Literature

सर्व मनोमयच

अन्न खाल्यानंतर तृप्ति ही मनालाच होते. देहाचें सूक्ष्मकारण मन अति सूक्ष्म आहे, देह हा स्थूल आहे. देहाचा आणि देहपोषणास आवश्यक अशा अन्नादि भोगांचा साक्षात् संबंध देहाशींच असला, या मनाशीं जरी नसला तरी स्थूल देहाच्या केवल अध्यासानेंच, देहाच्या उपचारानें तें संतुष्ट होतें. अनुकूल प्रतिकूलतेनें मनावरच सुखदुःखाचे परिणाम होतात. देहसुखा करितां आहारादि पदार्थांची इच्छा मनालाच होते. ते मिळाले असतां संतोषहि मनालाच होतो. मनाच्याच भावना देहकृतींत व मुखमुद्रेवर उमटतात. मनाची खिन्नता व प्रसन्नता मुखावर स्पष्ट उमटून दिसते. दुसऱ्याच्या बोलण्याचा व क्रियेचा इष्टानिष्ट परिणाम मनावरच होतो. स्थूल देहधारी मनुष्याच्या बाबतींतहि इतकें हें असें तंतोतंत पटतें तर तें सूक्ष्म देहधारी पितरांच्या बाबतींत कां पटू नये! हें सर्व जग मनोमयच आहे. सर्व देह मनोमयच आहेत. सर्व क्रिया मनोमयच आहेत. सर्व इच्छा, सर्व संकल्प मनोमयच आहेत. यन्मनसा मनुते तद्वाचा वदति तत्कर्मणा करोति । यद्यत्कर्म कुरुते तत्तत्फलमनुभवति । क्रियेपूर्वी त्याची इच्छा आणि संकल्प मनांतच उत्पन्न होतो. मनानें ज्याची इच्छा करतो व जसा संकल्प करतो तसेंच तो बोलून दाखवितो व त्याप्रमाणेंच वागतो. मनानेंच क्रिया घडतात. मनानेंच भोग घडतो. तृप्तिहि पण मनालाच होते. हें जरी खरे असले तरी वासनेनें व संकल्पानें उमटलेले स्थूल देहाच्या प्राधान्यानेच तडीस नेतां येते म्हणून स्थूल देहाचे या ठिकाणी विशेष महत्त्व आहे.

स यदा मनसा मनस्यति मन्त्रानधीयीयेत्यथाधीते कर्माणि कुर्वी येत्यथ कुरुते पुत्रापश्च पशू श्वेच्छेयेत्यथेच्छत इमं च लोकममुं चेच्छेयेत्य थेच्छते मनो हि लोकः ।। ( छां. अ. ७ खं. ३.)

-मंत्राचा उच्चार करावा म्हणून मनांत येते तेव्हां मंत्राचा उच्चार करतो. जेव्हां अध्ययन करावें म्हणून मनांत येतें तेव्हां अध्ययन करतो. जेव्हां कर्म केले पाहिजे म्हणून मनाला वाटते तेव्हां कर्म करतो. द्रव्यदारां पुत्रपश्वादिकांची आवश्यकता मनांत भासू लागली की, त्यांची इच्छा करतो. इहलोकाचा अथवा परलोकाचा संकल्प मनांत उत्पन्न झाला कीं, मग त्यांची इच्छा करतो. मन एव हि लोकाश्च । हे सर्व लोकहिं मनच आहेत. मनोमात्रमिदं सर्वम् । मनच सर्व कांहीं आहे. मनच सर्व कारण आहे. सर्व व्यवहार मनोमयच आहेत. परमात्म्याच्या संकल्पानें, इच्छेनें म्हणजे मनानेंच ही सृष्टि उत्पन्न झाली. त्यामुळे तदंशभूत जीवालाहि सर्व सृष्टि मनानेंच प्रतीत होते व सर्व किया संकल्पानें, इच्छेनें, म्हणजे मनानेंच घडतात. मनाची वासनाच देहाकार होते. कृतकर्माचे तदनुरूप फल परमेश्वराकडून दिलें जातें व मग जन्म येतो. अन्यत्रमना अभूवं नाऽपश्यम् । अन्यत्रमना अभूवं नाश्रौषम् । माझें मन दुसरीकडे असल्यामुळे मी बघितलें नाहीं, दुसरकिडे माझें मन गेलें होतें त्यामुळे मी ऐकलें नाहीं, इत्यादि ऐकावयास सांपडतें. आपल्यालाहि असा अनुभव येतो व आपणहि वेळीं असेंच म्हणतों. एकंदरीत दुसरीकडे मन गेलें असल्यास समोर असून देखील ती वस्तु दिसत नाही, म्हणजे दृश्याचे परिज्ञान होत नाहीं या अनुभवावरूनहि हें सर्व मनोमय आहे हे स्पष्ट होतें. स्वप्नामध्ये मनोमयच सृष्टि असते. सुषुप्तींत कल्पना आणि सृष्टि दोन्हीहि दिसून येत नाहीत, यावरून त्या ठिकाणी मन, जरी भासत नसले, जरी तें ( पुन्हां जागृत्-स्वप्न या अवस्थेत यथास्थित अनुभवास येत असल्यामुळे ) संपूर्ण नष्ट झाले असे म्हणतां येत नसले, तरी तें इतक्या सूक्ष्म स्थितीत असतें कीं त्याच्याकडून कसलीच कल्पना तिथे करवत नाही व त्यामुळेच स्वपरदेहादि कोणतेंच दृश्य सुषुप्तीत दिसत नाही. असे जरी मानले तरीह मनाच्या कल्पनेनेच तें सर्व होतें असें सिद्ध होऊन सर्व हें मनोमयच ठरतें. या ठिकाणीं तेजोबिन्दूपनिषदाच्या पांचव्या अध्यायाचा ९७ वा श्लोक आठवला तो इथे देतो. त्याच्यामुळे या विषयाला पुष्टि मिळते.

कामं क्रोधं बंधनं सर्वदुःखं विश्व दोष कालनानास्वरूपम् । 

यत्किश्वेदं सर्व संकल्पजालं तत्किवेदं मानसं सौम्य विद्धि ||१७||

—काम, क्रोध, बंधन, सर्व दुःख, अखिल विश्व, निखिल दोष, काल विविधरूपें सर्वहि हें जितकें म्हणून संकल्पाचें जाळे तें सर्व मानसिकच आहे असें समज, म्हणून ऋभूनें निदाघाला उपदेशिलें आहे. सर्व प्रपंचच मनोमय ठरला तर मनाच्या कल्पना म्हणजेच हे सारे पदार्थ, मनाच्या कल्पनेचाच हा सर्व व्यवहार, तर मग येथें मनाहून दुसरें काय राहिलें ? मनाच्या कमीअधिक संकोच-विकासानेच जागृदादि त्रयावस्था होतात. तिन्ही अवस्था मनोमयच ठरतात. कमीअधिक कालाच्या प्रमाणानें जागृतस्वप्न दृश्य मनोमयच होते. सुषुप्ति मनाची सूक्ष्म स्थिति ठरते. ते ते पदार्थ, त्या त्या जाती, तो तो जातिस्वभाव, तो तो जातिधर्म, त्या त्या जातीचा व्यवहार, त्या त्या जातीशी जातींचा इतर व्यवहार, सबंध दृश्य, सबंध जीवन एका ईश्वराच्या व तदंशभूत जीवाच्या मनःसंकल्पांतच मोडतें व दिसूनहि येतें.

home-last-sec-img