Literature

अज्ञानाची पराकोटि

वरअक्षरं तमसि विलीयते तम. परे देवे ।‘ हें वाचले. या जगाच्या पूर्वी तमच एक होते हे कळले. लयप्रकरणांत हे कार्याच्या शेवटी भेटते आणि मग ब्रह्मस्वरूपाचे दर्शन होते. एकंदरीत भ्रामक जगाची उत्पत्ति ब्रह्माधिष्ठित तमापासूनच होणें युक्तियुक्तहि वाटत असल्यामुळे या दिसून येणाच्या जगाच्या प्रारंभी एक तमच होते हे सिद्ध झाले. तम आसीत्तमसा गुळ्हमग्रे । (ऋ. ना. सू. म. १० अ. ११ सू. १२९-३) वेदवाक्याची इथे आठवण झाल्याशिवाय रहात नाही. अप्रकाशोs, प्रवृत्तिश्च प्रमादो मोह एव च ॥ (भ.गी. १४-३३) प्रमादमोहौ तमसो भवतोऽज्ञानमेव च ॥ (गी. १४-१७) त्याबरोबरच या भगवग्दीतेच्या श्लोकांचीहि पण स्मृति होते आणि लख्ख प्रकाश पडतो.

आत्मरूपाचा अप्रकाश म्हणजे जाणीव नसणे. अज्ञान, आत्मस्वरूपाच्या निर्विषय सुखाच्या ठिकाणची अप्रवृत्ति, देहाहंकाराचा प्रमाद आणि दृश्य पदार्थाचा मोह असे जे काही पाठीमागे हात धुऊन लागले आहे, तें हे या तमामुळे., हें अज्ञान,प्रमाद, मोह त्या तमापासूनच झाले आहेत. त्या तमापासून झालेले अज्ञानच या सर्व विश्वाला, सर्व विश्वांतल्या अखिल कार्याला कारणीभूत आहे हे स्पष्ट होते. अज्ञानाने आत्मज्ञान आत्मज्ञान आवृत्त झाल्यामुळे हे सर्व जीव मोह पावले आहेत. • अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः। (भ.गी. अ. ५-१५) अज्ञानच याचे मूलकारण आहे. अज्ञानमेवास्य हि मूलकारणम् । (रामगीता ९) ही दोन्हीं वाक्य इथे लागू पडतात. श्रीशंकराचार्यांचाहि स्वात्मप्रकाशिकेतला अगदी पहिलाच श्लोक आठवला तोहि येथे देतो- अधिकस्याधिक फलम् ।

जगत्कारणमज्ञानमेकमेव चिदन्वितम् । त एक एव मनः साक्षी जानात्येवं जगत्त्रयम् ॥

सूर्यप्रकाशामुळेच त्याला आच्छादल्यासारखे वाटणारे ढग प्रकाशतात आणि त्या प्रकाशासमेतच दिवसां जसे असतात, त्याप्रमाणेंच ब्रह्मरूपाच्या चिद्रूपामुळेच त्याला आच्छादल्यासारखे वाटणारे तम अथवा अज्ञान प्रकाशते आणि त्या प्रकाशासमेतच असते. सूर्यप्रकाशाच्या उष्णतेमुळेच ढगाची उत्पत्ति झाली असली तरी सूर्यप्रकाशांत अथवा सूर्यनारायणांत यामुळे काही फरक पडत नाही आणि त्याच्यांत ढग म्हणून काही त्रिकालीहि झाल्याचे आढळत नाही. याचा संपर्कहि  त्याला नाही म्हणून हे जसे समजावयाचे, त्याप्रमाणेच ब्रह्मस्वरूपाच्या ज्ञानरूपामुळेच याची उत्पत्ति झाली असली तरी त्याच्या त्या चिद्रूपांत अथवा मूळ स्वरूपांत यामुळे काही फरक पडत नाही आणि त्यांत अज्ञान अथवा तम म्हणून काहीं त्रिकालीहि झाल्याचे आढळत नाही, याचा संपर्कहि त्याला नाही म्हणून येथे जाणावयाचे आहे.

सूर्यप्रकाशच ढगांतून व ढगाच्या अनेक आकारांतून जसा दिसतो, त्याप्रमाणेच एकच एक परब्रह्म प्रकाश चिद्रूप मनाचा साक्षी अखिल तमांतून व त्यांच्या अखिल नामरूपात्मक कार्यातून जाणीवरूपानें सर्वत्र भरगच्च कोंदाटला आहे. वस्तुतः तमाला आणि तमापासून झालेल्या कोणत्याहि कार्याला प्रकाश अथवा जाणीव असत नसल्यामुळे, यांतून दिसून येणारी जाणीव अथवा प्रकाश परब्रह्माचाच आहे हे उघड आहे. तम आणि तमः कार्याचाहि संबंध याला लागत नसल्यामुळे, तम आणि तमकार्याच्या उत्पत्तिनाशानेंहि याला कांहीच इजा पोहोचत नसल्यामुळे, केवळ प्रकाशकच हा असल्यामुळे, या ब्रह्म प्रकाशालाच साक्षी असे दुसरे एक नांव आहे. हाच एक मन साक्षी सर्व मनःकल्पित दृश्यास आणि मनाला जाणतो, हा आचार्याच्या वर उद्धृत केलेल श्लोकाचा अर्थ आहे. साक्षी म्हणिजे ज्ञान। ज्ञानें वोळखावे अज्ञान। ज्ञानाज्ञानाचे निर्शन। देहासरिसें ॥ (दा. १७-९-९) ब्रह्मांडी देह कल्पिले । विराट हिरण्यगर्भ बोलिले ।ते हे विवेके निर्शले । आत्मज्ञानें ॥‘ (दा. १७-९-१०).

आसीदिदं तमोभूतप्रज्ञातमलक्षणम् । अप्रतर्क्यविज्ञेयं प्रसुप्तमिव सर्वतः ॥ (मनुस्मृति १-५) या अखिल दृश्यापूर्वी अमुक असें तसें म्हणून न जाणता येणारें, कोणत्याहि लक्षणांत बसणारें, तर्कितांहि न येणारें अज्ञात एक तम होतें, थोडक्या विश्व हे त्यावेळी झोपल्यासारखे होते. झोपेत अंतर्बाह्य प्रपञ्च शांत झालेला असतो. त्यावेळच्या तमाला अंधकार म्हणून म्हणता येत नाहीं; कारण अंधकारांत कांही दिसत नसले तरी मन असतें,’ मीही जाणीव असते, मनाचे व्यापार होत असतात डोळे सोडून इतर इंद्रियांचे व्यापार चालतात. असो, पिण्डातली सुषुप्ति आणि ब्रह्मांडांतले अव्यक्त अथवा अव्याकृत दोन्हींचा अर्थ एकच. तद्धीदं तर्ह्यव्याकृतमासीत् । (बृ. उ. १–४–७) अशी श्रुति आहे अव्यक्तमक्षरे विलीयतेऽक्षरं तमसि विलीयते तमः परे देव (वे) एकीभवति । या क्रमाप्रमाणे विचार करून श्रीसमर्थांच्या आणि बृहदारण्यकाच्या सांगण्याप्रमाणे प्रथम अहं ब्रह्मास्मि हें स्फुरण प्रकट झाल्यामुळे हिलाच मूळमाया म्हटलें तरी मागच्या निरूपणाप्रमाणे आधी विस्मृति मग स्मृति, आधी आवरण मग स्फुरण, या दृष्टीने या स्फुरणापूर्वी एक अनिर्वचनीय तम आवरण होतें तें अहं ब्रह्मास्मि या व्यक्त रूपाने प्रकटले आणि तें तम मूळमायेचें अव्यक्त स्वरूप अहं ब्रह्मास्मि या स्फुरणांतूनहि आहे असे मानावे लागतें व असे मानले तर, बीजाङ्कुरन्यायानें पूर्व स्थिति सहज द्योतित होत असल्यामुळे या दोन प्रमाणांत विरोध येत नाहीं.

दृश्य अवघे वेगळे केलें । केवळ अदृश्यचि उरलें । तेंचि ब्रह्म अनुभविलें । म्हणती येक ।। (दा. ८-१०-६३) परी तें ब्रह्म म्हणों नये । उपायासारिखा अपाये । सुन्यत्वास ब्रह्म काये। म्हणों येईल ||६४|| दृश्य अवर्षे वोलांडिलें । अदृश्य सुन्यत्वीं पडिलें । ब्रह्म म्हणौनि मुरडलें । तेथूनिच मागें ||६५|| इकडे दृश्य तिकडे देव । मध्ये सुन्यत्वाचा ठाव । तयास मंदबुद्धीस्तव । प्राणी ब्रह्म म्हणे ||६६|| रायास नाहीं वोळखिलें । सेवकास रावसे कल्पिलें । परी तें अवघें वेर्थ गेलें । राजा देखतां ॥६७॥ तैसें सुन्यत्व कल्पिले ब्रह्म । पुढे देखतां परब्रह्म । सुन्यत्वाचा अवघा भ्रम ।तुटोन गेला ||६८या ओव्या बघितल्या म्हणजे श्रीसमर्थांनी तमालाच शून्य हे नांव दिले आहे हे स्पष्ट होते. स्थितस्य गतिश्चिन्तनीया या न्यायानेंहि या दोन वाक्यांचे समर्थन झाले.

जे आवरण अहं ब्रह्मास्मि स्फुरणापूर्वी होते, तेच या स्फुरणानंतर अधिक घनीभूत होऊन तमोरूप सृष्टीचें बीज अव्यक्त झालें अहं ब्रह्मास्मि या आभासरूप ज्ञानांत निराभासाचे अज्ञान आहेच. तेच पुढपुढच्या कार्यातून अधिकाधिक घनीभूत होत जाऊन जड देहापर्यंत येऊन ठेपले आणि देहोऽहम् असा तदनुगत ज्ञानात त्याचा आभास होऊ लागला. ब्रह्माच्या ऐवजी देह मी म्हणण्याइतके तें तम (अज्ञान) घनीभूत झालें अहं ब्रह्म म्हणून सुखाकरितां ब्रह्माकडे धाव घेणारे मुळांतले अहं स्फुरण घसरत घसरत अवनतीच्या अखेरच्या पायरीवर येऊन अहं देह: म्हणून सुखाकरितां गलिच्छ स्वदेहयोनीकडे धाव घेऊ लागले “अहं ब्रह्म अस्मि-मी ब्रह्म आहे या स्फुरणांत, या अनुभवांत अहं भोक्ता पुरुष झाला. मी ब्रह्मभानरूप सुख देणारी स्वरूप ज्ञानशक्ति, प्रकृति अथवा मूळमाया, भोग्य झाली पुढे इश्वरोऽहम् या स्फुरणांत मी ईश्वरया अनुभवानें सुख देणारें अव्यक्ताभिमानाच्या ईश्वरत्वाचे भान प्रकृतिरूपभोग्य झाले अथवा येथील जगद्बिजरुप ज्ञानशक्ति प्रकृति भोग्य झाली आणि अहं स्फुरण भोक्ता पुरुष झाला.

याच्यापुढे हिरण्यगर्भोऽहम यांतहि हिरण्यगर्भत्वाचे भान प्रकृतिरूप भोग्य झाले अथवा येथील जगदंकुररूप इच्छाशक्ति प्रकृति भोग्य झाली आणि अहं भोक्ता पुरुष झाला. ‘ममयोनिर्महद्ब्रह्म तस्मिन्गर्भंदधाम्यहम् । संभवः सर्वभूतानां ततो भवति भारत ॥‘ (भ.गी. १४-३)  ‘विराड़ अथवा ‘वैश्वानरोऽहम् यात विराडत्वाचे भान प्रकृतिरूप भोग्य झाले अथवा येथील जगवृक्षरूप अर्थात् जगद्विस्ताररूप क्रियाशक्ति प्रकृति भोग्य झाली आणि अहं भोक्ता पुरुष झाला. असेच पुढे या तिघांचे अवतार अथवा प्रतिनिधि असणाऱ्या रुद्र, विष्णु, ब्रह्मा या देवांनाहि क्रमाने मी अमुक म्हणण्यात त्या त्या उपाधित्वाचे आणि नामाचे भान अथवा तमोरूप गुप्तबीजज्ञानशक्ति, पालनाची सत्त्व रूप इच्छाशक्ति, प्रत्यक्ष सृष्टि उत्पन्न करण्याची रजोरुप क्रियाशक्ति, कमाने त्यांना त्यांना प्रकृतिरूपाने भोग्य होऊन तदनुभवाने आनंद मानणारा अहंभाव क्रमाने त्यांचा त्यांचा भोक्ता झाला.

शेवटी अवनतीच्या अगदी खालच्या पायरीवर आल्यावर झालेल्या नरोऽहम्या भानांत नरत्वाचा म्हणजे त्या देहाचा अभिमान अथवा प्रजोत्पादनाची असणारी त्याची शक्ति प्रकृति व्यक्त स्त्रीरूपानें भोग्य झाली आणि देहाभिमानाचे अहं स्फुरण भोक्ता झाले. दोहोऽहं म्हणून मानणारा स्वदेहकारण रूप योनीत रमू लागला आणि त्यापासून झालेल्या घाणेरडया, पाउलापाउली वीट असणाऱ्या ,कुश्चिळ देहालाच मी म्हणून आनंद मानू लागला. आरशांत पाहून मिशांवरून हात फिरवू लागला. मी ब्रह्म हे विसरून मी देह झाल्यानंतर सुखाकरितां स्वयोनि म्हणजे कारणरूप नित्यशुद्ध आनंदघन ब्रह्मरूपाकडे न जाता, आपल्या देहाला कारणीभूत होणाऱ्या हिडीस इंद्रियांकडे धाव घेऊ लागला. ही येथे पराकाष्ठेची अवनति झाली. अज्ञानाला अथवा तमाला शेवटचें जे काही करावयाचे होते, ते इथें करून झाले. अज्ञानाची इथे पराकाष्ठा झाली आणि इथेच वाढीस लागलेले अज्ञान पूर्ण झाले आणि इथेच आपल्या पूर्णकलेनें नांदूं लागले. सूक्ष्म सूक्ष्म असणारें स्थूल स्थूल होता होता येथपर्यंत शेवटी येऊन ठेपले, बी आपल्या पूर्णरूपानें नष्ट होऊन वृक्ष झाल्याप्रमाणे मात्र पूर्वपूर्वरूप नष्ट होऊन उत्तरउत्तररूप झाले असे नाही; ती पूर्वपूर्वकारण-भूतरूपें जशीच्या तशीच आहेत. झालें तें त्यांच्या या कल्पना आहेत नुसत्या! नाटक पूर्ण लिहून होऊन रंगस्थळावर आले.

home-last-sec-img