूपी अधर्माने ही जनता पीडित होते, दुःखित होते, दुःखी होते, जेव्हां पाप माजतें तेंव्हा ते पाप नष्ट करून पुण्यमार्गाचा अवलंब करून, अधर्म नष्ट करून धर्माचरण कसे ठेवावे हे शिकवण्याकरता परमात्म्याचा अवतार होतो.

ही भूमी जेव्हां अधर्माने, पापाने पीडित होते तेव्हा तिला आमचा भार होतो. तिचा पुण्यक्षय होतो. पाप वाढू लागले म्हणज तिचा नाश होईल म्हणून ती गाईच्या रूपाने परमात्म्याला शरण जाते। व नंतरच परमात्मा अवतार घेऊन येतो व ह्या जगाची दुःख संकट नष्ट करतो. जगताचा हाहा:कार ऐकन जनतेची केविलवाणी स्थिती दूर करण्यासाठी गोरूप धारण करून दुष्टोचा भार सहन न झाल्यामुळे ही पृथ्वी परमात्म्याकडे जाते, देव व मनीजन हिच्या बरोबर असतात. ‘गो’ म्हणजे वाणी म्हणजे जनतेची वाणीव एकवटन परमात्म्याला सांगते व करुणेनें परमात्म्याच्या हृदयांत दया निर्माण करते. तिच्या रूपाने ती सबंध जगतच आपल्याबरोबर घेऊन जाते. तिला अभय मिळाले म्हणजे सबंध जगालाच अभय मिळते. अधर्म, अनीति, दुष्प्रवृत्ति म्हणजे अधिक विषय सुखाचा पेटलेला वणवा व स्वेच्छाचार हा जगात माजविला म्हणजे जगाचे हे दुःख घालविण्याकरता व स्वताच्या आनंदाचा आविर्भाव सर्वत्र करण्याकरता हा परमात्मा अवतार घेतो. स्वेच्छाचारापासून अनीतीपासून जे दु:ख झाले असेल तें नष्ट करून धर्माच्या, नीतीच्या, सदाचरणाच्या स्थापनेकरता तो आनंदरूप परमात्मा आविर्भूत होतो.

दशरथ म्हणजे साधक, कौसल्यारूपी बुद्धी ही त्याची धर्मपत्नी. आत्मा त्वं गिरिजा मतिः‘ आचार्यांनी शंकराला उद्देशून ‘तूं म्हणजे माझा आत्मा आहेस व गिरिजा म्हणजे माझी ही बुद्धी’ असे म्हटले आहे. बुद्धी ही पत्नी म्हणून मानली जाते. ‘बुद्धिरुपा ब्रह्मशक्तिरेव प्रकृतिः ।’ सामुदायिक प्रजेचे रूप म्हणजे राजा-प्रजेचे एकवटलेले रूप म्हणजेच राजा व त्याची बुद्धिरूपी शक्ति सर्वतोपरी योग्य झाली म्हणजे तिच्या ठिकाणी परमात्मा अवतार घेतो. म्हणजेच या जगताचे जे आनंदघनरूप आहे ते आविर्भूत होतें. साधक जेव्हा श्रद्धेने, भक्तिने, वैराग्य अंगी बाणून आत्मसाक्षात्काराला सर्वतोपरी अनुकूल असें आचरूं लागतो तेव्हा त्याच्या त्या बुद्धीरूपी कौसल्येत त्या आनंदघनरूपाचा आविर्भाव होतो, तोच आत्मसाक्षात्कार आणि हाच श्रीरामाचा अवतार.

व्यक्तिव्यक्तींचा मिळून एक समाज’ होतो. अनेक व्यष्ठीतून समष्ठी निर्माण होते. प्रत्येक व्यक्ति सुधारली तर आपोआपच सर्व समाज सुधारतो. तेव्हा समाज सुधारण्याचा उपाय म्हणजे प्रत्येक व्यक्तीने आपल्याला सुधारणे हे होय. पण सर्वसामान्य समाजातून ‘ सांगोची जाणती सर्वे । कर्ता कोणी दिसेचिना ॥’ असे आढळून येते. पण श्री समर्थ सांगतात ‘ सांगावे ते आपणाला । आपणू कर्ता भले ॥’ असो.

धर्मपत्नी जर योग्य असेल तर जीवन आनंददायी होते. बुद्धीही तुमची धर्मपत्नी व शक्ति आहे. ती जर तुम्हाला अनुकूल होऊन सदाचार संपन्न झाली तर त्या परमात्म्याचा साक्षात्कार होतो. हा खरा रामाचा अवतार. हे खरें रामाचे दर्शन.

‘शृणु देवि प्रवक्ष्यामि गुह्याद्गुह्यतुर महत् । अध्यात्मरामचरितं रामेणोक्तं पुरा मम ॥’ पार्वती म्हणजे शंकराची बुद्धी. आत्मा त्वं गिरीजा मतिः।’ आत्मा हा महादेव आहे, त्याची मति म्हणजेच बुद्धी म्हणजेच गिरिजा. बुद्धीचे लक्षण प्रकाशरुप आहे. बुद्धी जाणीवरुप आहे. तिला सत्प्रवृत्त करायची आहे. ती विषयाकडे धावते आहे. तिला आत्मस्वरुपाकडे ओढायची आहे. बुद्धीला अध्यात्म, आत्मसंबंधी विचार शिकवावयाचे असतात. ते कोणते? तर श्रीरामाच्या अध्यात्माचा विचार हा प्रत्यक्ष रामाने सांगितला आहे. तसेच ज्यामुळे बुद्धी ही निवृत्तिपर होते तो विचार शंकराने पार्वतीला सांगितला. त्यांनी पार्वतीला म्हणजे आपल्या बुद्धीलाच बोध केला आणि आम्हालाहि तोच घडा घालून दिला.

आमचें हें जीवन तापत्रयाने गांजलेले आहे. त्या त्रितापाची शांति होऊन आम्हाला आनंदाची प्राप्ती व्हावयाची आहे. ज्याच्या श्रवणाने मुक्ती लाभते ते अध्यात्मविचार शंकरानी पार्वतीला सांगितले बुद्धिरुप पार्वतीला आत्मसाक्षात्कार करून देणारा तो शंकर. ‘शं करोति इति शंकरः।’ मा ठिकाणी साधक आणि बुद्धी असें नाते आहे. तसेंच तें दशरथ कौसल्लेच्या ठिकाणी आहे. आपण दशरथ आपली बुद्धी म्हणजे कौसल्या. तिला आपल्यासारखी करून आपल्या तंत्राने वागेल अशी करावयाची आहे. तिला सदाचार संपन्न, भक्तिपूर्ण, ज्ञानविचाराने युक्त करावयाची आहे. तिला आत्माकार करावयाचा आहे. आत्माकार बुद्धी झाली म्हणजे आत्मस्वरुपाचा साक्षात्कार होतो. राम हा आत्माराम आहे. आज त्याच्या जन्मदिनी त्याची उपासना करावयाची व प्रार्थना करावयाची की, त्याने आपले स्वरूप आम्हाला प्राप्त करून द्यावें.

रावण म्हणजे दर्शद्रियांचा सुखाभिमान. त्याने रामस्वरुपांची जाणीवरूप सीता हिरावून नेली व तो देहात्मबुद्धीचा मदोन्मत्त रावण आम्हां सात्विकांना छळतो आहे. त्यासाठी देवाची प्रार्थना करावयाची आहे की, ‘आनंदरुपी तुझा आविर्भाव आमच्या हृदयांत झाल्याशिवाय तो मदोन्मत्त रावण नष्ट होणार नाही व ती तुझी जाणीव प्राप्त होणार नाही. म्हणून तूं त्या रावणाचा नाश करण्याकरतां आमच्या हृदयांत अवतरून. तुझ्या जाणीवरुप सीतेची बंधमुक्तता कर, सत्कर्मरूप देवांची सोडवणूक कर.’ बुद्धिरुप कौसल्येचा गर्भ म्हणजे मीपणाची स्मृति. त्या स्मृतीत आत्मसाक्षात्कार व्हावयाचा आहे व त्या आत्मसाक्षात्कारानेच आपली तृप्ती व्हावयाची आहे. हे मीपणाचे भान देहरुप नसून ते ज्या मंगलमय आनंदमहोदधीपासून निर्माण झालें तो आवंदमहोदधीच, ‘मी’ अशा खऱ्या आवंदाचा अनुभव येऊन आत्मस्वरुपाचा साक्षात्कार झाला तो आनंद अखंड स्थिरावून प्रगट झाला म्हणजे श्री रामरायांचा अवतार झाला व त्याने रावणाला मारले आणि सर्वत्र रामराज्याची गुढी उभारली. आमच्या भारतांत रामराज्याची स्थापना झाली. ‘भाः ब्रह्मविद्या तस्यां रमत इति भारतः।’ भा रुपी ब्रह्मविद्येत रममाण होणाऱ्या ह्या भारतात ब्रह्मविद्येनें लक्षित होणाऱ्या आत्मावंदरुपी रामराज्याची स्थापना झाली व अखंड भारत त्या आत्मानंदात रमू लागला म्हणजे आमचे जीवन नित्यतृप्तीचे झालें.

सज्जनगिरी म्हणजे सत्-जन-गिरी. सत् म्हणजे अविनाशी आत्मरुप तद्रूप झालेले जन म्हणजे सज्जन. असे हे सज्जन ज्या ठिकाणी गिरीप्रमाणे अचल असतात. तो सज्जनगिरी. आत्मानंदाचा साक्षात्कार जिथे होतो तोच हा सज्जनगिरी. इथे त्या आनंदरुप श्रीरामरायाने प्रगट होऊन म्हणजे त्या आनंदाचा साक्षात्कार आमच्या हृदयांत होऊन श्रीरामरायानी आमच्यावर कृपा केली.

श्रीसमर्थांचाहि जन्म आजच. ‘गुरुशिष्या एकचि पद । तेथेना भेदाभेद ॥’श्रीसमर्थ आणि श्रीरामराय ह्यांच्यात भेद नाहीं हेच आजच्या रामजन्मकाली सिद्ध होते.

home-last-sec-img