Literature

अथ चतुर्थोध्यायः

जयाचिया कृपाविक्षणें । आनंदमहोदधि लाभणें ।
आनंदीच विरघळूनि होणें । आनंदी आनंद ।।१।।

जेथें आनंदाहूनि कांहीं । आपपर दुसरें नाहीं ।
जें निजप्रकाशेंचि सकळहि । दिप्तिमंत ।।२।।

जीबा त्या अनंत स्वानंदीं । मेळवी जो नासूति उपाधि ।
त्या या गुरूहूनि कृपानिधि । न भूतो न भविष्यति ।।३।।

गुरुकृपेंचेति बळें । अपरोक्ष ज्ञानाचेंनि उसाळे ।
असतचि विश्व नाढळे । निजानुभवीं ।।४।।

जेथें जेथें भिन्नस्फुरें । तेथें तेथें आपण उरें ।
आपणामाजीं कांहीच नुरे । भेदवार्ता ।। ५ ।।

आप आपणासी भेटी । नव्हे आपणासी तुटी ।
ऐसी ही स्वरूपाची मिठी । अखंड पडे ।। ६ ।।

माया अविद्या जीव- शिव । बंध-मोक्ष अवस्था भाव ।
सर्व विरोनि एकमेव । आपण उरे ।।७।।

या निर्मल निजानंदीं । नाहीं कसलीहि उपाधि ।
कोण कोणा साधी बाघी । भिन्नचि नसता ।।८।।

भिन्नपणें जें कां दिसें । तेथ आप आपणां गवसे ।
सकळ समरसोनि वसे । निद्वंद्व आपण ।।९।।

कोणा जन्म आणि नाश । कोण झालासे स्त्रीपुरूष I
कोण जीव कोण ईश बंध-मोक्षकोणा ।।१०।।

सर्व कार्यो कारणचि । आपुली व्यापकता साची ।
जेथें तेथें स्वतःची । अपुला अनुभवो ।।११।।

कोणा न देहीं अभिमान । स्वरूपाचें अनुसंधान ।
मी म्हणोनीच भान । प्राणिमात्रांसी ।।१२।।

देहवासनें कोणा तृप्ति । काय देहाची दीप्ति ।
होय नित्य नवी प्राप्ति नरकवासाची ।।१३।।

निजात्मभावनेचें सूत्र । मानी आपणासी पवित्र ।
सुखहि अस्त्र परत्र । आत्मानुभवें ।।१४।।

जो तो मी मी म्हणे । देहासी वेगळेपणें ।
देहाचा अभिमान घेणें । कोणा न घडे ।।१५।।

सकळ अनुभवा अंतरीं उरें । तें हें ‘मी’ एकचि खरें ।
अनुभव अनुभाव्य सारें विरें । देखत देखतां ।।१६।।

सकळ अनुभवा आधीं । तैसेंचि अनुभवामधिं ।
अनुभवा अंती आणि संधीं। आपण शाश्वत ।।१७।।

मध्येंचि मायालाघव । बहुरूपाचा अनुभव ।
उठोनि मावळे वाव । निःसारपणें ।।१८।।

आद्यंतीं जें का असें । तें निजपूर्णपणे बसें ।
त्याप्रकाशेंचि मध्ये जें भासें । तें कंटाळवाणें ।।१९।।

आपण चित्सुखसागर । निजीं न प्रपंच विचार ।
होणें जाणें समाचार । नसें आपणा ।।२०।।

एकपणेंचि सदोदित । निजींच आपण निवांत ।
नित्य परिपूर्ण अखंडित । शाश्वत वस्तु ।।२१।।

निजनिर्विकारज्ञान । तेंचि सकलासी जीवन ।
तेणेंचि तया समाधान । अखंड वसे ।।२२।।

आत्मभावानें सदोदित । व्यवहार हा चालत ।
प्रीतिविषय संतत आपण सर्वां।।२३।।

देह प्राण मन बुद्धि । सारूनि सकळ उपाधि ।
अज्ञान साक्षी निरवधि । सर्वत्र आपण ।।२४।।

सर्वामाजीं आपण । सर्व आपणामाजीं जाण ।
कोठेंहि नसे भिन्नपण । प्रीतींलागीं ।। २७ ।।

निजनिरतिशय आत्मदृष्टि । सहज निरीक्षी सकळ सृष्टी ।
क्षण न अनात्मभावनें कष्टी । ज्ञानी तो स्वानंदें ।।२६।।

मी म्हणजे आपण एक । जेथें नाहीं भेद मायिक ।
ऐशा अनुभवीं न अणुलेख । भिन्नत्वाचा ।।२७।।

ऐसें झालें हें कथन । आत्मानुभूतींचें लक्षण ।
गुरुकृपा ही वदवी जाण । यथार्थ वाचा ।।२८।।

इति चतुर्थोध्यायः

home-last-sec-img