Literature

श्रुतीच्या उपदेशाचे तात्पर्य

यस्मिन् द्यौः पृथिवी चान्तरिक्षमोतं मनः सह प्राणैश्च स तमेबैकं जानथ आत्मानमन्या वाचो विमुंचथामृतस्यैष सेतुः ॥ ( २।२।५ ) 

– ज्यांत स्वर्ग, पृथ्वी व अंतरिक्ष, सकल सृष्टि व सर्व इतर साधना प्राणासहित मनहि एकत्रित झाली आहेत तें तुमचें सर्वव्यापक, सर्वा अनंत, स्वतःसिद्ध, अद्वितीय आनंदघन ब्रह्मस्वरूप जाणा. बाकीच्या सर्व गोष्टी सोडा; बाळगल्या तरी त्याला महत्त्व देऊं नका. त्यांतहि शास्त्रीयता आत्मविवेकच केवळ संसारसमुद्र ओलांडून जाण्यास एक सेतु होय. ए

विज्ञानानें निर्भेळ आनंदाची प्राप्ति होते. हेंच श्रुतीच्या उपदेशाचे तात्पर्य होय 

कस्मिन्नु भगवो विज्ञाते सर्वमिदं विज्ञातं भवतीति ॥ (मुंडक. ३|१|३)

ज्या एकाच्या ज्ञानानें एकदम सर्वांचेहि ज्ञान होतें तें असें आहे या जिज्ञासात्मक प्रश्नाचें वेदोपनिषद समाधान करतात.

आत्मा वा अरे द्रष्टव्यः श्रोतव्यो मन्तव्यो निदिध्यासितव्यो मैत्रेय्यात्मनि खल्बरे दृष्टे श्रुते मते विज्ञात इद सर्वे विदितम् ॥ (बृ. उ. ५-५-६)

आत्मा वा अरे द्रष्टव्यः श्रोतव्यो मन्तव्यो निदिध्यासितव्यो मैत्रे य्यात्मनो वा अरे दर्शनेन श्रवणेन मत्या विज्ञानेनेद सर्व विदितम् ।। (बृ. २|४|५ )

 – स्वाभाविकपणें आत्मस्वरूपच सर्वत्र पाहावें. ते तसें समजून नच आलें तर गुरुमुखानें समजून घ्यावें. गुरुमुखानें ऐकूनहि एकदम निश्चय झाला नाही तर गुरूपदिष्ट युक्तिप्रयुक्तीने व श्रुतिबाक्यांनी त्याचे सतत मनन करावें; मननानें निश्चय झाला तरी वृत्ति तदाकार राहात नसेल तर त्याचे अखंड अनुसंधान ठेवावे. त्याचा निदिध्यास धरावा. एकात्मदर्शन, श्रवण, मनन, निदिध्यासन यांच्या द्वारां होणाऱ्या आवरणविक्षेपरहित पूर्ण निश्चयानें आत्मसाक्षात्कार होतो. विज्ञान म्हणजे आत्मस्थिति, आत्मस्थिति बाणल्यानंतर आत्मतत्त्वच एक तेवत राहाते. दोरीवर भासलेली सर्पाची कल्पना तिच्या ज्ञानानें संपूर्ण नष्ट झाल्यानंतर सर्प म्हणून भासणारी एक दोरीच होती म्हणून जसे ज्ञान होते त्याप्रमाणेंच आत्मरूपावर भासलेली जगाची कल्पना आत्मरूपाच्या ज्ञानानें संपूर्ण नष्ट झाल्यावर जग म्हणून भासणारे हे एक अद्वितीय आत्मरूपच होते म्हणून ज्ञान होते. एका आत्मज्ञानानें सर्वांचेंच एकदम ज्ञान होते याचा अर्थ हा. प्रत्येकांत ‘ मी ‘ ही जाणीव आहे. ही आत्मभावना असल्यामुळे आपले अस्तित्वच यामुळे भासमान होतें. मी या आपल्या अस्तिभातिप्रिय अशा आत्मीय भानांत हें जगद्भान होर्ते म्हणून जग सर्व तद्रूपच आहे. हे सर्व चराचर विश्व, मीपणाच्या ( आपल्या ) जाणीवेंत पाहिलेलें सर्वहि एक मीपणाची जाणीवच असते. मीपणाच्या ( आपल्या) जाणीवेत आपणच एक अद्वितीय असतो. एवंच आपणच एक आपल्या अस्तित्वानें, ज्ञानरूपानें, आनंदमात्रतेनें आहोत. जग म्हणून पूर्वीहि कांहीं नव्हते, आतांहि कांहीं नाहीं व पुढेंहि कांहीं असणें शक्य नाहीं असें उमगतें. अशा रीतीनें एकात्मज्ञानानें, सर्वांच्या सत्यरूपानें स्वरूपच एक आहे. आरशांत प्रतिबिंबलेले पदार्थ आरशापुढून काढून टाकले असतां जसा एकच एक स्वच्छ आरसा राहातो त्याप्रमाणेंच अनेकत्वाच्या संकल्पामुळे दिसून येणारे हे सर्व विश्व, संकल्पासह काढून टाकले, की एकच एक ‘ मी’ पणाची स्वच्छ जाणीव आपल्या सच्चिदानंदरूपानें शिल्लक राहाते. अनेक घट रिकामे केले असता त्यांतील सर्व समुद्राचे पाणी आपल्या मूळ रूपांत समरसून एक समुद्रच झाल्याप्रमाणे सर्व देह रिकामे केले असतां त्यांतील आत्मीय ‘मी’ पणाची जाणीव आपल्या मूळ रूपांत समरसून एकात्मरूपच शिल्लक राहाते. अद्वितीय आत्मरूप सहि आपल्यांत आपणच एक असल्यामुळे, वस्तुस्थितीचे ज्ञान झाल्यानंतर दुसरे म्हणून कांहीं शिकच राहात नाही. स्वतःच्या ठिकाणी स्फुरलेल्या मीपणाच्या या संवित्द्वारां एकोऽहं बहु स्याम् ‘ ।— ‘ बहु व्हावें’ असा संकल्प करून केवळ आपल्या संकल्पानेंच त्या अद्वितीय परमात्म्यानें हें बहुत्व धारण केलें. ईशसंकल्पाची ही सृष्टि वस्तुतः संविद्रूप अशा ‘मी’ या आत्मीय भानाचे अद्वितीय ज्ञानरूपच आहे. या दृष्टीनें मोक्षाकरितां विश्वांत वस्तुतः असणारें ‘मी’ या आत्मीयतेचें असे हें ज्ञानमात्र एकत्व निवडून घ्यावे लागतें.

यो वा एतदक्षरं गार्ग्यविदित्वाऽस्मि लोके जुहोति यजते तपस्तप्यते बहूनि वर्षसहस्राण्यन्तवदेवास्य तद्भवति यो वा एतदक्षरं गार्ग्यविदित्वा स्माल्लोकात्प्रति स कृपणोऽथ य एतदक्षरं गार्गि विदित्वास्माल्लोकात्प्रति सः ब्राह्मणः ।। (बृ. ३।८।१०) या अधिकारी व अविनाशी आत्मतत्त्वाला न जाणून या लोकी किती होमहवन आणि यज्ञयाग जरी केले, अनेक सहस्र वर्षे जरी तप केलें, असेंच अन्य कितीहि कांहीं केलें तरी त्यापासून कधी शाश्वत सुख असें लाभत नाहीं. झाली तरी ती अशाश्वत सुखाचीच प्राप्ति त्यापासून होते. जो या अविनाशी आत्मतत्त्वाला न जाणून देहत्याग करतो तो क्षुद्र व दीन होतो; केलेल्या कर्माचेंच तेवढे वीट आणणारें अल्प क्षणभंगुर सुख अनुभवितो. धन असून न अनुभविल्याप्रमाणें आत्मसाधन करणे शक्य असून देखील त्या अविनाशी सुखसाधनांनी आत्मसुख अनुभवीत नाहीं, यामुळे आत्मज्ञान-विधुर मनुष्याला इथे कृपण म्हणून म्हटले आहे. जो अविनाशी आत्मतत्त्व जाणून देहत्याग करतो तोच खरा ब्राह्मण. जो आत्मतत्त्व जाणून देहत्याग करत नाहीं तो जातीनें ब्राह्मण असून देखील खरें ब्राह्मणत्व त्याला येत नाहीं. देह असतांच ब्राह्मणानें तें आत्मतत्त्व ओळखून दुसऱ्याला त्याचा उपदेश करावा. त्याच्या उपदेशानें स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेऽपि यान्ति परां गतिम् । या आधारानुसार स्त्रिया, वैश्य, शूद्रदेखील ब्राह्मण म्हणजे ब्रह्मसाक्षात्कारी होतात व देहान्त ब्रह्मरूपाशीं ऐक्यता संपादून पुन्हां जन्मास न येतां संसारांतून कायमचीं मुक्त होतात.

home-last-sec-img