Literature

श्रुतीचा एकात्म उपदेश

तद् यद् इदमाहुः अमुं यज अमुं यज- इति एकैकं देवं एतस्यै सा विसृष्टिः एष उह्येव सर्वे देवाः । (शतपथ १४-४-२-१२) याची आराधना करा. याच्या याच्या प्रीत्यर्थ यज्ञ करा म्हणून एकेका दैवतांना पुढे करून अनेक विधानें सांगितलीं असली तरी हे सर्व त्या एका परमात्म्याच अंश असल्यामुळे, ही सर्व तद्रूप अशी त्याचीच सृष्टि असल्यामुळे हें सर्व कांही त्या परमात्म्याचेच स्वरूप आहे. तोच सर्व दैवतरूपानें आहे हें ठसविण्या करितांच, हें लक्षांत ठेवावें. सृष्टीतल्या विविध दैवतांचा व झालेल्या अखिल कार्याचा इकडे निर्वाह होऊन तिकडे एकात्मभावाचाहि निश्चय व्हावा हा श्रुतीचा उद्देश आहे, हे यावरील श्रुतिवाक्यावरून स्पष्ट होते. एक परमात्माच सर्वांच्या ठिकाणीं व्यापून आहे. त्याच्यापासूनच हें सर्वहि झालें. तोच सर्व जीवांचें, सर्व जीवांच्या देहाचें यथार्थ एक सच्चिदानंदघन स्वरूप होय. हें तात्त्विक ज्ञान पटवून झालेल्या कार्याच्या निर्वाहाकरितां यज्ञादिकांचे अनुष्ठान व त्या त्या दैवतांचें आराधन त्या त्या विषयीं अधिकारभेदानें अवश्य असल्या मुळे ते निष्कामानें व निश्चयानें शास्त्रोक्तरीत्या यथासांग पार पाडा व तें इहपर सुखाकरितां पार पाडलेंच पाहिजे असा श्रुतीचा उपदेश आहे.

home-last-sec-img