पूर्वपीठिका-
श्री स्वामीजी कर्नाटकात आल्यापासून आतापावेतो देवालयांचा जीर्णोद्धार, नूतन देवालय निर्माण, कुटी, धर्मशाळा, इत्यादिसाठी ३ ते ४ लाखापर्यंत काम झाले आहे. श्रीकामेश्वरपीठातील (वरदहळ्ळी) श्रीरामापुढे श्रीमारुतीची मूर्ती नव्हती. ती स्थापन करावी असे श्रींच्या मनात येऊन त्यांनी श्री. गणपती मास्तरांना तशी आज्ञा केली. त्यांनी ताबडतोब कारिकलहून मूर्ती मागवून श्रीरामापुढे लहानसे टुमदार देऊळ बांधले व श्रींच्या हस्ते श्रीमारुतिरायाची स्थापना करण्यात आली. ही बालमूर्ति फारच चित्ताकर्षक आहे. या मूर्तीकडे पाहून श्रींनी हे स्तोत्र रचिले आहे.
(प्रमाणिका वृत्तम्)
सुखैकधाम भूषणं । मनोजगर्वखंडणम्॥
अनात्मधीविगर्हणं । भजेSहमंजनीसुतम्॥१॥
अंजनीसुत वीर हनुमान मला (सर्वथा) भजनीय वाटतो. (कारण) सुखैकधाम श्रीरामनाम हेच त्याने आपले भूषण मानिले आहे. मदनाचा ज्याने निखालस गर्वपरिहार केला आहे आणि अनात्मबुद्धि लोकांशी तो नेहमीच फटकून वागतो.
भवांबुधिं तितीर्षुभिः । सुसेव्यमानमद्भुतम्।।
शिवावतारिणं परं । भजेऽहमंजनीसुतम्॥२॥
तुम्हाला सहजपणे भवसागर तरुन जावयाचे असेल तर अद्भुत कृत्ये करणाऱ्या शंकराचा अंशावतार श्रेष्ठ अंजनीसुताचीच उपासना करा.
गुणाकरं कृपाकरं । सुशान्तिदं यशस्करम्।
निजात्मबुद्धिदायकं । भजेऽहमंजनीसुतम्॥३॥
जो सकलगुण समुच्चय, सर्वांवर कृपादृष्टी ठेवणारा व सदैव शांतिदायक आहे; ज्याचे नाव यशाचा पर्यायी शब्दच आहे आणि भक्तांच्या ठिकाणी जो आत्मबुद्धि उत्पन्न करितो असा अंजनीसुत वीर हनुमान सदैव उपासनीय आहे.
सदैव दुष्टभंजनं । सदा सुधर्मवर्धनम्।।
मुमुक्षुभक्तरंजनं । भजेऽहमंजनीसुतम्||४||
सदैव दुष्टांचे नियमन करणे, सदधर्माचे वर्धन करणे मोक्षाची इच्छा करणाऱ्या भक्तजनांचे कौतुक करणे, हे अंजनीसुत हनुमानाचे ब्रीद आहे.
सुरामपादसेविनं । सुरामनामगायिनम्॥
सुरामभक्तिदायिनं । भजेऽहमंजनीसुतम्।।५।।
जो अंजनीसुत मला भजनीय वाटतो तो (स्वतःला) श्रीरामचंद्राच्या चरणांचा दास समजतो, श्रीरामनामाचे गायन करण्यात धन्यता मानतो आणि स्वतःप्रमाणे इतरांनाही “रामदास” बनवितो.
विरक्तमंडलाधिपं । सदात्मवित्सुसेवितम्॥
सुभक्तवृंदवंदितं । भजेऽहमंजनीसुतम्॥६ ।।
विरक्त मंडळीत जो अग्रपूज्य आहे, आत्मवेत्ते ज्याला आदराने मानतात आणि उत्कट भक्ती करणारेही ज्याला वंदन करतात त्या अंजनीसुत महारुद्राला मी वंदन करितो.
विमुक्ति विघ्ननाशकं । विमुक्ति भक्तिदायकम्।।
महाविरक्तिकारकं । भजेऽहमंजनीसुतम्||७||
मुक्तीला प्रतिबंधकारक अशा षड्-रिपूचा जो नाश करतो, जो ज्ञानोत्तर अखंड भक्तीच करतो; (आणि इतके असूनहि) जो संपूर्ण विरक्त आहे अशा अंजनीसुत हनुमंतास माझे वंदन असो.
सुखंयदेवमद्वयं । बृहत्त्वमेव तत् स्वयम्॥
इतीह बोधिकं गुरुं । भजेऽहमंजनीसुतम्॥८॥
संपूर्ण अद्वैत (राममय जगत्) मानणारा, सुखरूप, “अहं ब्रह्मास्मि” हा बोध ज्याला झाला आहे आणि तो बोध इतरांच्या ठिकाणी संक्रमित करण्यात जो पटाईत आहे अशा अंजनीगर्भसुत श्रीमारुतीरायांना माझे वंदन असो.
विरक्तिमुक्तिदायकं । इमं स्तवं सुपावनम्॥
पठंति ये समादरात । न संसरति ते ध्रुवम्||९||
(तुम्हाला सांगितले तर नवल वाटेल) पण वैराग्य व मुक्ति देणाऱ्या परमपावन अशा हनुमंताचे हें स्तवन, भक्तियुक्त अंतः करणाने पठण करणाऱ्यास “पुनरपि जननम्” संभवणारच नाही.
।। इति श्रीमत् परमहंसपरिव्राजकाचार्य सद्गुरु भगवता श्रीधरस्वामिना विरचितं श्रीसमर्थरामदास स्तोत्रं संपूर्णम् ।।