Literature

हीं तीन द्वारें बंद ठेवा

या संदर्भाला अनुसरून सर्ववेदान्तसारसंग्रह या आपल्या एका प्रकरणग्रंथांत श्रीशंकराचार्यांनी लिहून ठेवलेला एक श्लोक आठवला तोहि येथे देतों

संसारमृत्योर्बलिनः प्रवेष्टुं द्वाराणि तु त्रीणि महान्ति लोके । कांता च जिव्हाच कनकं च तानि रुणद्धि यस्तस्य भयं न मृत्योः ||८८|| 

बलिष्ठ अशा कामादि विकारांनी प्रेरित होणाऱ्या संसार मोहरूपी मृत्युप्रवेशाची स्त्री, जिह्वा आणि संपत्ति हीं तीन मोठमोठाली द्वारे आहेत. ही तिन्हीं द्वारें ज्यानें अजिबात बंद केली आहेत, त्याला मृत्यूचे भयच नाहीं. तेव्हां नुसती एक केवळ दृष्टी पडली तरी बाधणाऱ्या कांता, कनक आणि सुग्रास अन्न यांच्या नुसत्या कल्पनेलाहि निःस्पृहाने कधी बळी पडू नये. जिंकून घेतलेला प्रांत म्हणूनहि ही तीन द्वारे उगीच थोडीशीहि उघडी ठेवून म्हणजे स्त्रीपुरुष एवढाच थोडा भेद राखून यांच्या नुसते आसपास गेले तरी कसल्याहि साधकाला हा मोहरूपी मृत्यु  झपाटल्याशिवाय रहात नाही. याचे कारण असे आहे की, सर्व  देह कामविकाराला बळी पडून झालेल्या रतिक्रीडेचे द्योतक असल्याने यांच्यातून काम आपले ठाण देऊन बसलेला असणें स्वाभाविक आहे. आत्मतत्त्वाचे अथवा विवेकाचें अंजन न लावलेल्या साध्या दृष्टीनें, तें अंजन विसरून याच्याकडे बघितले म्हणजे याच्या ताब्यांत असणाऱ्या तरुणतरुणींच्या ठिकाणीं साहजिकपणें काम उसळणे अगदी स्वाभाविक आहे. निसर्गच हा म्हटले तरी या दृष्टीने अतिशयोक्ति होणार नाहीं.

ह्रीं तीन द्वारे ज्याने अजिबात थोडीसुद्धां मोकळी न ठेवतां संपूर्णच बंद करून टाकली आहेत म्हणजे केवळ एक आत्मदृष्टी नेच जो सर्वांना बघतो, स्त्रीपुरुषात्मक नुसती देहदृष्टीहि ज्याने अजिबात नष्ट करून टाकली आहे अथवा विवेकदृष्टि बाळगून सर्व स्त्रियांना मातृदृष्टीने पाहण्याची शपथ-प्रतिज्ञा ज्याने केली आहे; (त्यांतूनहि नुसती शपथ घेऊन अथवा प्रतिज्ञा करूनहि भागत नाहीं. पुराला वाळूच्या बांधाचा जसा उपयोग होत नाहीं, त्याप्रमाणेच बलिष्ठ कामविकाराच्या असह्य आघातापुढे त्या प्रतिज्ञा पार नष्ट होऊन अशी स्त्रीपुरुष भ्रष्ट झाल्याची बरींच बंद उदाहरणे आमच्यापुढे आहेत. तेव्हां-) केलेली प्रतिज्ञा अथवा शपथ शेवटपर्यंत तडीस नेण्याचें भीष्मसामर्थ्य ज्याच्या ठिकाणीं आहे, तत्त्वज्ञानाच्या अभ्यासानंतर आत्मसाक्षात्कार होऊन त्या आत्मलाभानें अविनाशी आनंदरूपच जो झाला, त्याला मात्र या मृत्यूचें भय मुळींच उरत नाही. त्याला कामविकार कधीं होतच नसल्यामुळे कामविकारानें कधीं भ्रष्ट होण्याची भीतीहि त्याच्या बाबतीत असत नाहीं. शाश्वतास शोधीत गेला । तेणें ज्ञानी साच जाला। विकार सांडून मिळाला । निर्विकारी ॥ (दा. १५ १०-२५) बीज अग्नीनें भाजलें । त्याचे वाढणें खुटलें। ज्ञात्यास पणे तैसें जालें । वासनाबीज ||२८||” ज्याने आत्मनात्मविवेक करून अशा रीतीने तात्त्विक आत्मदृष्टि आंगवळणी पाडून घेतली आहे. त्याला मात्र दग्धबीजन्यायानें स्त्रीसहवास बाधूं शकत नाहीं, हे उघड आहे. एरवी इतरांच्या बाबतींत निश्चयानें सांगणे कठीण.

विकार जागृत होण्यासारखे स्त्रियांचे बोलणें व सर्व हावभाव स्वाभाविकपणेच असतात. पुरुषांच्या ठिकाणचा गुप्त कामविकार जागृत करण्याचें स्त्री म्हणजे कामाच्या हाती असलेले जणू एक ईश्वरनिर्मित शस्त्रच आहे म्हटले तरी अतिशयोक्ति होणार नाही. इतर विषांचा परिणाम तत्स्पर्शाने व तत्पानाने होत असल्यास या विषाचा परिणाम नुसत्या दृष्टिपातानें होतो; अन्य मद्याच्या पानाने मद चढत असल्यास या मद्याची दृष्टादृष्ट झाली तरी मद चढतो; इत्यादि प्रकारची पुष्कळ वर्णने आहेत. म्हणून सापाशी खेळावयाचे असेल तर गरुडच व्हावयाला पाहिजे अथवा तशी गरुडरेषा तरी हातावर असली पाहिजे किंवा तशाच सिद्धाकडून गरुडमंत्राचा उपदेश तरी असला पाहिजे; नाहीं तर पूर्वपुण्याच्या प्रतापानें दंश न होण्याचा तसाच बलिष्ठ योग तरी एक पाहिजे. एरवीं सापाशी खेळत रहाणे शक्य नाही हे उघड आहे.

श्रीसीतामाता लक्ष्मणाच्या मांडीवर झोपल्या असतांना श्रीराम पोपटाच्या वेषानें तत्त्वनिदर्शनार्थं विचारतात लक्ष्मणा !

मनो धावति सर्वत्र मदोन्मत्तगजेन्द्रवत् । अड्के स्थिता परस्त्री चेत्कस्य नोच्चलते मनः ॥

पुढे दिसावयालाहि नको, मन सारखे उन्मत्त गजाप्रमाणे इकडे तिकडे स्वतः आपणहून धांव घेत फिरत असतें. परस्त्री प्रत्यक्ष मांडीवर झोपली असतां मनात काय नाहीं येणार, कोणाचे मन विकारी होणार नाही ?

पुष्पं दृष्ट्वा फलं दृष्ट्वा दृष्ट्वा स्त्रीणां च यौवनम् । श्रीणि रत्नानि दृष्ट्वेय कस्य नोच्चलते मनः ॥

लक्ष्मणा ! सुंदर सुवासिक गोड पुष्प, फळ आणि स्त्रियांचे यौवन अशी हीं तीन रत्ने पाहून कोणाचे मन पाघळणार नाहीं, सांग. यावर लक्ष्मणाने दिलेले उत्तर तत्त्वद्योतक असे मोठ्या बहारीचे आहे..

मनो धावति सर्वत्र मदोन्मत्तगजेन्द्रवत् । ज्ञानाङ्कुशे समुत्पन्ने तस्य नोच्चलते मनः ॥

उन्मत्त गजाप्रमाणें इकडे तिकडे भटकण्याचा जरी या मनाचा स्वाभाविक अभ्यास असला तरी ज्याच्याजवळ ज्ञानांकुश असेल त्याला भिण्याचे कारण नाहीं. परस्त्री मांडीवर झोपली असली तरी त्याचे मन यत्किचितहि विचलित होणार नाही.

पिता यस्य शुचिर्भूतो माता यस्य पतिव्रता । द्वाभ्यां च यस्य संभूतिस्तस्य नोच्चलते मनः ॥

ज्याचा पिता शुचिर्भूत असतो आणि जननी (आई) पतिव्रता असते, अशा शुचिर्भुत जननी जनकापासून निर्माण झालेल्याचे (श्लोकातल्या चकारानें) व लहानपणापासून चांगले संस्कार झालेल्याचें, पुढेहि सत्संगांत राहिलेल्याचे मन मात्र या तिन्ही रत्नांना बघून निर्विकार असते, असा या श्लोकाचा अर्थ आहे. मी कीर्तनांत ऐकलेली ही गोष्ट आहे. इथलें तत्त्व घेण्या सारखे आहे यात शंका नाही.

कान्ताकटाक्षविशिखा न खनन्ति (लुनन्ति) यस्य । चित्तं न निर्दहति कोपकृशानुतापः ॥ 

कर्षन्ति भूरि विषयाश्च न लोभपाशैः । लोकत्रयं जयति कृत्स्नमिदं स धीरः’ ( भर्तु. नी. श. १०७)

यावर वामन पंडितांची समश्लोकी आहे ती देतो

कांताकटाक्षशर हे रुतती न ज्याला । जाळी न कोपज हुताशनही जयाला ।

ज्याच्या मनी न जडती विषयादि पाश ।तो धीर जिंकिल जगत्त्रय सावकाश ||

स्त्रियाचे कटाक्षबाण ज्याच्या हृदयास भेदीत नाहीत; क्रोधाग्नि ज्यास जाळीत नाही विषयाचे पाश स्पर्शुच शकत नाहीत; तो निर्भय त्रैलोक्यास जिंकतों. त्रैलोक्य त्याच्या चरणी लागते. हा भर्तृहरीचा नीतिशतकांतला श्लोक निस्पृहाचे यथार्थ वर्णन नाहीं का करीत ? विरक्त असे धीर, वीर पाहिजेत. वैराग्याची स्थिति अशी बळावल्याशिवाय, वैराग्य काय, त्याची आवश्यकता किती आहे, याची जाणीवहि नसतांना ज्ञानाचा गंधहि नसतांना, समत्व समत्व’ म्हणून स्त्रीपुरुषांचा, तरुण मुलामुलींचा सर्रास चालू असलेला एकत्र वास ईश्वर करो आणि शीलवर्धक आणि आत्मोन्नतिकारक आणि तसाच सर्वतोपरी राष्ट्रास लाभकारी होवो.

नाना पुरुषांचे जीव । नाना स्त्रियांचे जीव । येकचि परी देहस्वभाव । वेगळाले ।। (दा. १७-२-२०) सगट विचार तो अविचार । कित्येक म्हणती येकंकार । येकंकार भ्रष्टाकार । करु नये ।। (दा. २०-७-३०) सकळ अवगुणांमधे अवगुण । आपले अवगुण वाटती गुण । मोठे पाप करंटपण। चुकेना कीं ॥ (दा. १९-८-८) ईश्वरें नाना भेद केले । भेदें सकळ सृष्टी चाले । आंधळे परीक्षवंत मिळाले। तेथें परीक्षा केंची ।। (दा. १७-१०-२०) अमृत विष येक म्हणती । परी विष घेतां प्राण जाती ।कुकर्मे होतें फजिती । सत्कर्मे कीर्ति वाढे ।। (दा. १७-१०-२८) जोपर्यंत अग्निस्तंभनविद्या माहित नसते तोपर्यंत अग्नि काय करतो म्हणून जळत्या आगीत उडी घेण्याचें साहस दैवी सामर्थ्याशिवाय इतरांना मृत्युरूप आहे, हे जाणून मर्यादेनें दूर राहिलेलें बरें !

श्रीतुकाराम महाराजांकडे वाईट हेतूने आलेल्या एका स्त्रीला त्यांनी दिलेलें उत्तर पहा :

पराविया नारी रखुमाईसमान । हें गेलें नेमून ठायींचेचि ॥१॥ 

जाई वो तूं माते न करीं सायास । आम्हीं विष्णूदास नव्हो तैसे ॥२॥

न सहावे मज तुझें हें पतन । नकों हें वचन दुष्ट वदों ॥३॥ 

तुका म्हणे तुज पाहिजे भ्रतार । तरी का इतर लोक थोडे ॥४॥(तुकाराम गाथा – ४०५२)

त्यांनी या बाबतीत साधकांना स्वतःचे निमित्त करून स्पष्ट इशाराच देऊन ठेवला आहे :

स्त्रियांचा तो संग नको नारायणा । काष्ठा या पाषाणा मृत्तिकेच्या ॥१॥ 

नाठवे हा देव न घडे भजन। लांचावलें मन आवरें ना ॥२॥ 

दृष्टिमुखे मरण इंद्रियाच्या द्वारें। लावण्य तें खरें दुःखमूळ ॥ ३ ॥ 

तुका म्हणे जरी अग्नि झाला साधु । परी पावे बाधु संघटणें ॥४॥(तुकाराम-गाथा – ४०५३)

home-last-sec-img