Literature

श्रीसमर्थांचें सांगणें

साधकांनी सतत अभ्यास करावा. स्वयं तीर्त्वा परान् तारयेत् ।आपणासी बरें पोहतां न ये । लोक बुडवावयाचें कोण कार्ये । (दा. १९-७-१६). आपण आधी चांगले पोहावयाला शिकून मग दुसऱ्याला शिकवावयाचे असते. तरतेन बुडों नेदावें । बुडतयासी ।।” का बुडतेन बुडों नेदावें बुडतयासी ? श्रीसमर्थ अभ्यासावर किती भर देतात पहा ! अखंड येकांत सेवावा । अभ्यास चि करीत जावा ।अभ्यास करून आपली दृढ भूमिका झाली म्हणजे मग काळ सार्थक चि करावा| जनासहित | (दा. ११-१०-१७). ज्ञानी आणी उदास । समुदायाचा हव्यास |तेणें अखंड सावकाश | एकांत सेवावा ॥ (दा. १९-९-१). येकान्तेविण प्राणीयांतें । बुद्धी कैची ॥ ( दा. १९-६-२९ ). जयास येकांत मानला । अवघ्या आधी कळे त्याला (दा. १८ १०-५०). एकान्त मौन, दुग्धाहार, तत्त्वाभ्यास, वासनापरित्याग, स्वरूपानंदांत वृत्तीचा विलय करून होईल तितका अधिक वेळ निर्विकल्प स्थितीत रहाणे असा अभ्यास करावा. आत्मशांतीनें, आणि समाधानानें असावें.

सुंदरकांडांतल्या श्रीमारुतिरायांची भूमिकाच आत्मशांति शोधार्थ निघालेल्या निःस्पृहाची असते. अभ्यासें प्रकट व्हावें । नाहीं तरी झांकोन असावें । प्रकट होऊन नासावें हें । बरें नव्हे ॥ (दा. १७-७-१७) असे श्रीसमर्थानी सांगितलेले कधींहि विसरूं नये. संविन्मात्रस्थितश्वाहमजोऽस्मि किमतः परम् । मीया माझ्या जाणिवेनें मला सकळ कळून येतें. सुषुप्तीत मीही जाणीव माझ्यांत लीन झाली असता कांहींच कळून येत नाही. माझ्यांत सर्वप्रथम मीहे भान निर्माण होऊन या आपल्या भानानेच सर्वकाही समजतें. सर्वांचें ज्ञान करून देणारे माझे भान सुषुप्तीत कोणतेच दृश्य नसतां ज्या माझ्यांत विरतें तो मी ज्ञेयशून्य केवळ ज्ञानमात्रच आहे. माझ्या या अखंड ज्ञानमात्र स्वरूपांत उत्पन्न होऊन नाश पावणारे कोणतेंहि दृश्य अथवा ज्ञेय नाहीं. उत्पत्तिनाशविरहित असा मी ज्ञेयशून्य, अन्यशून्य, ज्ञान मात्र आनंदघन आहे; दुसरें नाहींच. मग कशाचा करावयाचा ? कशाची इच्छा करावयाची? कशाची अपेक्षा बाळगावयाची ?कुणाला आठवावयाचे? प्रेम कुणावर आणि द्वेष कोणाचा ? अशा विचाराने, निर्विकल्प आनंदमात्र रहात जावे. निर्माण झालेले मीहे भान उत्पत्तिनाशयुक्त निर्माण झालेली स्फूर्ति उत्पत्तिनाशयुक्त म्हणून दोन्ही चंचल आहेत. यांत प्रतिबिंबिणारे दृश्यहि उत्पत्तिनाशयुक्त आणि चंचल आहे. या सर्वांच्या उत्पत्तीच्या पूर्वी असणाऱ्या ज्या प्रकाशानें ही सर्व प्रकाशतात तो मी स्वप्रकाश याचा साक्षी नित्य उत्पत्तिनाशशून्य निश्चल ज्ञानानंदरूप आहे. म्हणून त्या निर्विकल्प स्थितीत रहाणे म्हणजेच स्वरूपस्थितींत रहाणें. अशा सतत विचाराने निर्विकल्पाचा अभ्यास अखंड चालवावा,

निर्विकल्प समाधीपर्यंत अभ्यासाची मर्यादा आहे. वाटेल .तेव्हां वाटेल तितका वेळ, कसल्याहि परिस्थितीत तत्क्षणी निर्विकल्प समाधीत, मनांत आले की ज्याला सहज राहता येते, आनंदस्वरूपाचे भान ज्यांत अखंड तेवत असतें; कशामुळेहि ज्याच्या मनाला विक्षेप होत नाहीं, ज्याची शांति ढळत नाही, त्याने असे झाल्यानंतर मग यदृच्छेनें प्राप्त होणाऱ्या लोकसंग्रहा कडे वळावे. ‘जालें साधनाचे फळ । संसार झाला सफळ । निर्गुणब्रह्म तें निश्चळ । अंतरी बिबलें ॥‘ (दा. २०-१०-२६) असा अनुभव यावयाला पाहिजे… परमार्थी आणि विवेकी । त्यांचे करणे माने लोकी । का जे विवरविबरों चुकी। पड़ों चि नदी ॥‘ (दा. १९-६-१) हे धकाधकीची कामे । तिक्ष्ण बुद्धीची वर्मे । भोळया भावार्थे संभ्रमें | कैसें घडे ।। (दा. १९-७-१९) उत्कट भव्य तें चि घ्यावें । मळमळीत अवघेचि टाकावें ।

निःस्पृहपणे विख्यात व्हावें । भूमंडळी । (दा. १९-६-१५) दीक्षा बरी मीत्री बरी। तीक्ष्ण बुद्धी राजकारणी बरी |आपणास राखे नानापरी । अलिप्तपणें ॥ (१९-६-१७) दुर्जनासी राखों जाणे ( चांगले करून) | सज्जनासी निवऊ जाणें | सकळांचे मनीचे जाणे| ज्याचे त्यापरी । (दा. १९-६-१९) संगतीनें मनुष्य पालटे । उत्तम गुण तत्काळ उठे । अखंड अभ्यासी । लगटे । समुदाव ।। (दा. १९-६-२०) जेथे तेथें नित्य नवा । जनासी वाटे हा असावा । परंतु लालचीचा गोवा | पड़ों चि नेदी | (दा. १९-६-२१). उत्कट भक्ति उत्कट ज्ञान । उत्कट चातुर्य उत्कट भजन | उत्कट योग अनुष्ठान । ठाई ठाई । (दा. १९-६-२२) साधन करून एकदां का सिद्ध बनले म्हणजे आपोआप हे साधतें, लाभतें आणि घडते; म्हणून निःस्पृह साधकांनी अभ्यासाशिवाय प्रकट होऊ नये, असे माझें श्रीसमर्थाच्या शिकवणीप्रमाणे मत झाले आहे. आता हे आपणाचिपासी । बरें विचारावें आपणासी । अनकूळ पडेल तैसी । वर्तणूक करावी || (दा. १९-३-३०) शुद्ध विश्रांतीचे स्थळ । तें एक निर्मळ निश्चळ । तेथें विकार चि सकळ । निर्विकार होती ।। (दा. १९ ८-२५) उद्वेग अवघे तुटोनी जाती। मनासी वाटें विश्रांती । ऐसी दुल्लभ परब्रह्म स्थिति । विवेकें सांभाळावी ।। (दा. १९-८-२६). दृश्य पदार्थ जाणिजे । त्यास पदार्थज्ञान बोलिजे । शुद्ध स्वरूप जाणिजे । या नांव स्वरूपज्ञान || (दा. ५-६-७), ऐक ज्ञानाचे लक्षण | ज्ञान म्हणिजे आत्मज्ञान । पहावें आपणासी आपण । या नाव ज्ञान ।। (दा. ५-६-१) आपला आपणासी लाभ । हें ज्ञान परम दुल्लभ (दुर्लभ)। जें आदिअंती स्वयंभ । स्वरूप चि स्वयें ।। ‘ (दा. ५-६-१५) का, ही ओवी वाचली म्हणजे किती आनंद होतो ! किती समाधान वाटते ! आपल्या निश्चल ज्ञानरूपतेचा आनंद लुटावा. जे या चराचराचें मूळ । शुद्ध स्वरूप निर्मळ । या नाव ज्ञान केवळ । वेदांतमतें ॥ (दा. ५-६-१८) शोधिता आपले मूळ स्थान । सहज चि उडे अज्ञान । या नांव म्हणिजे ब्रह्मज्ञान । मोक्षदायक ।। (दाः ५-६-१९) मी कोण ऐसा हेत । धरून पाहतां देहातीत । अवलोकिता नेमस्त । स्वरूप चि होये || (दा. ५-६-२१) श्रीसमर्थांनी आपल्याला किती कळकळीनें उपदेश केला आहे पहा ! जे अत्यंत गहन । माझ्या स्वामीचे वचन (स्वामीचे म्हणजे श्रीरामरायाचे) जेणें माझे समाधान । अत्यंत जालें || (दा. ५-६-४१). तें हे माझे जीवींचें गुज । मी सांगेन म्हणतो तुज । जरी सावधान देसी मज । तरी आता येच क्षणीं ॥ (दा. ५-६-४२)अहं ब्रह्मास्मि महावाक्य । येथीचा अर्थ अतर्क्ये । तोहि सांगतो ऐक्य । गुरुशिष्य जेथें ।। (दा. ५-६-४४). ऐक शिष्या येथीचें वर्म । स्वयें तूंचि आहेसि ब्रह्म। ये विषई संदेह भ्रम । धरुंचि नको ॥ (दा. ६-६-४५). सृष्टीची नाही वार्ता । येथे मुळीच ऐक्यता ।पिंड ब्रह्मांड पाहों जातां । दिसेल कोठे ।। (दा. ५-६-४९) मिथ्यत्वें वृत्ति फिरे। तो दृश्य असताचि वोसरे । सहजचि येणें प्रकारें । जाले आत्मनिवेदन ॥ (दा. ५-६-५१) या नांव शिष्या आत्मज्ञान । येणे पाविजे समाधान । भवभयाचे बंधन । समूळ मिथ्या ॥ (दा. ५-६-५४) कोणासींच नाही बंधन। भ्रांतिस्तव भुलले जन । दृढ घेतला देहाभिमान । म्हणोनियां ॥ (दा. ५-६-५७) शिष्या एकांतीं बैसावें । स्वरूपीं विश्रांतीस जावें । तेणें गुणें दृढावे । परमार्थ हा ॥ (दा. ५-६-५८).निंद्य सोडून दयावें। वंद्य तें हृदई धरावें। सत्कीर्तिने भरावें। भूमंडल ॥ (दा. १३-१०-२०).

ध्यानं शौचं तथा भिक्षा नित्यमेकान्तशीलता । निःस्पृहांनी असे रहावें. मन ध्यानविलीन असावें. देहाची बाह्यशुद्धि जलमृत्तिकेनें संपादावी. अंतरशुद्धि आत्मविचाराने राखावी. एकान्तशीलता असावी. भिक्षावृत्ति ठेवावी.

home-last-sec-img