Literature

अथ द्वितीयोध्यायः

सकल मंगलाचें निधान । तें हे सद्गुरचरण |
सकळ संसारबंधन तोडूनि टाकी ॥ १ ॥

मीचि तूं हें सद्गुरुवचन। कैसेनि ये अनुभवा आपण।
त्याचें पाहो विवेचन । यया अध्यायी ॥ २ ॥

डोळीयाचेंनी रूपग्रहण । तेवीं वेदची सत्यदर्शन ।
नीज तत्त्व बोधालागून | वेद अवतरे ॥ ३ ॥

‘नावेदविन्मनुते तं बृहन्तम् ” याप्रमाणें । परतत्व जाणाया कारणें ।
वेदासिंच शरण जाणें । अनिवार्य ॥ ४ ॥

अनेकी अनेक अर्थ केले । निजबुद्धी वैभव दाविलें ।
पांडित्याकारणें रचिलें । तें एक शास्त्र ॥ ५ ॥

निर्विषय सुखाकारणें । टाकवोनी भिन्नत्वाचे लेणें ।
परब्रह्मीं एक्यचि करणें । हें काम वेदांचें ॥ ६ ॥

नाहींतरी वेदां कोण महत्त्व । कोण पुसे तथा तत्त्व ।
विषय सुख आणि भिन्नत्व । सहज असे ॥ ७ ॥

दिव्यसुखप्राप्तीकारणें । ज्योतिष्टोमादी यज्ञ करणें ।
म्हणे तरि तत्त्वचि तेणें । जिवां बोधिलें ॥ ८ ॥

अरे तूं देह नव्हेसि । देह सांडुनि स्वर्गा जासी ।
देहसौख्याची असोशी । तुज कासया ॥ ९ ॥

कर्मफळ अनुभवोनि जन्मसि । तूं तो कोण अविनाशी ।
त्या तुज जाणे सुटशी । जन्ममरणांतुनी ॥ १० ॥

हा गर्भहेतु वेदींचा । विषयमूढा न उमजे साचा ।
गुरुकृपें या अर्थाचा । बोध होये ॥ ११ ॥

विषयसुख निरवावया । अद्वितीय ऐक्य व्हावया ।
वेद उपदेशी जीवा या । तत्त्वविचारू ॥ १२ ॥

मी मी म्हणोनि जें स्फुरें । अहंब्रह्मचि तें निर्धारें ।
ब्रह्मैक्य बोधचि सारें । टाळी अनर्थ ॥ १३ ॥

श्रुतीचें ऐसें जें सांगणें । तेथें संशय धरितां उणें ।
संशय नसतां पूर्णपणें । ब्रह्मचि होये ॥ १४ ॥

जीवा नीजभान जें विलसे। तें मी हें ब्रह्मीचेंचि असें ।
सर्वी समरसोनि वसें । ब्रह्मरूप ॥ १५ ॥

ब्रह्म वा इदमग्र आसित्तदात्मानमेवावेत् ।
अहं ब्रह्मास्मीति तस्मात्तत्सर्वमभवत् ॥

पूर्वी ब्रह्मींच अहं स्फुरलें। नीजाचेची भान वहिलें ।
ब्रह्मक्यचि दाविण्या भलें । जीवीं स्फुरें ॥१६॥

अहं हें आपुले भान । ब्रह्मासिच होय जाण ।
ब्रह्म स्वतः सिद्ध ज्ञान । तेणें गुणें ॥ १७॥

ब्रह्म जे सर्व कारण । त्या पासाव जे कार्य जाण ।
तथा नसेचि की भान । जडरूपें ॥ १८॥

जै कार्यमत्रीं नसे स्फुरण । तै त्या कैचें मीपण ।
कार्य सर्वहि अचेतन । सर्व जाणती ॥ १९ ॥

मी ब्रह्मीचेची भान । ब्रह्मीच होय स्फुरण ।
तेणे स्वतः सिद्ध जाण । अहं ब्रह्मचि ॥ २० ॥

तिळामध्ये तेल जैसें । अथवा दुग्धी लोणी बसें ।
सर्वा घटी व्यापून असे । मी हे तेवीं ॥ २१ ॥

माधुर्य मधुमाजी जैसे । जैसा द्राक्षी रस वसे ।
तेवी मी हे व्यापुनि असे । सर्वा घटीं ॥ २२ ॥

जैसी गोडी खडीसाखरी। लहान मोठया खड्या-भीतरीं ।
तेवी निचोच्च उपाधिमाझारी । अद्वितीय ब्रह्म ॥ २३ ॥

जाणोनी श्रीगुरु निजमूळ । सोडविता भिन्नत्वाचें खूळ ।
सांगती मी ब्रह्म जैसे केवळ । तैसें तूंहि ॥ २४ ॥

ऐसे सद्गुरूचें वचन । प्रत्यहि करावें मनन ।
ते नाते भवबंधन । त्रिविधा प्रतीति ॥ २५ ॥

नाही उंच नीच परीं । राया रंका एकचि सरी ।
झाला पुरुष अथवा नारी । एकचि पद ॥ २६ ॥

इति द्वितीयोध्यायः

home-last-sec-img