Literature

हिंदू व हिंदुस्तान

बृहस्पति आगमामध्ये हिन्दुस्थानाची मर्यादा निश्चितपणें सांगितली आहे. हिमालयं समारभ्य यावदिंदुसरोवरम् । तं देवनिर्मितं देशं हिन्दुस्थानं प्रचक्षते || — हिमालयापासून इंदु सरोवरापर्यंतच्या देवनिर्मित दिव्य प्रदेशाला हिन्दुस्थान असे म्हणतात असा या श्लोकाचा अर्थ आहे. ‘ हिमालय’ या प्रथम शब्दाचें ‘हि’ हें प्रथमाक्षर व सीमांत सूचित करणाऱ्या ‘इन्दु’ या शब्दांतील ‘न्दु ‘ हे अन्त्याक्षर मिळून ( हि +न्दु) ‘हिन्दु’ असा शब्द होतो. हिन्दुस्थानाच्या सीमा दाखविणाऱ्या या आद्यंत अक्षरांच्या जोडणीवरून यांतल्या लोकांच्या नांवाचीहि उत्पत्ति स्पष्ट होते. ‘हिन्दूचें स्थान – हिन्दुस्थान हा अर्थ तर अगदी स्पष्ट आहे. हिमालयापासून इंदु सरोवरानें उपलक्षित होणाऱ्या कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या हिंदुस्थानाची सीमाच या ठिकाणी सांगितली आहे. आम्हांला ‘हिन्दु’ हें नांव यवनांनी दिलें तें गौरवार्थाने नसून ‘हीन’ या व्यंग्यार्थानेंच दिलें व अजूनसुद्धा ‘हीन’ या अर्थीच याचा उपयोग करतात, तेव्हां ‘ हिन्दु’ हा शब्दच काढून टाकला पाहिजे असें कांहींचे म्हणणे आहे. आणखी कांहींचे म्हणणे असे की ‘ हिन्दु’ या शब्दांत वैदिक व अवैदिक अशा सर्व सांप्रदायांचा अंतर्भाव होत असल्यामुळे सर्वांनाहि सामान्यपणाने लागू पडणारा हाच शब्द रूढत ठेवावा. या दोन्ही पक्षांचा आपण विचार करूं या.

home-last-sec-img